युरी आलेमाव यांच्या काँग्रेस प्रवेशावरून काँग्रेसचे युवा नेते अस्वस्थ

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

काँग्रेसमध्ये पुन्हा पक्षातून बाहेर गेलेले नेते परत आले, तर आपली विधानसभेतील संभाव्य उमेदवारी धोक्यात येऊ शकते असे वाटल्याने युवा नेते अस्वस्थ झाले आहेत.

पणजी: माजी मंत्री ज्योकीम आलेमाव यांचे पुत्र युरी आलेमाव यांच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशावरून काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेसमध्ये पुन्हा पक्षातून बाहेर गेलेले नेते परत आले, तर आपली विधानसभेतील संभाव्य उमेदवारी धोक्यात येऊ शकते असे वाटल्याने युवा नेते अस्वस्थ झाले आहेत.

कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख उर्फान मुल्ला यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ही अस्वस्थता ठळकपणे जाणवू लागली आहे.
भाजपकडून कॉंग्रेसमधील या अस्वस्थतेवर बारीक नजर ठेवली जात आहे. हळदोणे आणि मुरगाव मतदारसंघात कॉंग्रेसला खिंडार पडते का याविषयी जास्त बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी गिरीश चोडणकर आल्यानंतर त्यांनी आपला असा संघ उभा केला. बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी दिली. पक्षीय पातळीवर व रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी त्यांना सक्रिय केले. मात्र, संघटनात्मक पातळीवर कॉंग्रेसचा विस्तार म्हणावा तसा झाला नाही. विधानसभा निवडणुकीला दीड वर्ष राहिले असताना नवे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी घेतलेल्या आढाव्यावेळी ही बाब प्रकर्षाने जाणवली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत कॉंग्रेसकडे कार्यकर्ते कुठे आहेत अशी विचारणा केली होती. राज्यभरात जी आंदोलने कॉंग्रेस करत आहे त्यात तेच तेच चेहरे दिसत आहेत असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले होते. गेले वर्षभर कॉंग्रेसकडून काही मोजकेच नेते सक्रिय होते ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर अनेकांना पुढे आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

चोडणकर यांनीही याप्रश्नी ठाम भूमिका घेतली आहे. नेत्यांनी संघटना बळकट करावी अन्यथा संघटना बळकट करणाऱ्या नेत्याला संधी द्यावी असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे युरी आलेमाव यांच्यानंतर पक्षात आणखी कोणा कोणाला संधी मिळू शकते याविषयी जोरात चर्चा सुरू झाली आहे. 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या गोवा दौऱ्यादरम्यान काही आमदार, मंत्र्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता अशी खात्रीलायक माहिती आहे. त्‍यांना विधानसभेच्या पुढील निवडणुकीआधी काही महिने आधी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश हवा आहे. त्यातील काही नावांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मान्यता न मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा मोर्चा कॉंग्रेसकडे वळू शकतो असे या युवा नेत्यांना वाटते. त्यामुळे ही अस्वस्थता आहे. 

एकूणच सध्या काँग्रेसमधील युवा नेत्यात इतर पक्षातील कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला जात असल्याने धुसफूस सुरू आहे, तरीही प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर सर्व युवा कार्यकर्त्यांना समजावण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत.

पक्षाची संघटनात्मक वाढ ही झाली पाहिजे. त्यासाठी काही सक्षम नेते, जे निवडणुकही जिंकू शकतात ते पक्षात आले तर चालू शकते. पक्षाच्या उमेदवारीवर लढून, विजयी होऊन पक्ष सोडलेल्यांना पक्षात पुन्हा प्रवेश देऊ नये असे सर्वांचे म्हणणे आहे. काही नेते आले तरी युवा नेत्यांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही, त्यांनी माझ्याशी चर्चा करावी. कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही.
- गिरीश चोडणकर, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष

संबंधित बातम्या