महामारीमध्ये अधिवेशन घेणे धोकादायक 

विलास महाडिक
मंगळवार, 28 जुलै 2020

कोरोनाची लागण कोणाला व कशाप्रकारे होईल हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत हे अधिवेशन घेणेही योग्य नाही. हे अधिवेशन कोविड - १९ समस्या काही प्रमाणात कमी झाल्यावर हे अधिवेशन घेता आले असते.

पणजी

राज्यात सध्या कोरोना महामारीची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने विधानसभा अधिवेशन पुढे ढकलण्याची गरज होती. अशा परिस्थितीत अधिवेशन घेणे धोकादायक आहे. विधानसभेचे अनेक सदस्य ज्येष्ठ आहेत. एक दिवस सुद्धा धोकादायक आहे, असे मत ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो यांनी अधिवेशनापूर्वी व्यक्त केले. 
कोरोनाची लागण कोणाला व कशाप्रकारे होईल हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत हे अधिवेशन घेणेही योग्य नाही. हे अधिवेशन कोविड - १९ समस्या काही प्रमाणात कमी झाल्यावर हे अधिवेशन घेता आले असते. अधिवेशन घेण्यास सत्ताधारी घाबरत नाही. विरोधकांच्या सर्व प्रश्‍नांना उत्तर देण्यास सत्ताधाऱ्यांची तयारी आहे. तेलंगणाच्या अनेक वयस्क आमदारांना कोरोनाची लागण झाली होती त्यामुळे अधिवेशन घेऊन धोका पत्करणे योग्य नाही असे मत लोबो यांनी मांडले. 
दरम्यान गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, सरकारने विधानसभेच्या नुतनीकरणावर ७ कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा 
त्यातील ४ कोटी रुपये खर्च करून कोविड - १९ चाचणी यंत्रे खरेदी करावीत. त्यामुळे चाचण्यांचे अहवाल येण्यास जे अनेक दिवस लागत आहेत ते तत्पर उपलब्ध झाल्यास या महामारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. महामारीच्या काळात काही गोष्टी लपवून 
छुपे गैरव्यवहार सुरू आहेत. त्यांचेच काही कारनामे सरकार नष्ट करू पाहत आहे. राजकारणापेक्षा राज्यात उद्‍भवलेल्या महामारीवर विजय मिळवण्यासाठी त्यावर सविस्तर चर्चा होण्याची गरज आहे असे मत आमदार रोहन खवंटे यांनी व्यक्त केली. 
राज्यात कोविड महामारी आहे व आर्थिक स्थितीही बिकट आहे त्यासाठी घटनेनुसार अर्थसंकल्प मंजूर करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे 
किमान एकदिवशीय अधिवेशन घेणे क्रमप्राप्त ठरत आहे. त्यातून आणखी पर्याय नसल्याने हे अधिवेशन होत आहे असे मत वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केले. 
 

संबंधित बातम्या