ड्र्ग्ज संशयित अटालाला सशर्त जामीन

विलास महाडिक
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सव्वावर्ष होता कोठडीत

पणजी

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या इस्रायली संशयित ड्र्ग्ज माफिया यानिव बेनायम ऊर्फ अटाला याला आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन दिला. सव्वावर्षाहून अधिक काळ तो कोठडीत होता. अनेकवेळा जामिनासाठी अर्ज करूनही तो फेटाळण्यात आला होता
उच्च न्यायालयाने संशयित अटाला याला वैयक्तिक ५० हजार रुपयांची हमी तसेच तत्सम रक्कमेचा एक स्थानिक हमीदार, खटल्यावरील सुनावणीवेळी सहकार्य करणे व साक्षीदारांना न धमकावण्याची, राज्याबाहेर तसेच देशाबाहेर न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय जाऊ नये तसेच पासपोर्ट न्यायालयाकडे सुपूर्द केला नसल्यास तो करणे अशी अटी घातल्या आहेत.
संशयित अटाला हा अटक झाल्यापासून कोठडीत आहे. त्याच्यावरील खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्ह्याखाली आरोपपत्र दाखल झाले आहे. सध्याच्या कोरोना महामारीमुळे या खटल्यावरील सुनावणी केव्हा संपेल याचा अंदाज नाही. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने त्याला अटी घालून जामीन देणे योग्य वाटते असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
दहा वर्षापूर्वी अटाला याच्यामुळे ड्र्ग्ज माफिया – पोलिस लागेबांधे प्रकरण गोव्यात बरेच गाजले होते. संशयित अटाला हा पलायन करताना पकडला गेला आहे त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ नये अशी बाजू पोलिसांनी त्याच्या सत्र न्यायालयासमोरील जामीन अर्जावरील सुनावणीवेळी मांडल्याने त्याला जामीन मिळू शकला नव्हता.
गेल्यावर्षी रशियन नागरिक एदुआर्द गोरीयाचेव्ह याच्यावरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी इस्रायली ड्रग्ज माफिया यानिव बेनायम ऊर्फ अटाला, मॅक्सिम लिट्रीनोव्ह व डेनिस या तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला होता. यापैकी मॅक्सिम व डेनिस या दोघांना पोलिसांनी अटक केली होती मात्र अटाला पसार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते मात्र तो सापडत नव्हता.
गोव्यात गुन्हा करून पसार झालेला संशयित अटाला हा भारत - नेपाळ येथील हद्दीवरून पलायनाच्या प्रयत्नात असताना उत्तराखंड पोलिसांनी ३० एप्रिल २०१९ रोजी त्याला ताब्यात घेतले होते. गोवा पोलिसांनी तेथे जाऊन त्याला अटक करून गोव्यात आणले होते.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या