Indian Super League: एटीके मोहन बागान आयएसएल चँपियन

बंगळूरला नमविले ः 2-2 बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटवर 4-3 अशी बाजी
Indian Super League
Indian Super LeagueDainik Gomantak

किशोर पेटकर

Indian Super League उत्कंठावर्धक अंतिम लढतीच्या निर्धारित कालावधीतील 2-2 गोलबरोबरीची कोंडी जादा वेळेतील खेळात फुटू शकली नाही. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटवर 4-3 गोलफरकाने बाजी मारत कोलकात्याच्या एटीके मोहन बागानने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत प्रथमच विजेतेपद मिळविले.

रंगतदार आणि प्रेक्षणीय ठरलेला सामना शनिवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.

पेनल्टी शूटआऊटमध्ये गोलरक्षक विशाल कैथ पुन्हा एकदा एटीके मोहन बागानच्या विजेतेपदाचा शिल्पकार ठरला. त्याने बंगळूरच्या ब्रुनो सिल्वा याचा तिसरा फटका अडविला. नंतर बंगळूरच्या पाब्लो पेरेझ याचा फटका क्रॉसबारवरून गेला आणि एटीके मोहन बागानचे प्रशिक्षक हुआन फेर्रांडो आणि खेळाडूंनी एकच जल्लोष केला.

एटीके मोहन बागानच्या दिमित्री पेट्राटोस, लिस्टन कुलासो, कियान गिरी व मनवीर सिंग यांनी अचूक नेम साधला. बंगळूरतर्फे अचूक फटका मारण्यात ॲलन कॉस्ता, रॉय कृष्णा, सुनील छेत्री यांनाच यश आले.

सामन्यातील निर्धारित वेळेत पहिले दोन्ही गोल पेनल्टी फटक्यावर झाले. दिमित्री पेट्राटोस याने 14 व्या मिनिटास एटीके मोहन बागानचे खाते उघडल्यानंतर 45+4व्या मिनिटास बदली खेळाडू सुनील छेत्री याने बंगळूरला बरोबरी साधून दिली.

78 व्या मिनिटास रॉय कृष्णा याचे हेडिंग भेदक ठरल्यामुळे बंगळूरने आघाडी घेतली. मात्र 85 व्या मिनिटास पुन्हा एकदा दिमित्री पेट्राटोसचा पेनल्टी फटका अचूक ठरल्यामुळे एटीके मोहन बागानला बरोबरी साधता आली.

बंगळूरने 2017-18 मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्यानंतर 2018-19 मध्ये सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील पहिल्यांदा आयएसएल करंडक जिंकला होता. आता त्यांना दुसऱ्यांदा उपविजेतेपद मिळाले. फातोर्डा येथेच 2020-21मध्ये एटीके मोहन बागान संघ उपविजेता ठरला होता. यावेळस त्यांनी करंडक जिंकण्याचे स्वप्न साकार केले.

सलग दुसऱ्या वर्षी सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटवर लागला. गतमोसमात (2021-22) फातोर्डा येथे अंतिम लढतीत 1-1 गोलबरोबरीनंतर केरळा ब्लास्टर्सला पेनल्टींवर 3-1 असे नमवून हैदराबादने आयएसएल करंडक पटकावला होता.

एटीके मोहन बागानची बरोबरी

सामना संपण्यास बारा मिनिटे बाकी असताना बंगळूरने 1-1 गोलबरोबरीची कोंडी फोडली. रोशन नाओरेम याने डाव्या कॉर्नरवरून मारलेल्या फटक्यावर एटीके मोहन बागानच्या कार्ल मॅकह्यूला चेंडू दिशाहीन करता आला नाही. फिजी देशाचा आंतरराष्ट्रीय रॉय कृष्णा याने संधीचा अचूक लाभ उठविला.

मात्र सामन्यातील पाच मिनिटे बाकी असताना कोलकात्यातील संघाच्या कियान गिरी याला गोलक्षेत्राच्या रेषेवर पाडण्याची चूक पाब्लो पेरेझ याने केली आणि एटीके मोहन बागानला आणखी एक पेनल्टी फटका मिळाला. यावेळी दिमित्रीने सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल नोंदविला.

इंंज्युरी टाईममधील काही मिनिटे बाकी असताना दिमित्रीचा ताकदवान फटक्यावर गोलरक्षक गुरप्रीत संधू पूर्णपणे चकला असता बंगळूरच्या प्रबीर दास याने गोलरेषेजवळून चेंडू परतावून लावला, त्यामुळे निर्धारित वेळेत एटीके मोहन बागानला विजय हुकला.

Indian Super League
Super League Football: धेंपो क्लब विजयासह अग्रस्थानी

पूर्वार्धातील दोन्ही गोल पेनल्टींवर

बंगळूरच्या रॉय कृष्णाच्या ‘हँडबॉल’मुळे एटीके मोहन बागानला पेनल्टी फटका मिळाला, तेव्हा ऑस्ट्रेलियन दिमित्री पेट्राटोस याने अचूक नेम साधल्यामुळे कोलकात्यातील संघाला आघाडी मिळाली.

विश्रांतीपूर्वीच्या इंज्युरी टाईममध्ये चेंडूवरील एकाग्रता गमावलेल्या एटीके मोहन बागानच्या सुभाशिष बोस याने रॉय कृष्णा याला किक मारली.

यावेळी मि बदली खेळाडू सुनील छेत्री याने अचूक फटका साधत आयएसएल स्पर्धेतील वैयक्तिक 56 गोल केला.

त्यापूर्वी, 25व्या मिनिटास एटीके मोहन बागानचा गोलरक्षक विशाल कैथ याने अफलातून चपळाई प्रदर्शित करत हावी हर्नांडेझ याचा थेट फ्रीकिक फटका उधळून लावला, त्यामुळे बंगळूरच्या बाजूने सामना झुकू शकला नाही.

छेत्री प्रारंभीच ‘सुपर सब’

सामन्याच्या चौथ्याच मिनिटास बंगळूरला सक्तीचा बदल करावा लागला. यंदा स्पर्धेत सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू गणला गेलेला 21 वर्षीय शिवशक्ती नारायणन याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले.

त्यामुळे 38 वर्षीय अनुभवी सुनील छेत्रीला खूपच लवकर बदली खेळाडू या नात्याने मैदानात यावे लागले. हवेतील चेंडूवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात शिवशक्ती व कार्ल मॅकह्यू यांच्यात टक्कर झाली. यंदा स्पर्धेत छाप पाडताना नारायणन याने सहा गोल केले.

सर्वाधिक पाठीराखे बंगळूरचे

बंगळूर, तसेच एटीके मोहन बागानसाठी अंतिम लढतीचे ठिकाण तटस्थ होते. फातोर्डा येथे शनिवारी सर्वाधिक पाठिंबा बंगळूरला होता. आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी बंगळूर येथून चाहते खास गोव्यात आले होते.

दृष्टिक्षेपात...

  • एटीके मोहन बागानच्या दिमित्री पेट्राटोसचे 23 सामन्यांत 12 गोल

  • सुनील छेत्रीचे यंदा स्पर्धेत 5, तर एकंदरीत आयएसएलमध्ये 56 गोल

  • रॉय कृष्णा याचे यावेळच्या स्पर्धेतील 22 सामन्यांत 6, तर एकूण 42 गोल

  • फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एकूण 5 वेळा आयएसएल अंतिम लढत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com