नॉर्थईस्टकडून दमदार खेळ अपेक्षित एटीके मोहन बागान दुसरे स्थान भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मंगळवारी नॉर्थईस्ट युनायटेड व एटीके मोहन बागान यांच्यात सामना होईल.

पणजी : मध्यंतरी कामगिरीत घसरण झाल्यानंतर, नॉर्थईस्ट युनायटेडने मागील दोन लढतीतून चार गुणांची कमाई केली आहे, त्यामुळे एटीके मोहन बागानविरुद्ध त्यांच्याकडून दमदार खेळ अपेक्षित आहे. त्याचवेळी कोलकात्यातील संघ पूर्ण गुणांसह दुसरे स्थान भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मंगळवारी नॉर्थईस्ट युनायटेड व एटीके मोहन बागान यांच्यात सामना होईल. एटीके मोहन बागानचे सध्या 12 लढतीनंतर 24 गुण आहेत. पहिल्या स्थानावरील मुंबई सिटीनंतर ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध पूर्ण तीन गुण प्राप्त केल्यास अंतोनियो हबास यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला तिसऱ्या क्रमांकावरील एफसी गोवावर सात गुणांची आघाडी घेता येईल. मागील लढतीत त्यांनी चेन्नईयीनला हरविले होते. एटीके मोहन बागानने स्पर्धेत भक्कम बचावाचे प्रदर्शन घडविले आहे.

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात एटीके मोहन बागानकडून पराभव पत्करलेल्या नॉर्थईस्ट युनायटेडचे सध्या 12 लढतीनंतर 15 गुण आहेत. सध्या ते पाचव्या क्रमांकावर आहेत. मागील लढतीत गुवाहाटीच्या संघाने जमशेदपूर एफसीला नमविले होते, तर त्यापूर्वी बंगळूरला बरोबरीत रोखले होते. अंतरिम मुख्य प्रशिक्षक खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने मंगळवारी पूर्ण गुणांची कमाई केल्यास प्ले-ऑफ फेरीसाठी ते दावा करू शकतील.

 

दृष्टिक्षेपात...

- पहिल्या टप्प्यात एटीके मोहन बागानचा नॉर्थईस्ट युनायटेडवर 2-0 फरकाने विजय

- एटीके मोहन बागानच्या रॉय कृष्णाचे स्पर्धेत 6 गोल, पण मागील 3 लढतीत गोलविना

- एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्जच्या स्पर्धेत 8 क्लीन शीट्स व 37 सेव्हस

- एटीके मोहन बागानने फक्त 5 गोल स्वीकारलेत, तर नॉर्थईस्ट युनायटेडवर 16 गोल

- स्पर्धेत एटीके मोहन बागानचे 12, तर नॉर्थईस्ट युनायटेडचे 15 गोल
 

संबंधित बातम्या