राज्यात गुंडप्रवृत्तीमुळे दहशतीचे वातावरण 

विलास महाडिक
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरत असल्याने पूर्णवेळ गृहमंत्र्यांची राज्याला गरज आहे.

पणजी

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात गुंडप्रवृत्तीने डोके वर काढले असून दहशतीचे वातावरण दिसण्यास सुरूवात झाली आहे. हातात तलवार घेऊन भररस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी गुन्हेगारांचा गट वाढदिवस साजरा करत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. गुन्हेगार हे सरकारी यंत्रणेला घाबरत नाही असे दिसते. यावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्ण कोलमडली असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केला. 
राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरत असल्याने पूर्णवेळ गृहमंत्र्यांची राज्याला गरज आहे. यापूर्वी त्यांनी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यासंदर्भात योग्य सुविधा पुरविण्यात अपयशी ठरले आहेत. कायदा व सुव्यवस्था तसेच ऑनलाईन शिक्षण याकडे त्यांचे लक्ष नसून फक्त खनिज वाहतुकीवर लक्ष आहे. राज्याचे प्रशासन कोलमडले असून आयएएस असलेले अधिकारी राज्याचा कारभार चालवित आहेत, अशी टीका त्यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोवा फॉरवर्डने पक्षर्बांधणी सुरू केली असून अधिकाधिक मतदारसंघापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. २०२२ साली ही निवडणूक गोवा फॉरवर्डचे प्रमुख व आमदार विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली लढवून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. 
पणजीतील गोवा फॉरवर्डच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी सांत आंद्रेच्या गोवा फॉरवर्ड गट समितीच्या अध्यक्षपदी पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी संजय कुंडईकर यांची निवड केल्याने दुर्गादास कामत यांनी त्यांचे श्रीफळ (पक्षाची निशाणी) देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी समितीमध्ये समावेश असलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे घोषित केली. चाळीस सदस्य समितीमध्ये सेबास्तियान पेरेरा, महम्मद शेख, श्रेया काणकोणकर, घनश्‍याम वेर्णेकर व जीतेंद्र नाईक यांची उपाध्यक्षपदी, ब्रेंडा फर्नांडिस, धनंजय पालकर, लक्ष्मीकांत गांवस यांची सरचिटणीसपदी, कॅरोलिन डिसोझा, येमू गांवस, निलेश बकाल यांची संयुक्त सचिव तर कुंदा नाईक यांची खजिनदार व शांतल रिवणकर यांची संयुक्त खजिनदार म्हणून निवड करण्यात आली आहे. 
सांत आंद्रे पक्ष गट समिती अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेले संजय कुंडईकर म्हणाले की, सांत आंद्रे मतदरासंघात गेल्या दोन दशकापासून वीज व पाणी समस्या आहे. या मतदारसंघाचा काहीच विकास झालेला नाही. या मतदारसंघातील नावशी येथे मरिना प्रकल्प येत असून त्याला विरोध करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित असलेले या मतदारसंघातील नेते जगदीश भोबे म्हणाले की, गेली २० वर्षे आमदार फ्रांसिस सिल्वेरा सत्तेवर आहेत मात्र या मतदारसंघासाठी एक फुटबॉल मैदान उपलब्ध करून देऊ शकले नाही. प्रत्येक निवडणुकीवेळी विकासाच्या नावाखाली मते मागून त्यानंतर ते लोकांना दिलेली आश्‍वासने विसरतात. येत्या सहा महिन्यात या मतदारसंघासाठी ‘व्हिजन प्लॅन २०२२’ लोकांसमोर ठेवला जाणार आहे. गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या मतदारसंघातील नागरिक विद्यमान आमदाराकडून काहीच विकास होत नसल्याने नाराज असल्याचे भोबे म्हणाले. 

संबंधित बातम्या