कोलवाळ कारागृहातील गुन्हेगारीला अधिकारीच जबाबदार : ऐश्वर्या साळगावकर

प्रतिनिधी
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

कोलवाळ येथील कारागृहातील गुन्हेगारीला वरिष्ठ अधिकारीच सर्वस्वी जबाबदार आहेत, असा दावा शिवसेना महिला आघाडी संघटक ऐश्वर्या साळगावकर यांनी केला आहे.

म्हापसा: कोलवाळ येथील कारागृहातील गुन्हेगारीला वरिष्ठ अधिकारीच सर्वस्वी जबाबदार आहेत, असा दावा शिवसेना महिला आघाडी संघटक ऐश्वर्या साळगावकर यांनी केला आहे.

दत्तवाडी - म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, की या कारागृहाच्या प्रशासनाशी निगडित असलेले गुरुदास पिळर्णेकर, आशुतोष आपटे, भानुदास पेडणेकर इत्यादी उच्चपदस्थ अधिकारीच त्या गैरकाराभाराला कारणीभूत आहेत. या कारागृहात कोणतेही गैरव्यवहार नाहीत असा दावा कारागृहाचे महानिरीक्षक श्री. पिळर्णेकर करीत असले तरी कैद्यांचे पलायन, कैद्यांकडे मोबाइल सापडणे, कैद्यांकडे अमली पदार्थ सापडणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे,श्री. पेडणेकर यांनी अंधपणे कामकाज न हाताळता सजगपणे स्वत:ची जबाबदारी पार पाडावी.

साहाय्यक कारागृह महानिरीक्षक आशुतोष आपटे यांच्याकडे सध्या दोन पदे देण्यात आल्याने ते दोन्ही पदांना न्याय देण्यात असमर्थ ठरले आहेत. रिक्त असलेल्या जागी चंद्रकांत हरिजन यांची अथवा अन्य योग्य व्यक्तीची निवड करणे आवश्यक आहे, असेही साळगावकर म्हणाल्या.

कारागृहात होणाऱ्या अनागोंदी कारभाराबाबत अधिकाऱ्यांना सोडून जेल गार्ड्‍सना दोषी ठरवून त्यांना बळीचे बकरे बनवले जात आहेत. अशा निम्नस्तरीय कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठवून त्यांची विनाकरण छळणूक करू नये. अलीकडेच कारागृहात साठपेक्षा जास्त वयोमान असलेल्या कैद्याने आरोग्यविषयक तक्रार मांडली असतानाही त्याच्याकडे तब्बल चार तास दुर्लक्ष करण्यात आले. तो गुन्हेगार असला तरी मानवतेच्या दृष्टीने त्याच्याकडे बघणे आवश्यक होते. अखेर तो कैदी कोविड रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले होते, असेही ऐश्वर्या साळगावकर म्हणाल्या.

भानुदास पेडणेकर हे शासकीय जबाबदारी हाताळण्यात असमर्थ ठरत असून ते कामकाजाच्या वेळाही व्यवस्थित पाळत नाहीत, असा दावा करून ऐश्वर्या साळगावकर म्हणाल्या, या कारागृहाचे वरिष्ठ अधिकारी गुरुदास पिळर्णकर मुख्यमंत्र्यांची तसेच गोमंतकीय जनतेची दिशाभूल करीत आहेत. या कारागृहाच्या आवारात कडक पहारा आणि तपासणी असतानाही तिथे मोबाइल संचाद्वारे व्हिडिओ चित्रीकरण कसे काय होऊ शकते, असा सवालही त्यांनी केला आहे.
 

संबंधित बातम्या