डिचोलीतील बसस्थानक प्रकल्प प्रतीक्षेत 

प्रतिनिधी
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

पावसाळ्यानंतर बांधकामाला चालना मिळण्याचे संकेत

डिचोली:  वर्षापूर्वी पायाभरणी करण्यात आलेला डिचोलीतील नियोजित अत्याधुनिक बसस्थानक प्रकल्प बांधकामाला अद्यापही चालना मिळाली नसून, या बसस्थानकाच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरवात कधी होतेय, त्याची डिचोलीवासीयांना प्रतीक्षा आहे. 

या बसस्थानक प्रकल्पाच्या आराखड्याला मान्यता मिळाली असून, पहिल्या हप्त्यापोटी पाच कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

त्यामुळे अत्याधुनिक बसस्थानकाच्या बांधकामाला चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. सध्या कोरोना महामारी संकटामुळे या प्रकल्पाचे काम रेंगाळले असल्याचे समजते. बहुतेक करून पावसाळ्यानंतर हे काम मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. डिचोलीत सर्व सोयीसुविधांनीयुक्‍त अशा अत्याधुनिक बसस्थानक उभारण्याचा प्रस्ताव आहे. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे १५ कोटी खर्चून डिचोलीत कलात्मक असे अत्याधुनिक बसस्थानक बांधण्यात येणार आहे. मागील वर्षी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ८ मार्च रोजी केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते या नियोजित बसस्थानक प्रकल्पाची कोनशिलाही बसविण्यात आली आहे. मात्र, अद्याप प्रस्ताव मार्गी लागलेला नाही. नियोजित बसस्थानक प्रकल्पाचे स्वप्न प्रत्यक्षात कधी येते, त्याची डिचोलीवासीयांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. 

२३ वर्षांपूर्वीचे बसस्थानक जर्जर
२३ वर्षापूर्वी बांधण्यात आलेले सध्याचे कदंब बसस्थानक जर्जर झाले आहे. त्यामुळे डिचोलीसाठी नवीन बसस्थानकाची अत्यंत आवश्‍यकता आहे. सध्याच्या बसस्थानकाच्या जागेतच नवीन अत्याधुनिक बसस्थानक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. नियोजित बसस्थानकाची कोनशिला बसवण्यात आल्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि नंतर आराखड्यातील बदलामुळे बसस्थानकाचे काम लांबणीवर पडले. त्यातच मागील मार्च महिन्यापासून ओढवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे बसस्थानकाचे काम पुन्हा रखडले. शहरातील मॉडर्न फायर स्टेशन आणि केंद्रशाळा इमारत प्रकल्पाच्या कामाला चालना मिळाली असली, तरी बसस्थानक या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम मार्गी लागलेले नाही. बसस्थानकाच्या कामाला कधी एकदाची चालना मिळते, त्याकडे डिचोलीवासीयांबरोबरच, बसवाले आणि प्रवासीवर्गाचे डोळे लागले आहेत.

 

संबंधित बातम्या