गोव्यात कोळसा वाहतुकीच्या विरोधात जनमत तयार करण्याचा प्रयत्न

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

म्हापसा, हळदोणे, अस्नोडा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभांना चांगल्यापैकी प्रतिसाद लाभलेला होता. अन्य काही ठिकाणीही छोटेखानी बैठका घेऊन कोळसा वाहतुकीच्या विरोधात जनमत तयार करण्यात येत आहे.

म्हापसा: बार्देशात कोळशाच्या विरोधात व्यापक जनजागृती करण्याचे कार्य ‘गोंयचो एकवोट’तर्फे अन्य काही समविचारी संस्थांच्या सहकार्याने हाती घेण्यात आले असून, स्थानिक लोकांच्या मागणीनुसार गावोगावी सभांचे आयोजन करण्यात येत आहे.

म्हापसा, हळदोणे, अस्नोडा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभांना चांगल्यापैकी प्रतिसाद लाभलेला होता. अन्य काही ठिकाणीही छोटेखानी बैठका घेऊन कोळसा वाहतुकीच्या विरोधात जनमत तयार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या सभांमध्ये ख्रिस्तीबांधवांचा चांगल्यापैकी सहभाग लाभत आहे. या आंदोलनासंदर्भात सह्यांच्या मोहिमेला चांगल्यापैकी प्रतिसाद लाभत आहे, अशी माहिती या आंदोलनातील एक वक्ता स्वप्तील शेर्लेकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली. या विषयासंदर्भात गोव्यात आतापर्यंत सुमारे साठ सभा घेण्यात आल्या येत्या काही दिवसांत मोरजी, आसगाव या ठिकाणी सभा घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

दक्षिण पश्चिम रेल्वे रूळ दुपरीकरण प्रकल्पासंदर्भात बोलताना ‘गोंयचो आवाज’चे सहसंयोजक कॅप्टन वेरेनितो फर्नांडीस म्हणाले, की होस्पेट-तिनईघाट ते वास्को बंदर या सुमारे ३४५ किलोमीटर मार्गावर येथील विद्यमान रेल्वे रुळाचे दुपदरीकरण हे रूळ कर्नाटक आणि गोवा येथील वन्य क्षेत्रातून जातात. त्यात अन्शी-दांडेली व्याघ्रप्रकल्प (एडीटीआर कर्नाटक) व भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य (बीएमडब्ल्यूएलएस गोवा) या दोन वनक्षेत्रांचा तसेच चांदोर, माजोर्डा, कासावली, वेळसांव-पाले व इतर भागांतील दाट लाकवस्ती असलेल्या वारसा क्षेत्रांचा समावेश आहे.

या सभांमध्ये मार्गदर्शन करणारे कुंकळ्ळी येथील डॉ. जॉर्सन म्हणाले, की अदानी, जिंदाल, वेदान्ता व त्यांच्या संबंधित उद्योगांच्या नफ्याचे संरक्षण करण्यासाठीच आणि कोळशाची वाहतूक रस्ते (राष्ट्रीय हमरस्ता ४अ आणि राष्ट्रीय हमरस्ता १७ब), नदी मार्गे ८५ एमटीपीए) व रेल्वे मार्गे (५१ एमटीपीए) करण्यासाठी या प्रकल्पांची संकल्पना करण्यात आली आहे, असा दावाही त्यांनी केला.

प्रकल्पाला विरोध करण्यासंदर्भातील कारणे स्पष्ट करताना ते म्हणाले, भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य व मोले राष्ट्रीय उद्यान येथील संरक्षित क्षेत्रातील झाडे कापल्याने पर्यावरणीय हानी होईल. ही अभयारण्ये पश्चिम घाटात समाविष्ट असून, हा भाग युनेस्को जैवविविधता हॉटस्पॉट या स्वरूपात आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिूचित आहे. दूधसागर धबधब्याच्या नाशामुळे तिसवाडी व फोंडा या तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या खांडेपार नदीत पाण्याची टंचाई निर्माण होईल. सत्तरी तालुक्यातील रगडा नदीवरही मोठा परिणाम होईल. अन्य नद्यांच्याही पाण्याच्या दर्जावर विपरीत परिणाम होईल. पर्यटन व संलग्न व्यवसाय उद्‍ध्वस्त होऊन हजारो कुटुंबांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल. उच्च वेग व अति भार असलेल्या डब्यांमुळे जुनी पारंपरिक घरे आणि प्राचीन धार्मिक वास्तूंची हानी होईल. ध्वनिप्रदूषणामुळे निद्रानाश झाल्याने पुरेशा झोपेच्या अभावामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. रेल्वे रुळांमुळे गावांतले व शाळा, रुग्णालये, बाजारपेठा इथे जाण्याचा मार्गांचे कायमस्वरूपी विभाजन होईल. ट्रांझमिशन लाइन्समुळे जमीन मालमत्तेचे मूल्य कमी होईल व नारळ, सुपारी वगैरेंची तसेच अन्य फलोत्पादनाबाबत बागायतींची सुपिकता कमी कमी होत जाईल.

कोळसा धुळीच्या घातकतेसंदर्भात स्वप्तील शेर्लेकर म्हणाले, कोळशाच्या धुळीचे कण फुप्फुसात जमतात आणि नैसर्गिकरीत्या शरीरातून बाहेर पडत नाहीत. फुप्फुसाचा कर्करोग, हृदयरोग, दमा त्याचप्रमाणे श्वसनाचे विकार व त्वचेचे विकार होऊ शकतात. गोव्यात वास्को येथे वाढलेले ‘कोविड १९’ रुग्ण व मृत्यू हे कोळसा धुळीमुळे कमी झालेल्या प्रतिकारशक्तीमुळे असण्याची शक्यता आहे. कोळसा धूळ दीर्घ काळ वातावरणात पसरून राहते आणि वारा आणि हवामानाच्या स्थितीनुसार कित्येक किलोमीटर दूर उडू शकते. आम्ही आमच्या मुलांचा मृत्यू श्वसनाचे विकार होऊ देणार नाही. कोळशाच्या धुळीने युक्त असलेले वाहून जाणारे पाणी परिसरातील जलसाठे प्रदूषित करते आणि समुद्री जीवनाचा नाश करते. आम्हाला दूषित पाणी पिऊन मरायचे नाही. कोळसा धूळ अखेरीस आपल्या भातशेतीची आणि नारळ बागायतीची मोठी हानी करणार आहे. नाले, वन-वनस्पती आणि जैविक विविधता यांचाही विनाश होईल. आम्हाला आमची शेती व मागायतीचा नाश बघायचा नाही.

अशा विविध कारणांस्तव रेल्वे रुळाचे दुहेरीकरण, पॉवर ट्रांझमिशन लाइन्स व महामार्ग प्रकल्प यांना गोमंतकीयांनी विरोध करावा व त्यासंदर्भातील सह्यांच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन ‘गोंयचो एकवोट’तर्फे करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या