हरमल किनारी देशी पर्यटकांच्या वाहनांचा उच्छाद

प्रतिनिधी
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

येथील किनारी भागांत सध्या देशी पर्यटक मोठ्याप्रमाणात तर विदेशी पर्यटक तुरळक प्रमाणात दिसून येतात.मात्र देशी पर्यटकांच्या वाहनांनी उच्छाद मांडला असून किनारी भागात चालु असलेल्या ह्या बेजबाबदार पणामुळे किनाऱ्यास ''आई-वडील'' नाहीत का असा संतप्त सवाल माजी पंच बाबुश फर्नांडिस यांनी व्यक्त केला.

हरमल:  येथील किनारी भागांत सध्या देशी पर्यटक मोठ्याप्रमाणात तर विदेशी पर्यटक तुरळक प्रमाणात दिसून येतात.मात्र देशी पर्यटकांच्या वाहनांनी उच्छाद मांडला असून किनारी भागात चालु असलेल्या ह्या बेजबाबदार पणामुळे किनाऱ्यास ''आई-वडील'' नाहीत का असा संतप्त सवाल माजी पंच बाबुश फर्नांडिस यांनी व्यक्त केला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुजोर व उद्दाम पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी फर्नांडिस यांनी केली आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर सध्या पर्यटक, व्यावसायिक व स्थानिक ग्रामस्थ बरीच काळजी घेताना दिसतात. मात्र काही उद्दाम देशी पर्यटक चक्क किनाऱ्यावर दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन चकरा मारताना दिसत असल्याने पंच फेर्नांडिस यांनी संताप व्यक्त केला.हरमल गांव ह्या किनाऱ्यामुळे जगात प्रसिद्ध आहे व त्या किनाऱ्यावर मनमानी व हानी पोचवण्याचे काम पर्यटकांनी करावे हे दुर्लक्षून चालणारे नाही असे मत फर्नांडिस यांनी व्यक्त केले.पाण्यातुन गाड्या चालवून किनाऱ्याच्या पृष्ठभागावर मातीत शिंपल्यात जन्म घेणारे चविष्ट पदार्थांची नासाडी करण्याचे पातक ही मंडळी करीत आहेत.स्थानिक मश्चिमार बांधव तसेच कित्येक महिला सकाळ संध्याकाळ शिंपलेवजा मासोळी (स्थानिक भाषेत मांनोळे,घुल्यो वगैरे) गोळा करीत असतात, त्यांची रोजीरोटी व उदरनिर्वाहावर परिणाम होत असल्याचे माजी पंच फर्नांडिस यांनी सांगितले.त्या शिंपल्या अतिशय चविष्ट तर असतात शिवाय गरम मसालायुक्त पदार्थ खाण्यात औरच मजा असते असे माजी पंच फर्नांडिस यांनी सांगितले.किनाऱ्यावर आवश्यक गाड्या वगळता,पर्यटकांच्या गाड्यांना पूर्णत बंदी घालण्याची मागणी माजी पंच फर्नांडिस यांनी केली आहे.

किनारी गस्त कागदावरच 
किनारी भागांत पर्यटन हंगामात, पोलीस व पर्यटन विभागाचे पोलिस तैनात असल्याचे समजते.पर्यटन हंगामात त्यांची सेवा बेभरवंशाची असली तरी सध्याच्या कोविडच्या स्थितीत त्यांची सेवा अव्याहतपणे व्हायला पाहिजे असे फर्नांडिस यांनी सांगितले.सध्याचे किनाऱ्यावरील प्रकार म्हणजे पोलिस दलाची अकार्यक्षमता असून त्यांना रोखणे पोलिसांनाच शक्य असल्याचे मत पंच बाबुश फर्नांडिस यांनी सांगितले.पोलिसांनी नेहमीच कर्तव्यदक्षपणे भूमिका निभावली असून अनेक घटनांचा तपास रेंगाळला असला तरी कायदा सुव्यवस्था राखण्याचे कार्य तत्परतेने केले आहे.

पोलिसांनी किनारी भागांतील गस्त फक्त कागदावरच न करता प्रत्यक्षात गस्तीचे काम करून सर्वच बेकायदा व्यवहार व घटनांना आवर घालण्याची तसेच दंडात्मक कारवाई करण्याची मागणी माजी पंच फेर्नांडिस यांनी केली आहे.

तरी पेडणे पोलिस निरीक्षक व आऊट पोस्टच्या कर्मचाऱ्यांनी ह्या प्रश्नी जातिनिशी लक्ष घालून स्थनिक लोकांच्या उदरनिर्वाहाचे रक्षण करावे व बेकायदेशीर घटनांना आळा घालावा अशी मागणी सर्व थरांतून केले जात आहे.

संबंधित बातम्या