चिखली पंचायत क्षेत्रातील स्मशानभूमीची दुरावस्था

मृत व्यक्तीच्या अंत्यविधी साठी लागणारे सामान व इतर खर्चासाठी दहा हजार रुपये खर्च करण्यासाठी देण्यात येतात व शिल्लक रक्कम परत फंडात जमा केली जाते.
चिखली पंचायत क्षेत्रातील स्मशानभूमीची दुरावस्था
चिखली पंचायत क्षेत्रातील स्मशानभूमीDainik Gomantak

दाबोळी: चिखली पंचायत क्षेत्रात हिंदूंच्या दोन स्मशानभूमी (Cemetery) असूनही त्या ठिकाणी सध्या उदभवलेल्या परिस्थितीमुळे मृतदेह तिरडीवरुन वाहून नेणे कठीण व अत्यंत जिकरीचे बनले आहे. कारण आजूबाजूच्या कोमुनिदाद जागेत जमीन सपाटीकरण करण्यासाठी टाकलेल्या मातीचे ढिगारे तसेच ठेवल्याने स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग खडतर व अडथळ्यांचा बनला आहे. चिखली पंचायतीने यात त्वरित लक्ष घालून स्मशानभूमीकडे जाणारा कच्चा रस्ता मोकळा करून द्यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

चिखलीत पोर्तुगीज काळापासून चिखली ग्रामस्थांसाठी (villagers) स्मशानभूमीसाठी जागा असून चिखली, आसय डोंगरी, नाकेली व देवूसवाडा या गावातील सुमारे 50 हिंदू कुटुंबे या जागेचा उपयोग करतात. सदर स्मशानभूमी दोन हजार चौरस मीटर जागेत व्यपलेली असून सन 1974 साली झालेल्या सर्वेक्षणात या जमिनीचा हिंदू स्मशानभूमी असा उल्लेख आहे. कैक वर्षांची ही स्मशानभूमीची जागा अत्यंत गैरसोयीचे व कसलीही सुविधा नसल्याने गैरसोयीची ठरल्याने येथील प्रसिद्ध उद्योगपती नाना बांदेकर यांनी सन 2010 साली ती बांधून दिली होती. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी सोय झाली होती.

चिखली पंचायत क्षेत्रातील स्मशानभूमी
वर्षभरात पुर्ण होणार दाबोळी विमानतळाचे काम ; गगन मलिक

एक समशानभूमी असताना हाकेच्या अंतरावर चिखली जिल्हा पंचायततर्फे (Panchayat) आणखीन दुसरी एक समशानभूमी बांधण्यात आली. परंतु त्याचा वापर विशेषकरून होत नाही. सरकारी पैशातून बांधलेल्या या स्मशानभूमीत पाण्याची व्यवस्था नाही. आश्रयासाठी एखादे छप्पर नाही की अंत्यविधीसाठी लाकडे ठेवण्याची व्यवस्था नाही. विशेष म्हणजे या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्का रस्ताहि करण्यात आला नाही. जिल्हा पंचायतीने मनावर घेतले असते तर या दोन्ही स्मशानभूमीसाठी रस्ता तयार झाला असता. चिखली कोमुनिदादची आजूबाजूला मोठी जागा असल्याने ग्रामस्थांना रस्ता तयार करणे शक्य झाले नाही.

दरम्यान सोमवारी चिखली गावचे ज्येष्ठ नागरिक व येथील एका संस्थानचे माजी अध्यक्ष हरी नारायण गावडे व विद्यमान अध्यक्ष हनुमंत गावडे हे स्मशानभूमीची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना धक्काच बसला. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या वाटेवर मातीचे ढिगारे उपसल्याने रस्ताच बंद झाला आहे. तरीही त्याच ढीगाऱ्यावरुन व काट्याकुट्यातून मार्ग शोधीत स्मशानभूमीकडे जाताना त्यांची दमछाक झाली. माणसाला चालणे जेथे शक्य होत नाही, तेथे मृतदेह कसा न्यावा असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

चिखली पंचायत क्षेत्रातील स्मशानभूमी
कामगार सेनेच्या आंदोलनामुळे दाबोळी विमानतळावर प्रवाशांचे हाल

एकूण प्रकार लक्षात घेऊन चिखली पंचायतीने त्वरित या जागेची पाहणी करावी व रस्ता मोकळा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चिखली ग्रामस्थांनी स्मशानभूमीची जागा आपल्या ताब्यात देण्यासाठी पंचायतीच्या एका पंचा मार्फत स्मशानभूमी संबंधीची सर्व कागदपत्रे चिखली पंचायतीकडे सुपूर्द केली होती. परंतु चिखली पंचायतीने त्यावेळी या संस्थेकडून ना हरकत दाखला काढण्याची मागणी केली होती.कोमुनिनाद कडून हा ना हरकत दाखला मिळाला नसल्याने या स्मशानभूमीच्या घोंगडे भिजत पडले आहे.

मृत व्यक्तीच्या कुटुंबाला आधार देणारी कर्ज योजना.

पोर्तुगीज (Portuguese) काळापासून चिखली ग्रामस्थांतर्फे 'कल'(पोर्तुगीज कालीन शब्द) ही योजना राबवण्यात येत आहे. गावातील एखादी व्यक्ती मृत पावली की त्याच्या अंत्यविधीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी प्रत्येकाकडून ठराविक रक्कम गोळा करण्यात येते व त्या पैशातून अंत्यविधीचा सर्व खर्च करण्यात येतो. खर्च करून राहिलेले शिल्लक त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबाला देण्यात येते. चार आण्यापासून सुरू झालेली ही योजना आता चाळीस रुपये पर्यंत पोहोचली आहे. सध्या 264 पुरुष व महिला धरून चाळीस रुपये जमा करतात.

मृत व्यक्तीच्या अंत्यविधी साठी लागणारे सामान व इतर खर्चासाठी दहा हजार रुपये खर्च करण्यासाठी देण्यात येतात व शिल्लक रक्कम परत फंडात जमा केली जाते.10 हजार रकमेपैकी काही रक्कम शिल्लक राहिल्यास ती मृत व्यक्तीच्या कुटुंबाला देण्यात येते. सामान- सुमान गोळा करेपर्यंत अंत्यविधी पर्यंतचे सर्व सोपस्कार ग्रामस्थ मिळून करतात. विशेष म्हणजे या योजनेत काही ख्रिश्चन धर्मीय ग्रामस्थांचा सहभाग आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com