बायंगिणीत मोन्सेरात-फळदेसाईंची प्रतिष्ठा पणाला!

तीन मतदारसंघाची समस्या : बायंगिणी कचरा प्रकल्पाचे होणार तरी काय?
बायंगिणीत मोन्सेरात-फळदेसाईंची प्रतिष्ठा पणाला!
Bainguinim Solid Waste Management ProjectDainik Gomantak

पणजी : तीन मतदारसंघांतील कचऱ्याची समस्या ज्या प्रकल्पामुळे कायमची निकालात निघणार आहे, त्या प्रस्तावित बायंगिणी कचरा प्रक्रिया प्रकल्पाला कुंभारजुवे मतदारसंघातून विरोध होत आला आहे. या प्रकल्पाविषयी हरकती मागविण्याची सूचना कचरा व्यवस्थापन महामंडळाने काढली, त्यानंतर तत्काळ काँग्रेसचे आमदार राजेश फळदेसाई यांनी या प्रकल्पाविरोधात लोकांना बरोबर घेऊन विरोध दर्शविला. तर दुसरीकडे या प्रकल्पासाठी आग्रही असलेले कचरा व्यवस्थापन मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी हा प्रकल्प होणारच अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे दिसते.

पणजी महापालिकेच्या मालकीची ही जागा असल्याने महापालिकेला आपला स्वतःचा कचरा प्रक्रिया प्रकल्प असावा म्हणून वाटत आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या काळात या प्रकल्पाची अधिसूचना जारी झाली होती. परंतु त्यानंतर बरेच पाणी पुलाखालून गेले आणि निर्मनुष्य असलेल्या पठारावर टोलेजंग इमारती उभारल्या जाऊ लागल्या. आजतागायत या परिसरात इमारती उभारल्या जात आहेत. विशेष बाब म्हणजे या ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा वाद सुरू असल्याचे माहीत असूनही लोक याठिकाणी फ्लॅट घेत आहेत. तर नगर नियोजन खाते इमारतींना परवानगी देत असल्याने जुने गोवे पंचायत त्या बिल्डरांना बांधकाम परवानगी देत असल्याचे येथील सरपंच मेघश्‍याम पर्वतकर यांचे म्हणणे आहे.

येथील प्रस्तावित कचरा प्रक्रिया प्रकल्पास जुने गोवे, करमळी येथील लोकांनी विरोध केला आणि आजपर्यंत तो कायम आहे. 2019 मध्ये महापौर उदय मडकईकर यांना या लोकांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले होते. त्यावेळी लोकांनी महापालिकेचा जो कचऱ्याचा ट्रक अडविला होता. त्यामुळे मडकईकर तिथे सायंकाळी पोहोचले पण लोकांचा विरोध पाहता त्यांनी तेथूनच काढता पाय घेतला.

विरोधाची काय कारणे?

सरकारच्या म्हणण्यानुसार प्रकल्पातील कचरा व्यवस्थित हाताळला जाणार नाही. या प्रकल्पामुळे वारसास्थळांवर परिणाम होऊ शकतो. तसेच करमळी तलावातील पाणी खराब होऊ शकते. याशिवाय कदंबा पठरावर राहणाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती लोकांना आहे.

Bainguinim Solid Waste Management Project
‘सिंडिकेट’ घोटाळा 500 कोटींचा!

माजी आमदार मडकईकर होते विरोधात

कुंभारजुवेचे भाजपचे माजी आमदार पांडुरंग मडकईकर यांनी बायंगिणी कचरा प्रकल्पास विरोध केला होता. आम्ही लोकांसोबत राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. कचरा प्रक्रिया प्रकल्प होऊ देणार नाही, ही त्यांची भूमिका राहिली. विशेष बाब म्हणजे त्यांच्या पत्नी जुने गोवेच्या सरपंच जनिता मडकईकर याही या प्रकल्पाविरोधात राहिल्या.

लोबोंची भूमिका काय राहणार?

जून 2019 मध्ये पणजी पालिकेचे कचरा ट्रक साळगाव प्रकल्पात जाताना अडवले होते. तेव्हा शहरातील कचरा कुठे टाकायचा हा प्रश्‍न निर्माण झाला होता. तत्कालीन मंत्री मायकल लोबो यांनी पणजीसाठी छोटे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे आश्‍वासन दिले होते. तसेच बायंगिणीचेही काम पुढे नेऊ,असे सांगितले होते. आता बाबूश हे कचरा व्यवस्थापन मंत्री असून, आमदार लोबो हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे आता त्यांची भूमिका काय राहणार हे पहावे लागेल.

प्रकल्पाला विरोध कायम

कुंभारजुवेचे काँग्रेसचे आमदार राजेश फळदेसाई हे निवडून आले. यापूर्वी सत्ताधारी आमदार असूनही मडकईकरांनी या प्रकल्पास विरोध केला होता. आमदार फळदेसाई यांनी जुने गोवे ग्रामस्थ आणि कदंब पठरावरील रहिवाशांना घेऊन रविवारी (19) मोर्चा काढला. सरकारने हा प्रकल्प स्थलांतरित करावा. तरीही प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न झाला, तर रस्त्यावर प्रथम आपण आडवे झोपू, अशी भूमिका घेतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com