देवतांची विटंबना करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घाला

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

दिपावलीच्या निमित्ताने प्रदूषणकारी आणि देवतांची विटंबना करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालावी, तसेच चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी कायम ठेवावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कुचेली :  दिपावलीच्या निमित्ताने प्रदूषणकारी आणि देवतांची विटंबना करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालावी, तसेच चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी कायम ठेवावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हिंदू जनजागृती समितीने निवेदनात पुढे म्हटले आहे की, फटाक्यांच्या वेष्टनांवर हिंदू देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे छापली जातात. हे फटाके फोडल्यावर त्यांवरील देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांच्या चिंधड्या उडून त्या जागोजागी पडलेल्या आढळतात. त्यामुळे देवतांची विटंबना आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान होऊन कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय अस्मितांवर आघात होत आहेत. अशा फटाक्यांची निर्मिती आणि विक्री शासनाने थांबवावी. चीनच्या कपटनीतीमुळे भारत-चीन सीमेवर गेले काही महिने तणाव निर्माण झाला आहे. चीनने भारताच्या भूमीत अतिक्रमण केले, तसेच सैन्यावर आक्रमणही केले होते. या पार्श्‍वभूमीवर भारत सरकाराने चीनच्या आर्थिक नाड्या आवळायला आरंभ केला आहे. काही महिन्यांपूर्वी भारताने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. गेल्या वर्षी भारत सरकारने चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घातली होती. यंदाही चिनी फटाक्यांवरील बंदी कायम रहावी, यासाठी भारत सरकारने जागृती करावी, अशीही मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

संबंधित बातम्या