कामगिरी सुधारण्याच्या प्रतीक्षेत बंगळूर पाच सामने विजयाविना असलेल्या संघाची केरळा ब्लास्टर्सशी गाठ

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 19 जानेवारी 2021

बंगळूर एफसी संघ सध्या संघर्ष करताना दिसत असून सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत कामगिरी सुधारण्याच्या प्रतीक्षेत आहे.

पणजी: बंगळूर एफसी संघ सध्या संघर्ष करताना दिसत असून सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत कामगिरी सुधारण्याच्या प्रतीक्षेत आहे. सलग पाच सामने विजयाविना असलेल्या या संघाची गाठ बुधवारी  केरळा ब्लास्टर्सशी पडेल.

बंगळूर व केरळा ब्लास्टर्स यांच्यातील सदर्न डर्बी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर रंगेल. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात बंगळूरने केरळा ब्लास्टर्सला हरविले होते, मात्र त्यानंतर परिस्थिती खूपच बदलली असून बंगळूरच्या संघाची कामगिरी कमालीची खालावली. स्पेनचे प्रशिक्षक कार्ल्स कुआद्रात यांना मायदेशी परतावे लागले, तर आता जबाबदारी नौशाद मूसा यांच्यावर आहे. बंगळूरचे आक्रमण निस्तेज बनले आहे.

मागील पाच सामन्यात त्यांना दोनच गोल नोंदविता आले आहेत. एकंदरीत 11 सामन्यात तीन विजय, चार बरोबरी व चार पराभवासह त्यांच्या खाती 13 गुण आहेत. अगोदरच्या लढतीत त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध बरोबरी साधली होती. सलग आठ लढतीत त्यांना क्लीन शीट राखता आलेली नाही ही चिंतेची बाब आहे.

किबु व्हिकुना यांच्या मार्गदर्शनाखालील केरळा ब्लास्टर्स संघात सातत्याचा अभाव आहे. त्यामुळे 11 लढतीनंतर 10 गुणांसह ते दहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी दोन विजय, चार बरोबरी व पाच पराभव अशी कामगिरी केली आहे. केरळा ब्लास्टर्सची मदार त्यांचा आघाडीफळीतील हुकमी स्ट्रायकर जॉर्डन मरे याच्यावर असेल.

मागील काही लढतीत त्याने जबरदस्त फॉर्म प्रदर्शित केला आहे. जमशेदपूरला नमविल्यानंतर ईस्ट बंगालविरुद्ध मागील लढतीत इंज्युरी टाईममध्ये गोल स्वीकारल्यामुळे केरळा ब्लास्टर्सला बरोबरीवर समाधान मानावे लागले. या संघाचा बचाव कमजोर ठरला आहे.

 

देल्गाडोची अनुपस्थिती

प्रमुख स्पॅनिश मध्यरक्षक दिमास देल्गाडो याची अनुपस्थिती बुधवारी बंगळूरला जाणवू शकते. अतिशय तातडीच्या कौटुंबीक कारणास्तव त्याला मायदेशी जावे लागले आहे. यंदाच्या मोसमात दिमासने एक गोल व एका असिस्टची नोंद केलेली आहे. दिमास संघातील महत्त्वाचा खेळाडू होता, पण हे फुटबॉल आहे. अन्य दर्जेदार खेळाडू संघात असल्याचे मूसा यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला नमूद केले.

 

दृष्टिक्षेपात...

- स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात फातोर्डा येथे बंगळूरची केरळा ब्लास्टर्सवर 4-2 फरकाने मात

- केरळा ब्लास्टर्सच्या जॉर्डन मरे याचे स्पर्धेत 6 गोल

- मागील 5 लढतीत बंगळूरचे 4 पराभव, 1 बरोबरी

- स्पर्धेत बंगळूरचे 13, तर केरळा ब्लास्टर्सचे 14 गोल

- केरळा ब्लास्टर्सवर प्रतिस्पर्ध्यांचे सर्वाधिक 20 गोल

- स्पर्धेत बंगळूर व केरळा ब्लास्टर्सच्या प्रत्येकी 2 क्लीन शीट्स.

संबंधित बातम्या