आणखी नामुष्की टाळण्यासाठी बंगळूरची धडपड तळाच्या ओडिशाचे आव्हान; जमशेदपूरविरुद्ध हैदराबादचे पारडे जड

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 23 जानेवारी 2021

माजी विजेत्या बंगळूर एफसीची सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सध्या दयनीय स्थिती आहे.

पणजी : माजी विजेत्या बंगळूर एफसीची सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सध्या दयनीय स्थिती आहे. प्रशिक्षक बदलूनही त्यांती घसरण कायम आहे. मागील सहा लढतीत पाच पराभव आणि बरोबरीचा एक गुण त्यांनी प्राप्त केलेला आहे. रविवारी (ता. 24) तळाच्या ओडिशा एफसीविरुद्ध खेळताना आणखी नामुष्की टाळण्यासाठी त्यांची धडपड असेल.

बंगळूर आणि ओडिशा यांच्यातील सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. याव्यतिरिक्त रविवारी वास्को येथील टिळक मैदानावर सलग तीन सामने पराभूत झालेल्या जमशेदपूर एफसीसमोर मागील चार लढतीत अपराजित राहत आठ गुणांची कमाई केलेल्या हैदराबाद एफसीचे आव्हान असेल. सध्याचा फॉर्म पाहता, हैदराबादचे पारडे जड असून त्यांना पहिल्या चार संघांत स्थान राखण्याची संधी आहे. हैदराबादने 12 लढतीत चार विजय, पाच बरोबरी व तीन पराभवासह 17 गुण नोंदवून सध्या चौथा क्रमांक मिळविला आहे. जमशेदपूर एफसी संघाने 12 सामन्यात तीन विजय, चार बरोबरी व पाच पराभवासह 13 गुण प्राप्त केले आहे, ते सध्या आठव्या स्थानी आहेत.

 

बंगळूरची स्थिती बिकट

अंतरिम प्रशिक्षकपदी नौशाद मूसा यांची नियुक्ती होऊनही बंगळूरची कामगिरी सुधारलेली नाही. त्यांची घसरण कायम राहिल्या स्टुअर्ट बॅक्स्टर यांच्या मार्गदर्शनाखालील ओडिशा एफसी त्यांना धक्का देऊ शकेल. भुवनेश्वरच्या संघाने मागील सहा लढतीतून आठ गुणांची कमाई करताना दोन सामनेही जिंकले आहेत. बंगळूरचा हुकमी खेळाडू सुनील छेत्री याला तीन लढतीत गोल नोंदविता आलेला नाही. त्यातच त्यांची बचावफळीही कोलमडली असून त्यांनी 16 गोल स्वीकारले आहेत. सध्या बंगळूरने 12 सामन्यांतून तीन विजय, चार बरोबरी व पाच पराभव या कामगिरीसह 13 गुणांची कमाई केली आहे. सध्या ते सातव्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे ओडिशाने 12 लढतीत एक विजय, चार बरोबरी व सात पराभवासह सात गुण नोंदविले आहे, ते तळाच्या अकराव्या क्रमांकावर आहेत.

 

जमशेदपूर संघात दोन नवे खेळाडू

कामगिरीत संघर्ष करणाऱ्या जमशेदपूर एफसीने दोघा खेळाडूंना नव्याने करारबद्ध केले आहे. त्यांनी लोनवर एफसी गोवाचा मणिपूरी विंगर सेईमिन्लेन डौंगेल याच्याशी, तसेच आणखी एक विंगर फारुख चौधरी याच्याशी करार केला आहे. अगोदर फारुख मुंबई सिटी एफसी संघात होता. जमशेदपूरचा विंगर जॅकिचंद सिंग आता मुंबई सिटी एफसी संघात दाखल झाला आहे.

 

दृष्टिक्षेपात...

- स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात बांबोळी येथील बंगळूरची ओडिशावर 2-1 फरकाने मात

- ओडिशाच्या दिएगो मॉरिसियो याचे स्पर्धेत 6 गोल

- वास्को येथे स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात जमशेदूपर व हैदराबाद यांच्यात 1-1 गोलबरोबरी

- जमशेदपूरच्या नेरियूस व्हॅल्सकिसचे 8 गोल, पण मागील 2 लढतीत गोलविना

- हैदराबादच्या आरिदाने सांतानाचे 6, तर हालिचरण नरझारीचे 4 गोल.

संबंधित बातम्या