बाणस्तारी-माशेलात बांगलादेशींचे वास्तव्य

Dainik Gomantak
बुधवार, 3 जून 2020

फोंडा तालुक्यातील बाणस्तारी तसेच खांडोळा-माशेल येथे हे बांगलादेशी नागरिक भाडेपट्टीवरील खोल्यांत राहत आहेत.

फोंडा

फोंडा तालुक्यात दहा बांगलादेशींचे वास्तव्य असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. मात्र, हे दहाहीजण रोजगाराच्या शोधात गोव्यात आल्याचे व भंगार अड्ड्यांसंबंधीच्या व्यवसायात गेला बराच काळ असल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशी नागरिक सापडल्याने अधिक चौकशी करण्यात येत आहे. फोंडा तालुक्यातील बाणस्तारी तसेच खांडोळा-माशेल येथे हे बांगलादेशी नागरिक भाडेपट्टीवरील खोल्यांत राहत आहेत. फोंडा पोलिसांनी या प्रकरणी अधिक चौकशी सुरू केली आहे. पणजी मुख्यालय पोलिस खात्याने दिलेल्या आदेशानुसार, या दहाहीजणांना आहे, त्याच ठिकाणच्या खोल्यांत थांबवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. या बांगलादेशी इसमांकडे भारतीय आधारकार्ड सापडले आहे. उपलब्ध माहितीनुसार, हे दहाहीजण कोणत्याही गुन्ह्यात अडकले नसल्याचेही प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याचीही माहिती देण्यात आली.
भाटेपट्टीवर राहणाऱ्यांची चौकशी करण्यासंबंधी सहाजणांना पोलिसांनी बोलावले असता, हे बांगलादेशी प्रकरण उघडकीस आले. चौकशीसाठी बोलवलेल्या सहाजणांत रसिक हबिब शेख, सलमान रसिक शेख, झाकीर हबीब शेख, अझीम रसिक शेख, रकीब कीर शेख व महंमद राणा जहांगिर यांचा समावेश आहे. चौकशीवेळी या सहाजणांनी आपण बांगलादेशी नागरिक असल्याचे पोलिसांना सांगितले असल्याचे समजते. या सहाजणांसह इतर चारचणांना स्थानिक नागरिकांनीच भाडेपट्टीवर खोल्या दिल्या होत्या. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या