‘बारस’ उत्सवाला कृषी संस्कृतीचे अधिष्ठान

प्रतिनिधी
रविवार, 30 ऑगस्ट 2020

कुळातील दुसऱ्या विवाहित महिलेसमवेत यजमानाकडून पूजाविधी

म्हापसा: दरवर्षी चतुर्थीनंतर काही दिवसांनी वामन जयंती दिवशी डिचोली तालुक्यातील न्हावेली या गावात ‘बारस’ नावाचा एक आगळावेगळा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव कृषी संस्कृतीतून पुढे आलेला असून, यंदा तो उत्सव आज शनिवारी २९ रोजी साजरा करण्यात आला.

या उत्सवासंदर्भात एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे ‘बारस’ चे पूजाविधी विवाहित जोडप्याद्वारे न होता, यजमानासोबत कुळातील दुसऱ्या विवाहित महिलेसमवेत केले जातात. शेवटी ही ''बारसी''ची पेट नदीत अर्पण केली जाते. येताना ''देवाच्या शेतात'' कुदळ मारून वायंगणी शेताची सुरुवात केली जाते.

गोवा हा पूर्वीपासूनच कृषिप्रधान प्रांत असल्याने गोव्यातली बरीचशी गावे मागील शेकडो वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असायची. अशाच गावांपैकी एक असलेल्या समुद्रकिनारे, शहराची गजबज या सगळ्यापासून दूर असलेल्या न्हावेली गावच्या लोकांचा प्रामुख्याने शेती हाच व्यवसाय होता.

सुमारे चारशे वर्षांपूर्वी न्हावेली गाव वसवल्यानंतर अमोणा, न्हावेली, कुडणे, साखळी या गावांना जोडण्यासाठी मांडवी नदीवर बांध उभारण्यात आला. त्यामुळे नदीचे पाणी काठावर अडून राहिले व त्या काठी न्हावेली गावच्या लोकांनी वायंगणी शेती व्यवसाय सुरू केला.

पूर्वी न्हावेली गावच्या चारही बाजूंनी बारमाही वाहणारे झरे व ‘तळी’, तसेच ‘साळ’ नावाच्या तळी होत्या; ज्यामुळे शेतीसाठी पाणी मिळायचे. पण, हळूहळू त्या शेतीकाठच्या पाण्यात मगरींचे वास्तव सुरू झाले.

वायंगणी शेतीची सुरुवात पाऊस संपता संपता केली जाते, म्हणून बारस हा उत्सव भाद्रपद महिन्यात चतुर्थीच्या अगदी काही दिवसांनंतर वामन जयंतीच्या दिवशी साजरा केला जातो. त्यानंतरच वायंगणी नांगरणीची सुवात होते.

या दिवशी सगळे गावकरी एकत्र जमून बांबूंचा एक आराखडा (पेट) करतात. हा आराखडा फुलांनी सजवला जातो. त्यात बारा मांडे (मण) उकडे भात, बारा मांडे अळूची भाजी, बारा दवले (मोठे चमचे) पिठी (कुळीथ या कडधान्याची आमटी) यांची आरास मांडली जाते. सोबत तांदळाच्या पिठाची एक बैलांची जोडी म्हणजे जोत (औत), एक शेतकरी व मगर यांची आकृती बनवून पुजली जाते.

यंदा कोरोना महामारीमुळे मोजक्या गावकऱ्यांसोबत पण तेवढ्याच उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात आला.

न्हावेलीतील ‘बारस’संदर्भातील आख्यायिका!
शेतीकाठच्या पाण्यातील मगरी ''जोता''चे बैल, गाय-वासरे व शेतकऱ्यांना आपली शिकार बनवायच्या व शेतकामात व्यत्यय आणायच्या. बरीच वर्षे हे चालूच राहिल्याने लोक शेती करण्यास घाबरू लागले. तेव्हा सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन देवास सांगणे घातले व वायंगण मुहूर्ताच्या दिवशी प्रत्येक वर्षी पाण्यात त्या मगरींसाठी जेवण, बैलाची एक जोडी व एक शेतकरी अर्पण करण्याचे मान्य केले. असे केल्याने हळूहळू मगरींचा त्रास कमी झाला. तेव्हापासून ''बारस'' या उत्सवाची सांगता झाली, अशी आख्यायिका आहे.

संबंधित बातम्या