उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचा केंद्रबिंदू बार्देशच

Bardesh taluka is the focal point for all political parties in the elections
Bardesh taluka is the focal point for all political parties in the elections

म्हापसा: उत्तर गोवा जिल्हा पंचायती छत्तीस टक्के अर्थात पंचवीसपैकी तब्बल नऊ मतदारसंघ बार्देश तालुक्यात असल्याने या निवडणुकीच्या बाबतीत बार्देश तालुका हा सर्वच राजकीय पक्षांसाठी केंद्रबिंदू ठरलेला आहे. या नऊही मतदारसंघांत प्रामुख्याने भाजप व काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांची तसेच स्थानिक आमदार व राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

या तालुक्यातील विविध मतदारसंघांत आम आदमी पार्टीनेही उमेदवार उभे केले आहेत. गोवा फॉरवर्ड पक्षाने काही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना, तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. मगो पक्षाने इतरत्र उमेदवार उभे केले असले तरी या तालुक्यात एकाही मतदारसंघात उमेदवार उभा केला नाही. या तालुक्यातील काही अपक्ष उमेदवारही राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांएवढेच तुल्यबळ आहेत. बार्देश तालुक्यातील विविध जिल्हा पंचायत मतदारसंघांतील एकंदर राजकीय परिस्थिती पुढीलप्रमाणे:

शिवोली मतदारसंघात माजी आमदार दयानंद मांद्रेकर भाजपाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असले तरी गोवा फॉरवर्डचे प्रतिनिधित्व करणारे विद्यमान आमदार विनोद पालयेकर यांनी भाजप उमेदवारांचा पाडाव करण्यासाठी आणि विरोधकांची मते विभागून जाऊ नये यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा सावध पवित्रा घेतला आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या जिल्हा पंचायतीच्या शिवोली मतदारसंघात इनीज डोरीस नरोन्हा ई-डायस (अपक्ष), सनीशा सतीश तोरस्कर (भाजप) व सूचिता झिला पेडणेकर (काँग्रेस) अशा तीन उमेदवार आहेत. महिलांसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात मार्ना-शिवोली, ओशेल-शिवोली, सडये-शिवोली व कामुर्ली अशा चार पंचायत क्षेत्रांचा समावेश आहे.

हणजूण  हणजूण-कायसूव, वेर्ला-काणका व आसगाव या तीन पंचायत क्षेत्रांचा समावेश असलेल्या महिलांसाठी राखीव हणजूण मतदारसंघात ऐश्वर्या अर्जुन साळगावकर (अपक्ष), निहारिका नारायण मांद्रेकर (भाजप) व संगीता सागर लिंगूडकर (काँग्रेस) अशा तीन महिला उमेदवार आहेत. याही मतदारसंघात आमदार विनोद पालयेकर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला, तर माजी आमदार दयानंद मांद्रेकर यांनी निहारिका मांद्रेकर यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे.

कोलवाळ  थिवी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी जिल्हा पंचायतीच्या कोलवाळ व शिरसई मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असून, तिथे अपक्ष उमेदवार उभे केले आहेत. कोलवाळ, रेवोडा, नानोडा, पीर्ण व अस्नोडा या पाच पंचायत क्षेत्रांचा समावेश असलेल्या सर्वसाधारण खुल्या गटातील कोलवाळ मतदारसंघात गोविंद आत्माराम कुबल (भाजप), कविता किरण कांदोळकर (अपक्ष), सतीश विष्णू चोडणकर (काँग्रेस) व उमेश मंगेश कवठणकर (अपक्ष) असे चार उमेदवार आहेत. या मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे माजी आमदार किरण कांदोळकर हे सध्या गोवा फॉरवर्ड पक्षात असले तरी त्यांनी स्वत:ची पत्नी कविता यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभे केले आहे.

शिरसई शिरसई, थिवी, मयडे, अस्नोडा या चार पंचायत क्षेत्रांचा समावेश असलेला सर्वसाधारण खुल्या गटातील शिरसई मतदारसंघात आनंद सहदेव तेमकर (अपक्ष), दीक्षा दिलीप कानोळकर (भाजप), गॉडफ्री डिलीमा (आप), गोविंद पुंडलिक गोवेकर (अपक्ष) व उमाकांत गजानन कुडणेकर (काँग्रेस) असे पाच अमेदवार आहेत. अपक्ष उमेदवार तेमकर हे किरण कांदोळकर पुरस्कृत उमेदवार आहेत.
हळदोणे हळदोणे, पोंबुर्पा, उसकई-पालये व बस्तोडा या चार पंचायत क्षेत्रांचा समावेश असलेल्या हळदोणे मतदारसंघात मनीषा महेश नाईक (भाजप), रुबी गोकुळदास हळर्णकर (काँग्रेस) व स्मिता सुरेश शेट (आप) अशा तीन उमेदवार आहेत. हा मतदारसंघ इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव आहे.

सुकूर पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी स्वत:च्या मतदारसंघात सुकूर व पेन्ह-द-फ्रान्स अशा दोन्ही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. सुकूरमध्ये दोन वेळा निवडून आलेल्या वैशाली सातार्डेकर यांना निवडून आणण्यासाठी आमदार खंवटे तसेच साळगावचे आमदार जयेश साळगावकर प्रयत्नशील आहेत. त्या मतदारसंघात भाजपातर्फे निवडणूक रिंगणात उतरलेले नवखे उमेदवार कार्तिक कुडणेकर यांना कळंगूटचे आमदार यांचे समर्थन लाभले आहे. त्यामुळे खवटे विरुद्ध मायकल लोबो अशा स्वरूपाची ही प्रतिष्ठेची लढत ठरलेली आहे. सर्वसाधारण खुल्या गटातील सुकूर मतदारसंघात कार्तिक साजो कुडणेकर (भाजप), मारियो वेनांसिओ कोर्देरो (आप), सर्वेश दिना नाईक (काँग्रेस) व वैशाली नारायण सातार्डेकर (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे. या मतदारसंघात सुकूर, पर्रा, साळगाव व गिरी ही चार पंचायत क्षेत्रे समाविष्ट करण्यात आली आहेत.


पेन्ह-द-फ्रान्स पेन्ह-द-फान्समध्ये तीन वेळा निवडून आलेले गुपेश नाईक यांनी हा मतदारसंघ इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव असल्याने स्वत:ची पत्नी कविता यांना निवडणुकीत उतरवले असून त्यांनाही खंवटे यांचा पाठिंबा लाभलेला आहे. ओबीसी महिलांसाठी राखीव असलेल्या पेन्ह-द-फ्रान्स मतदारसंघात कविता गुपेश नाईक (अपक्ष), पेद्रिना ग्रासियस (काँग्रेस) व राधिका गोपाल सावंत (भाजप) अशा तीन महिला उमेदवार आहेत. या मतदारसंघात केवळ पेन्ह-द-फ्रान्स व साल्वादोर-द-मुन्द या दोन मतदारसंघांचा समावेश आहे.

रेईश-मागूश इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या रेईश मागूश मतदारसंघात हेमंत कृष्णनाथ मालवणकर (काँग्रेस), प्रगती संदीप पेडणेकर (अपक्ष) व रूपेश दामोदर नाईक (भाजप) हे तीन उमेदवार आहेत. या मतदारसंघात रेईश मागूश, सांगोल्हा, नेरूल व पिळर्ण ही चार पंचायत क्षेत्रे समाविष्ट करण्यात आली आहेत.

कळंगुट कळंगुट, कांदोळी व हडफडे-नागवा अशा तीन पंचायत क्षेत्रांचा समावेश असलेल्या तथा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असलेला कळंगुट मतदारसंघ तेथील आमदार मायकल लोबो यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा ठरला आहे. या मतदारसंघात काँग्रेसच्या विजयासाठी माजी आमदार आग्लेल फर्नांडीस व कळंगूटचे माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा एकत्रित आले आहेत. कळंगूट मतदारसंघात दत्तप्रसाद मुरारी दाभोलकर (भाजप), लोरेन्स झेवेरितो सिल्वेरा (काँग्रेस) व मान्युएल सिमांव कार्दोजो (आप) असे तीन उमेदवार आहेत.


या निवडणुकीच्या निमित्ताने बार्देश तालुक्यात भाजपचे नेते व कार्यकर्ते शिस्तबद्धरीत्या तथा नियोजनपूर्वक कार्यरत असल्याचे आढळून येते. काँग्रेससमर्थक मतदारांची संख्या या तालुक्यात भाजपच्या तुलनेत जास्त असली तरी त्या पक्षात संघटनकार्य नसल्याने ती मते त्यांना मिळतीलच असे ठामपणे सांगता येत नाही. तसेच, ज्या प्रकारे भाजप कार्यकर्ते मतदानावेळी मतदारांना घराबाहेर काढून त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करतात तशी वृत्ती काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नसल्याने त्याचा कदाचित त्या पक्षाला फटका बसू शकतो, अशी बार्देश तालुक्यातील एकंदर परिस्थिती आहे. तसेच सत्ताधारी पक्षाने निवडणुकीच्या निमित्ताने लढवलेल्या नानाविध क्लृप्त्या काँग्रेसला त्रासदायक ठरू शकतात. एकंदर प्रचाराच्या बाबतीत भाजपने इतर उमदवारांवर बाजी मारलेली आहे. तो कल मतदानापर्यंत कितपत कायम राहू शकतो, हे मतमोजणीवेळीच स्पष्ट होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com