‘बार्देस तहा’ची प्रत मिळण्याची आशा

मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच : पोर्तुगीज पुरातत्त्व खात्याकडून दस्तावेज आणणार
bardez treaty
bardez treatyDainik Gomantak

मडगाव : 1667 च्या डिसेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज यांच्यात महत्त्वाचा तह झाला, ज्याची इतिहासात ‘बार्देस तह’ म्हणून नोंद आहे. या तहाची मूळ प्रत अजूनही लिस्बनच्या आर्कायव्हमध्ये उपलब्ध आहे. गोव्यातील मराठा साम्राज्याशी निगडीत असे अनेक दस्तावेज पोर्तुगीज पुरातत्व खात्याकडे आहेत. हे दस्तावेज उपलब्ध झाल्यास एक नवा खजिनाच हाती लागणार आहे.

इतिहास संशोधक सचिन मदगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तहाची मूळ प्रत मोडी लिपीत तयार केलेली असून पिसुर्लेकर यांनी आपल्या पुस्तकात तिची प्रतिकृती छापली आहे. गोव्यातील मराठा राजवटीविषयी तो एक महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो.

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यात बेतूल येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हे महत्वाचे दस्तावेज गोव्यात आणण्याविषयी सूतोवाच केले होते. त्यानंतर इतिहास प्रेमींमध्ये हा एक चर्चेचा विषय ठरला आहे.

bardez treaty
महिलेच्या ‘त्या’ पत्राची गोवा खंडपीठाकडून दखल

मदगे म्हणाले, केवळ शिवाजी महाराजांनीच नव्हे तर संभाजी महाराजांकडे पोर्तुगीजांनी केलेल्या तहांच्या प्रतीही पोर्तुगालमध्ये आहे. हे दस्तावेज मिळाले तर आमच्यासारख्या इतिहास प्रेमींसाठी ती एक मोठी पर्वणीच ठरेल असे मत त्यांनी मांडले. पोर्तुगीज-मराठा राजकीय संबंधांचे आणखी एक अभ्यासक व भाष्यकार वाल्मिकी फालेरो यांनीही पोर्तुगीज पुरातत्व खात्याकडे या विषयीचे बरेच दस्तावेज असल्याचे मान्य केले. मात्र, वादळे आणि भूकंप या सारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे त्याहून कितीतरी दस्तावेज नष्ट झाले असावेत असेही ते म्हणाले.

काय होता ‘बार्देस करार’?

पोर्तुगीजांनी बार्देस प्रांतातील हिंदूंना प्रांत सोडून जाण्याचे फर्मान काढल्यानंतर धर्म रक्षणासाठी नोव्हेंबर 1667 ला छत्रपती शिवरायांनी गोव्यावर चाल केली. मराठ्यांना त्रास देणाऱ्या देसाई वतनदारांना पोर्तुगीज आश्रय देत होते हे देखील एक कारण होते. त्यावेळी मराठा सैन्यांसमोर पोर्तुगीज सैन्य हवालदिल झाल्याने त्यांना आग्वाद व रेईस मागूस किल्ल्यावर आसरा घ्यावा लागला. शेवटी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोर्तुगीजांनी तह करण्याचे ठरविले. 14 डिसेंबर 1667 रोजी डिचोली येथे हा लिखित स्वरुपात तह झाला. त्यावर शिवरायांनी आपली राजमुद्राही उमटवली अशी माहिती सचिन मदगे यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com