गणेशभक्तांवर वीज खात्याचीही कृपादृष्टी!

प्रतिनिधी
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

बार्देशमध्ये यंदा चतुर्थीकाळात सुरळीत वीजपुरवठा

म्हापसा: गणेशचतुर्थीच्या काळात बार्देश तालुक्यात दरवर्षी नेहमीच वीजपुरवठा खंडित व्हायचा. परंतु, यंदाच्या गणेशोत्सवावर ज्याप्रमाणे पावसाचा फारचा परिणाम झाला नाही, त्याचप्रमाणे वीजपुरवठ्यातही विशेष असा व्यत्यय आला नाही. खात्याची ही गणेभक्तांवर असलेली कृपादृष्टीच म्हणावी लागेल, असे मत वीजग्राहकांनी व्यक्त केले आहे.

गणेशोत्सवाच्या पहिल्या पाच दिवसांच्या काळात कित्येक कर्मचारी रजेवर गेले होते. असे असतानाही वीज खात्याचे म्हापसा येथील साहाय्यक वीज अभियंता नॉर्मन आथाईद यांनी उपलब्ध मनुष्यबळाच्या साहाय्याने एकंदर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने बार्देश तालुक्यात विविध ठिकाणी स्वत: फिरून कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवून मार्गदर्शन केले. याबद्दल नागरिकांनी नॉर्मन आथाईद यांचे विशेष आभार मानले आहेत.

आथाईद म्हणाले, वीजपुरवठा खंडित होण्याचे मुख्य कारण म्हणजे, झाडांच्या फांद्या, माडाची चुडते इत्यादी वीजवाहिन्यावर कोसळणे. परंतु, आम्ही वीजवाहिन्यांना लागून असलेली सुमारे चार मीटर परिसरातील झाडांच्या फांद्या वगैरे छाटण्याचे काम चतुर्थीपूर्वी महिन्याभरापासून सुरू केले होते. त्या वेळी काही नागरिकांनी स्वत:च्या मालकीच्या झाडांचे नुकसात होत असल्याचे कारण पुढे करून त्याबाबत वीज खात्याच्या अधिकाऱ्यांशी तसेच कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली.

वास्तविक, पंचायत तसेच पालिका क्षेत्रातील धोकादायक झाडे मुळासकट कापून घेण्यासंदर्भातील निर्णय संबंधित पंचायतीने व नगरपालिकेने घ्यायचा असतो. त्या यंत्रणांशी तसेच वन खात्याशी पत्रव्यवहार केला असतानाही त्याबाबत काहीच कार्यवाही झाली नाही. आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने उपजिल्हाधिकाऱ्यांना त्यासंदर्भात विशेष अधिकार बहाल करण्यात आले आहेत. परंतु, त्यांनीही काहीच न केल्याने अखेर वीज खात्याने केवळ नाममात्र अधिकार असतानाही जोखीम पत्करून धोकादायक झाडांच्या फांद्या छाटून टाकल्या होत्या.

ज्या माडांपासून नारळ मिळत नाहीत, त्या माडांवर ‘पाडेली’ चढत नाही व त्यामुळे त्या माडाची जीर्ण चुडते पावसाळ्यात वीजवाहिन्यांवर कोसळतात. परिणामी वीजपुरवठा खंडित होतो. असे होऊ नये यासाठी संबंधित मालकांनी माडांवरील सुकलेली चुडते वेळीच काढून सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. आथाईद यांनी केले.

म्हापसा वीज कार्यालयाच्या अधिकारक्षेत्रात बाजारपेठ, धुळेर, करासवाडा, कामखाजन, दत्तवाडी, पेडे, खोर्ली असे शहरातील विविध भाग येतात व त्याची जबाबदारी सांभाळावी लागते. त्याचबरोबर हल्लीच बस्तोडा, हळदोणे, पोंबुर्पा, एकोशी, गिरी, पर्रा, हडफडे इत्यादी अतिरिक्त भागाची जबाबदारी श्री. आथाईद यांच्यावर देण्यात आली होती. अशा परिस्थितीत त्यांनी सर्वत्र फिरून परिस्थितीवर देखरेख ठेवली. तसेच त्यांनी म्हापसा व हळदोणे मतदारसंघात सर्वत्र फिरून गणेशविसर्जन स्थळांच्या ठिकाणी वीजव्यवस्था सुरळीत करण्याचे काम करवून घेतले. म्हापसा मतदारसंघात सात विसर्जनस्थळे, तर हळदोणेत चोवीस विसर्जनस्थळे आहेत. म्हापसा शहरात त्यांनी नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांच्यासमवेत दौरा करून परिस्थितीवर देखरेख ठेवली. तसेच, बोडगेश्वर मंदिराच्या परिसरात नव्यानेच बांधण्यात आलेल्या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी वीजव्यवस्था करून दिली. तार नदीवरील विसर्जनस्थळावरही अतिरिक्त वीजव्यवस्था करण्यात आली.

यंदा गणेशचतुथीं काळात चौथ्या दिवशी करासवाडा औद्योगिक वसाहत परिसरात इन्सुलेटर निकामी ठरल्याने वीजपुरवठा खंडित झाला. अन्य ठिकाणी वीज पुरवठ्यात मोठासा व्यत्यय आला नाही. पोडवाळ येथेही वोल्टेजचा प्रश्न होता. अखेर तिथे धावपळ करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

दरम्यान, म्हापसा कार्यालयाचे एक कार्यकारी अभियंता तसेच त्यांचे कुटुंबीय कोविडबाधित असल्याचे आढळून आल्याने त्याचाही थोडाफार परिणाम खात्याच्या कामकाजावर झाला आहे. त्यामुळे, सध्या त्या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांची कोविडविषयक चाचणी करून घेण्यात येत आहे.

संबंधित बातम्या