बायंगिणी प्रकल्‍प रद्द करून दाखवावा..!

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी बायंगिणी कचरा प्रकल्पाला आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत आपल्या पुत्राच्या सोयीसाठी विरोध केल्याचा आरोप कुंभारजुवे गट काँग्रेस अध्यक्ष व खोर्ली मतदारसंघाचे काँग्रेसचे जिल्हा पंचायत उमेदवार विशाल वळवईकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

पणजी: केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी बायंगिणी कचरा प्रकल्पाला आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत आपल्या पुत्राच्या सोयीसाठी विरोध केल्याचा आरोप कुंभारजुवे गट काँग्रेस अध्यक्ष व खोर्ली मतदारसंघाचे काँग्रेसचे जिल्हा पंचायत उमेदवार विशाल वळवईकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. नाईक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीपूर्वी हा प्रकल्प रद्द करवून घेतल्यास आपण खोर्लीतून उमेदवारी मागे घेतो, असे उघड आव्हान त्यांनी दिले.

काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, काँग्रेस नेते रुडॉल्फ फर्नांडिस तसेच सांतआंद्रेचे गट काँग्रेस अध्यक्ष टोनी फर्नांडिस यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते. वळवईकर म्हणाले, लोकप्रतिनिधींना जनता आपल्या समस्या सोडवण्यासाठी निवडून देते. राजकारणात येऊन लोकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रत्येक राजकीय नेत्याने लोकांच्या भावनांचा आदर करून त्यांचे प्रश्न सोडवणे महत्त्‍वाचे असते. माझाही या प्रकल्पाला २००३ पासून विरोध आहे. नाईक यांना आपल्या मुलाच्या विजयासाठी हा प्रकल्प रद्द व्हावा, असे वाटते. त्यांनी हा प्रकल्प रद्द करावा कारण प्रकल्प रद्द होणे हे मला माझ्या विजयापेक्षाही महत्त्वाचे आहे.

फर्नांडिस म्हणाले, कदंब पठार तसेच कुडका येथे उघड्यावर कचरा टाकल्याने व त्यांच्यावर कसलीच प्रक्रिया सरकारने केली नसल्याने त्याचे दुष्परीणाम चिंबल व सभोवतालच्या  भागांना भोगावे लागत होते. त्यावेळी माझी आई स्व. व्हिक्टोरीया फर्नांडिस यांनी अहोरात्र लढा देऊन हा कचरा हटविण्यास सरकारला भाग पाडले होते. सांतआंद्रे गट काँग्रेस अध्यक्ष टोनी फर्नांडिस यांनीही सरकारने बायंगिणी प्रकल्प त्वरित रद्द करावा अशी मागणी 
केली.

कितीही विरोध झाला तरी ‘बायंगिणी’ होणारच

केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी बायंगिणीच्या प्रस्तावित कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला विरोध केला असताना हा प्रकल्प वेळेत पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्य सचिव परीमल राय यांनी केंद्र सरकारला दिली आहे. त्यांनी तसे अधिकृत पत्र केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या सचिवांना पाठवले आहे. गेल्याच आठवड्यात हे पत्र लिहिले आहे.

बायंगिणीच्या प्रकल्पासह काकोडा आणि वेर्णा येथील प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा राज्य कार्यकारी समितीचा अध्यक्ष या नात्याने घेईन आणि ते प्रकल्प वेळेत नियोजनानुसार पूर्ण केले जातील, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या प्रकल्पांबाबत जलशक्ती मंत्रालयाकडून मुख्य सचिवांना दोन पत्रे पाठवून विचारणा करण्यात आली होती. त्या पत्रांना उत्तर पाठवताना मुख्य सचिवांनी बायंगणीचा प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्याची हमी दिली आहे. या पत्रात त्यांनी मलनिस्सारण प्रकल्पांविषयीही माहिती दिली आहे. मडगाव पणजी व वास्को शहरातील मलनिस्सारण प्रकल्प आहेत. इतर चार प्रकल्प स्थानिक गरजानुरुप उभारले आहेत. सध्या या प्रकल्पांची क्षमता ३८ टक्के वापरली जाते. कारण, २०४५ मध्ये तयार होणारे मलजल गृहित धरून या प्रकल्पांची रचना करण्यात आली आहे. सध्या आलेल्या सर्व मलजलावर प्रक्रिया केली जाते. आणखी पाच प्रकल्प बांधले जात असून दोन पूर्णत्त्‍वाच्या मार्गावर आहेत, अशी माहितीही त्यांनी पत्रातून दिली आहे.

संबंधित बातम्या