बायंगिणी कचरा प्रकल्प इतरत्र हलवा

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

या प्रकल्पामुळे या ऐतिहासिक आणि नैसर्गिक ठेव्याला हानी पोहचण्याची शक्यता असून हा प्रकल्प इतरत्र हलविण्याची मागणी जुने गोवे नागरिक मंचचे अध्यक्ष अंबर आमोणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

पणजी : बायंगिणी कचरा प्रकल्प जेथे होणार आहे, त्या परिसराला ऐतिहासिक महत्व आहे. जुने गोवे हे गोव्याचा ऐतिहासीक वारसा जपणारे ठिकाण आहे. बायंगिणी कचरा प्रकल्प हा जुने गोवेपासून केवळ दोन मिनिटांच्या अंतरावर आहे. तसेच येथील करमळी तलाव ५ कि.मी. अंतरावर आहे. या प्रकल्पामुळे या ऐतिहासिक आणि नैसर्गिक ठेव्याला हानी पोहचण्याची शक्यता असून हा प्रकल्प इतरत्र हलविण्याची मागणी जुने गोवे नागरिक मंचचे अध्यक्ष अंबर आमोणकर यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांच्यासोबत देविदास आमोणकर आणि मंचचे इतर सदस्यही उपस्थित होते. 

जुने गोवे येथील लोकांना ट्रकमधून कचरा ने आण करताना दुर्गंधीचा त्रास होईलच, पण जेव्हा जुने गोवे येथील मोठ्या साहेबाचे फेस्त असेल तेव्हा मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होईल. कारण यासाठी हजारो लोक, पर्यटक आणि स्थानिकही ठिकठिकाणहून येतात आणि येथे वाहतूक कोंडीचाही त्रास या कालावधीत होतो. या कोंडीमध्ये कचऱ्याचे ट्र्क अडकण्याची शक्यता असल्याने राज्यासाठीसुद्धा हा मुद्दा लाजिरवाणा ठरू शकत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

राज्य सरकारकडूनच मिळालेल्या परवानगीमुळे बायंगिणी कचरा प्रकल्पाच्या आजूबाजूला काही बिल्डरांनी इमारती बांधल्या आहेत. लोकांनी येथे फ्लॅट घेतले आहेत. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे यावेळी आले.

संबंधित बातम्या