पर्यावरणपूरक पणत्यांची वाढली मागणी

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

नैसर्गिकरित्या तयार केलेल्या या दिव्यांची माहिती आजूबाजूच्या परिसरात झाली असल्याने अनेक लोक आता गोशाळेत येऊन दिवे खरेदी करू लागले आहेत,

पणजी: शेण व गव्हाच्या पिठाचे मिश्रण करून तयार केलेल्या पणत्यांना (दिवे) सध्या मागणी वाढू लागली आहे. सिकेरी-मये येथील गोमंतक गोशाळेत बनविल्या जाणाऱ्या पणत्या येऊन खरेदी करीत असल्याने त्या बनविणाऱ्यांसाठी समाधानाची बाब आहे. परंतु अशा पर्यावरणपूरक पणत्यांची खरेदी पुढील वर्षांपासून वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार पणत्या बनविणाऱ्यांचा आणखी हुरुप वाढलेला आहे.

या पणत्या बनविण्याच्या प्रक्रियेविषयी गोमंतक गोशाळेचे कमलाकांत तारी म्हणाले की, स्वदेशी वस्तूंचा जास्तीत जास्त उपयोग करून देश आत्मनिर्भर बनावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यानुसार कामधेनू आयोगाने राज्यातील गोशाळांना आवाहन केले आणि त्यातून ‘गोमय'' दिवे करण्यास सुरवात केली. हे दिवे दिवाळीत पेटवून ती साजरी केली जावी, असा यामागील उद्देश आहे. चीनमधून येणाऱ्या पणत्या विकत घेण्यापेक्षा या दिव्यांची खरेदी लोकांनी करावी आणि या उपक्रमास हातभार लावावी, असे आपले आवाहन आहे. 

गोमय दिव्यांसाठी एक किलो शेणात दोनशे किलोग्रॅम गव्हाचे पिठ घालून त्याचे मिश्रण तयार केले जाते. नैसर्गिक हे दिवे असून, एकाचवेळी त्याचा वापर होणार आहे. त्या दिव्यांत एकदा तेल ओतून पेटविल्यानंतर तो दिवाही हळुवार जळून नष्ट होणार आहे. त्यामुळे तो निसर्गाशी एकरूप होतो, असे तारी म्हणाले. 

यावर्षी आम्ही ५० हजार दिवे करण्याचे आमचे ध्येय असून, सध्या आम्ही दहा हजार दिवे तयार केलेले आहेत. नैसर्गिकरित्या तयार केलेल्या या दिव्यांची माहिती आजूबाजूच्या परिसरात झाली असल्याने अनेक लोक आता गोशाळेत येऊन दिवे खरेदी करू लागले आहेत, असे तारी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या