गोमंतकीय किनाऱ्यांना कासवांची पसंती

अवित बगळे
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

कासव संवर्धनाचा अभ्यास करणारे सुजीतकुमार डोंगरे यांनी आपल्या अहवालात नोंद केल्यानुसार तेंबवाडा मोरजी येथे १९९७ मध्ये ऑलिव्ह रिलडे जातीच्या कासवांनी पाच ठिकाणी अंडी घातली होती. त्यातून ४६० कासव पिल्ले परत पाण्यात गेली.

पणजी: गोव्यामध्ये अनेक किनाऱ्यांवर कासवे अंडी घालण्यासाठी येत असली तरी मोरजी, आगोंद आणि गालजीबाग किनारे कासवांसाठी आरक्षित आणि सुरक्षित मानले जातात. आता त्या ठिकाणी कासवांच्या अंड्यांचे संरक्षण कऱण्याची व्यवस्था वन खाते करते.

कासव संवर्धनाचा अभ्यास करणारे सुजीतकुमार डोंगरे यांनी आपल्या अहवालात नोंद केल्यानुसार तेंबवाडा मोरजी येथे १९९७ मध्ये ऑलिव्ह रिलडे जातीच्या कासवांनी पाच ठिकाणी अंडी घातली होती. त्यातून ४६० कासव पिल्ले परत पाण्यात गेली. पर्यावर शिक्षण केंद्राच्या माध्यमातून याविषयावर व्यापक जनजागृती करण्यात आली. गोवा फाऊंडेशननेही किनारे मानवी हस्तक्षेपापासून मुक्त असावेत यासाठी प्रयत्न केले. या साऱ्या कामात शिक्षण खात्याचीही मदत घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कासव  संवर्धन का हवे याची माहिती घरोघर पोचवण्यात आली. यासाठी विविध भित्तीपत्रके, पुस्तिका तयार केल्या गेल्या. कासवांचे जीवन विद्यार्थ्यांना समजावे यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करण्यात आले.

मोरजीचाच विचार केला तर २००० सालापर्यंत मोरजीच्या किनाऱ्यावर शॅक नव्हते. त्यावेळी पर्यटन हा तेथील रहिवाशांचा प्रमुख व्यवसाय नव्हता. चोपडे शिवोली पुलानंतर २००३ नंतर पर्यटक मोरजीकडे वळू लागले आणि तेंबवाडा आणि विठ्ठलदासवाडा येथे शॅक उभे राहिले.  अमर्याद पर्यटनाचा कासवांना फटका बसू लागला. त्यामुळे वन खाते आणि पर्यावरण शिक्षण केंद्र यांनी संयुक्तपणे अनेक बैठका घेतल्या. पर्यटन कसे नियंत्रणात आणता येईल असा विचार त्यात सुरु होता. तेंबवाडा येथील सहाशे मीटर किनारपट्टी अखेर कासवांसाठी आरक्षित ठेवण्यावर शिक्कामोर्तब झाले.

या भागात शॅक घालण्यात येऊ नये, मोरजी किनाऱ्यावर सायंकाळनंतर प्रखर विद्युत झोताचा वापर केला जाऊ नये, कर्णकर्कश संगीत वाजवले जाऊ नये, किनाऱ्यांवर वाहने आणू नयेत आणि वालुका टेकड्यांची आणि वनस्पतींची नासधूस करता कामा नये अशा अटी घालण्यात आल्या आहेत. तेंबवाडा येथील विजेच्या दिव्यांचा कासवांना त्रास होऊ नये यासाठी प्रकाश लहरी थोपवणारी झाडेही वन खात्याने लावली आहेत.

(क्रमशः)

गोमन्तक वृत्तसेवा

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या