आडपईत साकारली गोवा मुक्तिपर्वाची कलाकृती!

दैनिक गोमन्तक
शनिवार, 19 डिसेंबर 2020

पोर्तुगिजांच्या जोखडातून १९ डिसेंबर  रोजी गोवा मुक्त झाला. यंदा हिरकमहोत्सवी वर्षांचे स्वागत करताना आपण मागे वळून पाहिले तर आपल्याला काय दिसेल..!

फोंडा : पोर्तुगिजांच्या जोखडातून १९ डिसेंबर  रोजी गोवा मुक्त झाला. यंदा हिरकमहोत्सवी वर्षांचे स्वागत करताना आपण मागे वळून पाहिले तर आपल्याला काय दिसेल..! स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, बलीदानासाठी निर्भिडपणे पुढे पडलेली पावले, छातीवर झेललेल्या गोळ्या आणि संसारावर ठेवलेले तुळशीपत्र..! सुंदर गोव्याच्या मुक्तीचे स्वप्न साकारण्यासाठी गोव्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी आणि स्वाभिमानी गोमंतकीयांनी अतोनात छळ सहन केला, पण लढा कायम ठेवला, त्याचाच परिपाक म्हणून शेवटी भारत सरकारला लष्कर घुसवून पोर्तुगिजांना हाकलवून लावावे लागले, आणि एक स्वप्नपूर्ती शक्‍य झाली. 

नेमक्‍या या स्वप्नपूर्तीचा आढावा घेताना अंत्रुज महालातील आडपई येथील एक युवा आणि गुणी चित्रकार सागर नाईक मुळे यांनी या हिरकमहोत्सवी गोवा मुक्तिपर्वाचे छान चित्र रेखाटले आहे. विशेष म्हणजे गोव्याची माती, गाईंचे शेण, पेन आणि जलरंगांचा सुरेख वापर करून सागर नाईक मुळे यांनी गोवा मुक्तीच्या साठाव्या या महान पर्वानिमित्त साठ स्वातंत्र्यसैनिकांच्या छबीसह सुरेख कलाकृती साकारली आहे. या कलाकृतीतील मंदिर, चर्च आणि मशिदीचा समावेश म्हणजे सर्वधर्म समभावाचे प्रतीक दर्शवण्यात आले असून गोव्याचा नवा उदय हा सूर्याच्या अस्तित्वातून समोर आला आहे, आणि लाल रंगाचे पट्टे हे गोवा मुक्तीसाठी सांडलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या रक्ताचे साक्षीदार आहेत. सांडलेल्या रक्ताची दाहकता आजही आपल्याला जाणवते आहे, असे चित्रकाराने या ठिकाणी त्यातून प्रतीत केले आहे. गोवा मुक्तीचे हे वैभव आज युवा पिढीच्या हाती असून ते सुरक्षित असल्याचीच ग्वाही या चित्रातून आपल्याला दिसते. एकंदरित अंत्रुज महालातील या युवा कलाकाराची ही कलाकृती आकर्षक तर आहेच, पण विचार करण्यासाठी लावणारीही आहे.

आणखी वाचा:

मुक्तिपूर्व व मुक्तीनंतरचा गोवा -

संबंधित बातम्या