विविधतेतली सुंदरता..
The beauty of diversity

विविधतेतली सुंदरता..

पण माणसं, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक पायरीवर, इतरांशी स्पर्धा करत असतो, प्रत्येकाशी स्वतःची तुलना करत असतो. परंतु हे सर्व करताना, नकळतच आपण इतरांवर रागावतो, त्यांची इर्षा करतो.  जगावर चिडतो, कित्येकदा तर आपल्यालाच आपला  कमीपणा जाणवू लागतो. स्वतः बद्दल न्यूनगंड तयार होऊ लागतात. ह्या स्पर्धात्मक युगात आपण मागे पडू, ही भीती आपल्याला सतत आतल्याआत पोखरत असते.

लोकं काय म्हणतील? कुणी आपली खिल्ली उडवली तर? आपण हरलो तर ! ह्या आणि अशा अनेक परिणामशून्य प्रश्नांच्या खाली आपण दबले जात असतो. समाजाला तोंड द्यायच्या भीतीपोटी आपण गतानुगतिक (conformist)  व्हायचा प्रयत्न करतो. सर्वमान्य व्हायचा प्रयत्न करतो.मात्र हा प्रयत्न करत असताना, आपण आपलं जीवन, आपल्यातली नवलाई व  विशेष म्हणजे आपल्यातील वेगळेपणा घालवून बसतो. जगमान्य ते चांगलं ह्या भाकड  विचारांमुळे आपण  आपल्या आवडी निवडींना मुरड घालत असतो. त्यामुळे हळूहळू कुठेतरी आपल्यामध्ये असलेली चमक, आपल्यातल्या क्षमतांचा  आपल्यालाच विसर पडू लागतो आणि त्यानंतर होतो तो आत्मविश्वासाचा संपूर्ण कडेलोट. 

आपलं जीवन म्हणजे उलट्या दिशेचा प्रवास होऊन बसतं. जे आपल्याला करायचं नाही जे आपल्याला मिळवायचंच नाही, त्यामागे पळताना, प्रयत्नांची पराकाष्ठा करताना, आपल्याकडे जे नाही त्याच्यासाठी झुरताना, आपण कधी थकतो, आणि आपलं आयुष्य कधी संपून जातं हे आपलं आपल्यालाही गवसत नाही.शेवटी येतं ते औदासीन्य आणि होतो तो पश्र्चात्ताप.

ज्याप्रमाणे हाताची पाचही  बोटं वेगळी असतात. त्याच प्रमाणे प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वतःचा असा वेगळेपणा दडलेला असतो. आपणा प्रत्येकामध्ये कार्यकुशलता  असते. आणि तिचा स्वीकार आपण करायलाच हवा. आपल्यातील क्षामातांना, स्वतः मधल्या कुवतीला स्वतःच ओळखायला हवं, त्यांना बहरू द्यायला हवं.

मित्रांनो, वैविध्य हा निसर्गाचा नियमच आहे. जरा कल्पना करा, जगात जर एकाच रंगाची फुलं असती तर आपल्याला फुलांप्रती अकार्षण राहिलं असतं का? नाही ना? विविधरंगी फुलं आहेत म्हणूनच तर फुलांचं नाविन्य आहे.गुलाबाचा रंग आहे तर चाफ्याचा गंध आहे. हे वेगळेपण आहे म्हणूनच तर आनंद आहे.म्हणूनच आपणसुद्धा इतरांच्या क्षमतांचा मत्सर करण्यापेक्षा, त्यांच्याशी स्पर्धा करण्यापेक्षा, स्वतःमध्ये दडलेल्या क्षमतांचा, कौशल्याचा विचार करायला हवा. त्यांना पैलू पाडून स्वतःचा विकास करायला हवा.

आपण आयुष्यात अनेकदा ह्याच बाबतीत  चुकत असतो. स्वतःचा शोध न घेता आपण इतरांप्रमाणे वागण्याचा, जगण्याचा बेमालूम प्रयत्न करत असतो. स्वतःचं स्थान निर्माण न करता इतरांच्या जागेवर आरूढ होण्याचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्यात स्वतःचं उद्दिष्ट मात्र आपण विसरून जातो.तुलना करून काहीच साध्य होत नाही. इतरांशी तुलना करत, स्वतःच्या आयुष्याची जर शर्यत केली, तर आयुष्यभर तोबरा लावलेल्या घोड्यासारखं संकुचित जीवन जगावं लागतं. मग पदरी येते ती निराशा, उदासीनता. मग शेवटी स्वतःलाच आपण दोष देऊ लागतो.

“आपण काहीच करू शकत नाही” ह्या एका अविचाराने आपल्याच मनात आपण अंधार पसरवू लागतो.ज्याप्रमाणे कविवर्य मंगेश पाडगाकर त्यांच्या कवितेत म्हणतात की“ मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं? कोकीळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं? तुलना करीत बसायचं नसतं गं,  प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं . प्रत्येकाच्या आत फुलणारं फुल असतं, प्रत्येकाच्या आत खेळणारं मुल असतं. त्याचप्रमाणे अविचारांच्या गर्दीत गुरफटून न जाता, आपल्यातील फुलणाऱ्या फुलासाठी, उमलणाऱ्या आकांशाना बळ देत आपल्या मनाचं, कल्पनांचं दार उघडून, स्वच्छ प्रकाशात जायचं असतं.कुणाच्याही निंदेला न जुमानता आपलं मन आपणच सावरायचं असतं. बरेचदा,आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीवच झालेली नसते.

आपण जीवनभर त्या तळ्यातल्या राजहंसाप्रमाणे बदकांशी  स्वतःची तुलना करत  बसतो. त्यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करत असतो. आपलं स्थान कुठे आहे ह्याची जाणीवच नसते आपल्याला. म्हणूनच, कधीतरी स्वतःला आरशात निरखून पहायचं. आपले घट्ट झाकून घेतलेले डोळे उघडून स्वतःलाच न्याहाळायचं. तळ्यातलं बदक  होण्यासाठी धडपडण्यापेक्षा, स्वतःतल्या राजहंसाला हाक घालायची. त्याचा शोध घ्यायचा व आपलं अस्तित्व निर्माण करायचं. कारण , प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फुल असतंच. प्रत्येकाच्या आत एक चमचमता तारा असतो. त्याला अढळ स्थान प्राप्त करून द्यायचं काम स्वतःच असतं. स्वतःतल्या हिऱ्याला घडवायचं दायित्व आपलं असतं.ते दायित्व जो पार पाडतो, तो सितारा होतो. सम्राट होतो.अन् लोकांच्या अंतःकरणात कायम स्थान भुषावितो.म्हणूनच स्वतःतला वेगळेपणा जपा. कारण वैविध्यातच खरी सुंदरता आहे.
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com