भगतसिंह कोश्‍‍यारी गोव्याचे नवे राज्‍यपाल

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबरच्या पहिल्याच औपचारीक भेटीत त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीची आणि कोविड महामारी आटोक्यात आणण्याच्या उपाययोजनांविषयी विचारणा केली. राज्यपाल पुढील चार दिवस गोव्यात असतील. 

पणजी: महाराष्‍ट्राच्‍या राज्यपालपदी भगतसिंह कोश्यारी हे असले, तरीही गोव्यातील घडामोडींवर त्‍यांची नजर होती हे आज ठळकपणे जाणवले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबरच्या पहिल्याच औपचारीक भेटीत त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीची आणि कोविड महामारी आटोक्यात आणण्याच्या उपाययोजनांविषयी विचारणा केली. राज्यपाल पुढील चार दिवस गोव्यात असतील. 

राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मेघालयाला बदली झाल्याने ते आज भारतीय हवाई दलाच्या खास विमानाने रवाना झाले. त्यांची राजभवनावर जाऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर, राज्याचे मुख्य सचिव परिमल राय, पोलिस संचालक मुकेशकुमार मीणा, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सदिच्छा भेट घेतली. त्यांनी व राजशिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो यांनी हंसा नौदल तळावरील स्वागत कक्षात राज्यपालांचा निरोप घेतला. त्यानंतर दुपारी दीड वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांचे खास विमानाने आगमन झाले. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. कोश्यारी यांना राजभवन परिसरात मानवंदना देण्यात आली.

राजभवनात न्या. दत्ता यांनी कोश्यारी यांना पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, सभापती राजेश पाटणेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक, मुख्य सचिव परिमल राय, मुकेश कुमार मीणा तसेच विविध विभागांचे सचिव आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.

यानंतर झालेल्या एका बैठकीत कोविड महामारीच्या काळात राज्यात कोणती सेवा सुरू आहे, काय बंद आहे, हे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून जाणून घेतले. त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत अद्याप औपचारीक बैठक ठरलेली नाही. ते चार दिवस राज्यात राहणार आहेत. यादरम्यान ते अनेक विषयांची माहिती राज्य प्रशासनाकडून करून घेतील, असे सांगितले जाते.

राज्‍यपाल कोश्‍‍यारी यांच्‍याविषयी...
कोश्यारी यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये महाराष्‍ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांचा जन्म १७ जून १९४२ रोजी उत्तराखंडातील बागेश्वर जिल्ह्यातील पालनधुराचे ताबगड येथे झाला. १९९७  मध्ये उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले. उत्तराखंड राज्य स्थापन झाल्यानंतर ऊर्जा, जलसिंचन, कायदा आणि विधिमंडळ कामकाज मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. कोश्यारी यांना अध्यापनाची आवड होती आणि त्यांनी काही वर्षे व्याख्याता म्हणून काम केले आहे.

२००१ -०२ उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून ही त्यांनी काम पाहिले आहे. नोव्हेंबर २००८ मध्ये ते उत्तराखंडमधून राज्यसभेत निवडून आले होते आणि २०१४  पर्यंत ते त्या पदावर होते. राज्यसभेच्या याचिकेवरील समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी वन रँक वन पेन्शन, हिमालय राज्यातील रेल्वे नेटवर्क आणि या व्यतिरिक्त इतर अनेक महत्त्‍वाच्या सामाजिक मुद्यांविषयी त्यांनी अहवाल सादर केला आहे. उत्तराखंडचे ऊर्जामंत्री असतानाच्या काळात त्यांनी तेहरी धरणामुळे विस्थापित झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांनी उत्तरांचल प्रदेश क्यू? आणि उत्तरांचल संघर्ष एवं समाधान अशी दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. कोश्यारी यांनी ५ सप्टेंबर रोजी महाराष्‍ट्राचे १९ वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या