गोमंतकीय भजनातील भैरवी, आरत्या व उपसंहार

गोमंतकीय भजनातील भैरवी, आरत्या व उपसंहार
गोमंतकीय भजनातील भैरवी, आरत्या व उपसंहार

गोमंतकीय भजनातील भैरवीवेळी ‘विनंतीपर अभंग’ अर्थांत ‘विनवणीपर अभंग’ सादर करण्याचा पूर्वापर प्रघात आहे. अशा प्रकारच्या अभंगांच्या माध्यमातून देवासमोर विनवणी केली जाते. सर्वसाधारणपणे संतपर अभंगांच्या नंतर विनंतीपर अभंग सादर केले जातात. तथापि, त्याबाबत विशेष बंधन नाही. सर्वसाधारणपणे विनंतीपर अभंग भजनातील भैरवीवेळी सादर करण्याची गोमंतकीय भजनाची परंपरा अद्याप अबाधित आहे. परंतु, त्याबाबतही विशेष असा नियम नाही. विनंतीपर अभंगांच्या ऐवजी अन्य प्रकारचे अभंगही काही ज्येष्ठ कलाकार आवर्जून सादर करीत असतात.

‘भैरवी’ या शब्दाचे दोन अर्थ आहेत. कुठल्याही कृतीचा अथवा कार्याचा अखेरचा टप्पा म्हणजे भैरवी असा अर्थ जनमानसात सर्वाधिक प्रचलित आहे. तसेच, संगीतातील एका रागाचे नाव ‘भैरवी’ असे आहे. त्याचप्रमाणे ‘भैरवी’ नावाचा थाटही संगीत क्षेत्रात शतकानुशतके प्रचलित आहे. ऐकावयास अतिशय गोड वाटणारे राग सर्वसाधारणपणे कार्यक्रमाच्या शेवटी गायिले जाण्याचा प्रघात संगीत क्षेत्रांत शेकडो वर्षांपासून रूढ आहे. उदाहरणार्थ, ‘जीवनपुरी’, ‘भीमपलास’, ‘मालकंस’, ‘भैरवी’ यांसारखे कित्येक राग ऐकायला गोड वाटतात. तथापि, त्यापैकी ‘भीमपलास’ हा राग गोड वाटत असला तरी सर्वसाधारणपणे सुरुवातीला सादर केला जातो, तर ‘जीवनपुरी’ रागातील अभंग भजनाच्या साधारणत: मध्याच्या टप्प्यात सादर केला जातो. परंतु, मालकंस, भैरवी यांसारखे सर्वाधिक गोड व भावनाप्रधान राग भजन कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यातच सादर करतात; कारण, कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात सादरीकरणाचा परमोच्च बिंदू गाठायचा प्रयत्न असतो. विनंतीपर अभंगांची उदाहरणे म्हणून ‘‘माझी शेवटची विनवणी। संतजनीं परिसावी।।’’ (संत तुकाराम), ‘‘कृपाळू सज्जन तुम्हीं संतजन। एवढें कृपादान तुमचें मज।।’’ (संत तुकाराम) इत्यादी अभंगांची उदाहरणे देता येतील.

वास्तविक, भारतीय रागदारी संगीताच्या नियमानुसार भैरवी राग विशिष्ट प्रहरी गातात. परंतु, प्रहरानुसार रागगायन करण्याचे बंधन प्रकर्षाने पाळणे भजन कलाकारांना शक्य होत नाही; कारण, दोन-तीसांचे भजन कार्यक्रम दिवसभारात कधीही असू शकतात. त्यामुळे, प्रहरानुसार रागांचे गायन करण्याचा नियम भजनाच्या बाबतीत थोडासा बाजूला ठेवावा लागतो.

भैरवी हा भारतीय रागदारी संगीतातील अतिशय लोकप्रिय राग. भजनात प्रचलित असलेला भैरवी या शब्दाचा सर्वसाधारण रूढ अर्थ म्हणजे त्या कार्यक्रमातील शेवटच्या अभंगाचे/काव्याचे सादरीकरण. ते काव्य भैरवी रागातच भजनात गायिले जाते. भजनात ‘भैरवी करणे’ या शब्दसमूहाचा अर्थ असा नाहे की त्या कार्यक्रमातील अखेरचे काव्य अर्थांत अभंग भैरवी रागात सादर करणे.

गोमंतकीय भजनात भैरवी राग शेवटी गाण्याचा प्रघात असला तरी भारतीय रागदारी संगीतात भैरवी राग नेहमी शेवटीच गातात असे ठामपणे म्हणता येत नाही. भारतीय रागदारी संगीतात भैरवी राग कार्यक्रमात कधीही गायिला जातो. कधी कार्यक्रमाच्या प्रारंभी, कधी कार्यक्रमाच्या मध्ये, तर कधी कार्यक्रमाच्या शेवटी तो राग गायिला जातो. रागदारी संगीताचे कलाकार सर्वसाधारणपणे प्रहरानुसार राग सादर करण्याचे बंधन पाळण्याचा प्रयत्न करीत असले तरी ते नेहमीच शक्य होते असे नाही. भजनसम्राट मनोहरबुवा शिरवागवकर ‘जय जय रामकृष्ण हरी’ हा गजर काही वेळा भजन कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात भैरवी रागात गात होते, असे या क्षेत्रातील काही जाणकार व्यक्तींनी माझ्याशी बोलताना सांगितले होते. पं. सोमनाथबुवा च्यारी यांनीही एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्याबाबत दुजोरा दिलेला होता व त्या कार्यक्रमाला मी स्वत: उपस्थितही होतो.

मध्यमामध्ये अर्थांत मध्यम स्वरात गौळणी सादर केल्यानंतर भैरवी गायन करताना एखादा पुरुष गायक मूळ पट्टीत (काळी दोन मध्ये) येऊन अथवा मध्यमातूनही (काळी चार मध्ये) भैरवी सादर करू शकतो. त्याबाबत संबंधित गायक स्वातंत्र्य घेऊ शकतो. पथकातील मुख्य गायक व सहकारी कलाकार मध्यमामध्ये भैरवी सादर करू शकतात का, त्यांचा आवाज त्यासाठी पूरक आहे का, हे जाणून घेऊनच त्यासंदर्भात निर्णय घ्यावा. उगाच गायन करताना ‘ओढाताण’ करू नये. ते गायन कृत्रिम वाटेल... मारून-मुटकून केलेले गायन वाटेल... भजनात नैसर्गिकता जपली पाहिजे. असे असले तरी शक्यतो मूळ पट्टीत येऊन भजनाचा शेवट करावा अर्थांत भैरवी सादर करावी; कारण, ज्या पट्टीत आपण भजनाची सुरुवात करतो, त्याच पट्टीत भजनाचा शेवट करावा, असा एक संकेत असल्याचे कित्येक जाणकार सांगतात. परंतु, दुसरा भिन्न स्वरूपाचा मतप्रवाह असा आहे, की भजनाच्या आवाजाची पट्टी उत्तरोत्तर चढत्या क्रमानेच असावी; ती पट्टी स्थिर राहिली तरी चालेल; पण, ती कदापि खाली आणता कामा नये. असे हे परस्परविरोधी मतप्रवाह असले तरी त्याबाबत विशेष बंधन नाही, हेही तेवढेच खरे आहे.

एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या व्यक्तीने भजन कार्यक्रमाची सुरुवात केलेली असेल, त्याच व्यक्तीने भजनाचा शेवट करावा अर्थांत भजनातील भैरवी सादर करावी, असाही संकेत आहे. तथापि, काही ठिकाणी कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी मर्यादित वेळ उपलब्ध असतो व सर्व कलाकारांना गायनाची संधी मिळावी या हेतूने अन्य एखाद्या कलाकाराला भैरवी सादर करण्याची संधी दिली तर त्याबाबत फारसे गैर असे काहीच नाही. एरवी, भैरवी सादर करण्याचा पहिला मान असतो तो त्या भजन पथकातील प्रमुख गायकाचा व त्याने संमती दिल्यास अन्य गायकही भजनाची भैरवी सादर करू शकतो. प्रमुख गायकाकडे दुर्लक्ष करून, अप्रत्यक्षपणे याबाबत त्याचा अवमान करून भजनातील भैरवीगायन करण्याचा उपद्‍वाप कदापि करू नये.

भैरवी व आरत्यांच्या सादरीकरणानंतर ‘मागणीपर अभंग’ भजनाच्या अखेरच्या टप्यातच सादर करावे, असा रूढ संकेत आहे. त्यामुळे, भजनाच्या सुरुवातीलाच मागणीपर अभंग सादर करून कार्यक्रमाचा बेरंग करू नये. अशा स्वरूपाचे अभंग सर्वसाधारणपणे ‘आरत्या’ झाल्यानंतर सादर करावेत, याचे भान ठेवावे. तथापि, त्याबाबतही काटेकोरपणे नियम/पथ्य पाळण्याची गरज नाही. उदाहरणार्थ, क्वचितप्रसंगी एखादा मागणीपर अभंग भैरवीच्या माध्यमातून सादर केल्यास त्याबाबत वावगे असे काहीच नाही. मागणीपर अभंगांची उदाहरणे पुढीलप्रमाणे: ‘‘हरी तुझें नाम गाईन अखंड। याविणे पाखंड नेणो कांही।।’’ (संत तुकाराम), ‘‘मागणें हें एक देई भक्तिप्रेम। देवा तुझें नाम गाईन मी।।’’ (स्वामी स्वरूपानंद), ‘‘मागणे हे एक तुजप्रति आहे। देसील तरी पाहे पांडुरंग।।’’, ‘‘आकल्प आयुष्य व्हावें तया कुळा। माझिया सकळां हरीच्या दासा।।’’, ‘‘पंढरीचा वास चंद्रभागे स्नान। आणिक दर्शन विठोबाचे।।’’

मागणीपर अभंगाच्या नंतर प्रसादवाटपावेळी ‘‘पाहें प्रसादाची वाट। द्यावें धुवोनियां ताट।।’’ (संत तुकाराम) यांसारखे अभंग म्हटले जातात. भजनाच्या उपसंहारामध्ये मागणीपर अभंग आणि वरप्रसादपर अभंग यांचा समावेश होतो. उपसंहारानंतर वारकरी शैलीचा गजर आणि/अथवा भारूड व जयघोष करता येतो. अर्थांत भजनातील भैरवी, आरत्या, उपसंहार इत्यादी झाल्यानंतर पुढीलप्रमाणे एखादा गजर अथवा तत्सम अन्य गजर घेता येईल. ‘‘पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी।।’’, ‘‘ज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम।।’’ त्यानंतर पुढीलप्रमाणे जयघोष करता येईल. ‘‘श्री गजानन महाराज की जय।। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ...... महाराज/माता की जय। (स्थानिक दैवताचा जयघोष), श्री ज्ञानदेव तुकाराम।’’

बोधपर श्लोक आणि मागणीपर अभंग झाल्यानंतर प्रसाद वितरावेळी तसेच वितरणानंतर त्या प्रसंगाला अनुरूप असे ‘प्रसादाचा अभंग’ म्हणण्याची प्रथा गोव्यात पूर्वी मोठ्या प्रमाणात होती. परंतु, आज ती प्रथा गोव्यात सहसा सापडत नाही. तथापि, अजूनही काही मोजक्याच मंदिरांत ते अभंग आवर्जून म्हटले जातात. प्रसाद-वितरणावेळीचा म्हटला जाणारा संत तुकारामांचा अभंग ‘‘पाहें प्रसादाची वाट। घ्यावें धुवोनियां ताट।।’’ गोव्याचे भजनसम्राट मनोहरबुवा शिरगावकर मल्हार रागात गायचे, अशी आठवण गोव्यातील एक दिग्गज भजन कलाकार पं. सोमनाथबुवा च्यारी यांनी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात अर्थांत कला अकादमीने स्वत:च्या पणजी येथील संकुलात आयोजित केलेल्या भजन कार्यशाळेत कथन केली होती. प्रसाद वितरणानंतर संत तुकारामांचा ‘‘पावला प्रसाद आतां उठोनी जावें। आपला तो श्रम कळों येतसे भावें।।’’ हा अभंग (विठोबाची शेजारती) काही ठिकाणी अजूनही सादर केला जातो. त्यानंतर पुन्हा विविध दैवतांचा नामघोष केला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com