बोरीत १६ ऑक्टोबरपर्यंत भजन महोत्सव चालणार

प्रतिनिधी
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

गोमंतकामध्ये भजन सप्ताहाची मुहूर्तमेढ रोवणारे आणि बोरीच्या श्री नवदुर्गा मंदिराचा जीर्णोद्धार करणारे संत जगन्नाथबुवा बोरीकर यांच्या समाधी मंदिरात शुक्रवारी ४ सप्टेंबरला संत बोरीकर यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त भजन महोत्सव सुरू झाला आहे. 

बोरी: गोमंतकामध्ये भजन सप्ताहाची मुहूर्तमेढ रोवणारे आणि बोरीच्या श्री नवदुर्गा मंदिराचा जीर्णोद्धार करणारे संत जगन्नाथबुवा बोरीकर यांच्या समाधी मंदिरात शुक्रवारी ४ सप्टेंबरला संत बोरीकर यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त भजन महोत्सव सुरू झाला आहे. 

अधिक मासामुळे हा भजन महोत्सव शुक्रवारी १६ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या निमित्त संत जगन्नाथबुवांच्या समाधी मंदिरातील मूर्तीवर नित्य अभिषेक, पूजा, अर्चा व रात्री भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

शुक्रवारी या पुण्यतिथी उत्सवानिमित्त कार्यक्रमाला विधिवत प्रारंभ झाला. श्री नवदुर्गा देवीचे अर्चक दत्तात्रय उर्फ बाबू देवारी यांच्या हस्ते पारंपरिक समई प्रज्वलित करून आणि संत जगन्नाथ बुवांच्या मूर्तीला पुष्पहार घालून कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
 
यावेळी कीर्तनकार शिवाजीबुवा सावकर, विश्र्वंभर उर्फ बाप्पा देवारी, जितेंद्र खोलकर, वेदशास्त्र संपन्न विनायक भट, बाबल भट बोरकर, उदय नाईक, विश्र्वनाथ वर्दे बोरकर, दिगंबर देवारी, दिलीप उर्फ दीपा च्यारी, दत्ता परवार, सचिन बोरकर, रामचंद्र पेडणेकर, विनोद नाईक, आनंद नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. 

दत्तात्रय देवारी म्हणाले, संत जगन्नाथ बुवा बोरीकर यांनी गोमंतकाबरोबरच शेजारच्या राज्यात भजनी सप्ताहाची परंपरा सुरू करून समाजात एकोपा आणि बंधूभाव निर्माण केला. त्यांच्या शिकवणी आणि रचलेल्या अभंगाचा आशय आत्मसात करून समाजात सगळ्यांनी सलोख्याने वावरायला हवे. यावेळी भजनाच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. रात्री आरत्या झाल्या. शुक्रवारी १६ बर ऑक्टोरोजी संत जगन्नाथ बुवा समाधी मंदिरात श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे.

रात्री खाणीर या ठिकाणाहून संत जगन्नाथबुवांच्या मूर्तीची मिरवणूक काढली जाणार आहे. सामाजिक अंतर ठेवून हा व भजनाचा कार्यक्रम होणार असून, भाविकांनी मास्क बांधून आणि सामाजिक अंतर ठेवून या कार्यक्रमात भाग घ्यावा व नित्यरात्री होणाऱ्या भजनाच्या कार्यक्रमात भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या