फातोर्ड्यातील भंडारी नेत्यांनी गोवा फॉरवर्डमध्ये केला प्रवेश !

भंडारी समाजातील भाजपचे (BJP) माजी नेते दत्तप्रसाद मांद्रेकर (Dattaprasad Mandrekar) आणि वनिता मडकईकर (Vanita Madakaikar) यांनी रविवारी गोवा फॉरवर्ड पक्षात (Goa Forward Party) प्रवेश केला.
फातोर्ड्यातील भंडारी नेत्यांनी गोवा फॉरवर्डमध्ये केला प्रवेश !
Vijay Sardesai & Dattaprasad Mandrekar & Vanita Madakaikar &

मडगाव: भंडारी समाजातील भाजपचे (BJP) माजी नेते दत्तप्रसाद मांद्रेकर (Dattaprasad Mandrekar) आणि वनिता मडकईकर (Vanita Madakaikar) यांनी रविवारी गोवा फॉरवर्ड पक्षात (Goa Forward Party) प्रवेश केला. मागील दहा वर्षापासून विजय सरदेसाई (Vijay Sardesai) भेदभाव न करता विकास करत असल्याचे आणि विकासाच्या मार्गावर सर्वांना बरोबर घेवून जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मांद्रेकर आणि मडकईकर यांनी नुकतेच भाजप नेते दामोदर नाईक यांच्यावर आरोप करत भाजपचा राजीनामा दिला होता. सरदेसाई यांनी दोघांचे आपल्या पक्षात स्वागत केले आणि त्यांना पक्षात सर्व सन्मान आणि योग्य पदे मिळतील असे सांगितले. फातोर्डा गट अध्यक्ष पीटर फर्नांडिस (Peter Fernandes) हे देखील यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना विजय सरदेसाई म्हणाले की, फातोर्डाच्या विकासाबाबत त्यांनी धर्म, जात आणि पक्षपातळीवर कधीही भेदभाव केला नाही. "माझ्या गेल्या दहा वर्षांच्या फातोर्डाचा आमदारकीच्या कारकिर्दीत मी भाजपच्या एकाही कार्यकर्त्याला त्रास दिला नाही. तसेच माजी आमदार दामोदर नाईक यांनाही कधीच त्रास दिला नाही. "खासगी वनजमिनीत कोणी भूखंड बनवले आहेत, हेही मला माहीत आहे. मात्र आजपर्यंत आम्ही हा मुद्दा उपस्थित केलेला नाही." असे ते म्हणाले. "आम्ही कधीही भेदभाव केला नाही, मग तो भाजप असो किंवा इतर कोणताही पक्ष, एकदा निवडणूक संपली की आम्ही कोणालाही आमचे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले नाही. आम्ही फातोर्डा पुढे नेण्यासाठी आमचे प्रयत्न केले आहेत आणि हे प्रयत्न चालूच आहेत." असे सरदेसाई म्हणाले. सरदेसाई म्हणाले की, 'फ्युचर रेडी फातोर्डा' ही संकल्पना मुलांना चांगले भविष्य देण्यासाठी आहे. "प्रो ॲक्टिव्ह, पॉझिटिव्ह आणि फॉरवर्ड विचार करणारे लोक आमच्यात सामील होत आहेत, कारण त्यांना माहित आहे की आम्ही आमच्या गोंय, गोंयकार आणि गोंयकारपणाचे संरक्षण करून पुढे जात आहोत." असे सरदेसाई म्हणाले. फातोर्डामध्ये ‘लोकांच्या संमतीने विकास’ होत असून हा मॉडेल गोव्याला पुढे नेणार असल्याचे ते म्हणाले.

Vijay Sardesai & Dattaprasad Mandrekar & Vanita Madakaikar &
गोव्यात सत्ता कुणाची हे 19 डिसेंबरला स्पष्ट!

दत्तप्रसाद मांद्रेकर यांनी विजय सरदेसाई यांनी केलेल्या विकासाचे कौतुक करून त्यांनी कधीही भेदभाव केला नसल्याचे सांगितले. "गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी योग्य नियोजन करून चांगला विकास केला आहे." असे ते म्हणाले. भंडारी समाजाचा राखिवतेचा मुद्दा विधानसभेच्या अधिवेशनात उपस्थित केल्याबद्दल त्यांनी सरदेसाई यांचे आभार मानले. वनिता मडकईकर म्हणाल्या की, त्यांना भाजपमध्ये मान मिळत नव्हता आणि विकासकामांना पाठिंबाही मिळत नव्हता, त्यामुळेच त्यांनी भाजपचा राजीनामा देऊन सर्वांना पुढे घेऊन जाणाऱ्या पक्षात प्रवेश घेतला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com