भारती सामंत यांचा खूनच,अहवालातून धक्कादायक माहिती उघड

काल घटनास्थळी पोस्टमाॅर्टेम करणारे डॉ. मधू घोडकिरेकर यांच्यासोबत अन्य एक डॉक्टर आणि उपअधीक्षक किरण पोडवाळ यांनी भेट दिली.
भारती सामंत यांचा खूनच,अहवालातून धक्कादायक माहिती उघड
Bharati Sawanat murder case report from health departmentDainik Gomantak

वरकटो-सांगे येथील भारती राजेंद्र सामंत या महिलेचा चोरीच्या हेतूने गळा आवळून खून केल्याचे वृत्त प्रथम दैनिक ‘गोमन्तक’ने दिले होते. त्याला आरोग्य खात्याच्या अहवालामुळे पुष्टी मिळाली आहे. सांगे पोलिसांनी पोस्टमाॅर्टेम अहवाल उघड केला नसला तरी आरोग्य खात्याने उत्तरीय तपासणी अहवालात भारती यांचा मृत्यू झटापटीत गळा आवळल्याने झाला असल्याचे नमूद केले आहे.

काल घटनास्थळी पोस्टमाॅर्टेम करणारे डॉ. मधू घोडकिरेकर यांच्यासोबत अन्य एक डॉक्टर आणि उपअधीक्षक किरण पोडवाळ यांनी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करून सर्व शक्यता पडताळून पाहिल्या. त्यामुळे भारती सामंत यांचा नैसर्गिक मृत्यू म्हणून पाहणाऱ्या सांगे पोलिसांसमोर भारती यांच्या मारेकऱ्याला शोधून काढण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. (Bharati Sawanat murder case report from health department)

काय आहे आरोग्य खात्याच्या अहवालात

हा खून रविवारी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान झाला असावा. सोमवारी दिवसभर त्यांचे दुकान बंद होते. म्हणून मंगळवारी सकाळी शेजाऱ्यांनी मोबाईलवर रिंग दिली. फोन उचलला जात नाही म्हणून पोलिसांना पाचारण केल्यावर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला होता. पोस्टमार्टम अहवाल बुधवारी मिळाला; पण पोलिसांनी तो उघड केला नाही. गुरुवारी दुपारी पोलीस उपअधीक्षक किरण पोडवाळ, डॉ. मधू घोडकिरेकर, पोलीस निरीक्षक प्रवीण गावस यांनी घटनास्थळाला भेट देऊन तासभर पाहणी केली. खुनी कोणत्या मार्गाने आला अन कोणत्या मार्गाने गेला असावा अशा बारकाव्यांची शक्या-शक्यता या तुकडीने पडताळून पाहिली.

रविवारी रात्री जेवण होण्याआधीच चोराने घरात शिरून भारती यांचा गळा आवळून खून केला असावा. कारण कुकरमध्ये शिजविलेला भात तसाच होता. शिवाय भारती झोपण्याआधी घराबाहेरील सर्व दिवे बंद करायच्या. दिवे तसेच सुरू होते, याचा अर्थ खुन्याने रात्री दहा ते अकराच्या कालावधीत त्यांच्याशी झटापट केली असावी. खुनी सराईत गुन्हेगार असावा. भारती यांच्या कानातील दागिने तसेच होते. हाताला मिळेल ते घेऊन जाताना दोघांमध्ये झटापट झाली असावी. कदाचित भारती यांना जीवंत सोडल्यास आपले पितळ उघडे पडेल म्हणून खुन्याने दोरी किंवा अन्य साहित्य वापरून त्यांचा खून केला असावा. त्यांच्या शरीरावर अन्य भागांवरही जखमा आढळून आल्या आहेत. त्यांच्या घरातील नेमके किती सोने लंपास झाले ते समजू शकले नसले, तरी दुकानातील रोखड लंपास केली असावी. एका आठवड्यात साठ हजार रुपयांचा होलसेल माल त्या खरेदी करीत होत्या. ती रोकड खुन्याने हडप केली असावी, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

Bharati Sawanat murder case report from health department
भारती सामंत खून प्रकरण: पोस्‍टमॉर्टम रिपोर्टमध्‍ये दडलेय काय?

सांगे पोलीस यंत्रणा आपल्या पद्धतीने तपास कार्याला लागली असून शेजाऱ्यांकडून माहिती मिळवण्यास सुरवात केली आहे. यापूर्वी दोन वेळा त्यांच्या घरात शिरून चोराने हाताला लागेल ते घेऊन पोबारा केला होता. या घटनेची माहिती भारती यांनी शेजाऱ्यांना दिली होती. पण प्रकरण चिघळल्यास आपल्याला काहीतरी झाले तर म्हणून त्या पोलीस तक्रार करण्याच्या भानगडीत पडल्या नव्हत्या. याचाच फायदा घेऊन चोराने तिसऱ्यांदा त्यांचा जीव घेतला असावा.

माहीतगार व्यक्तीचे कृत्य खुनी हा भारती यांच्या परिचयाचा असावा. कारण घरात कोणीही नाही याचा फायदा घेऊन घरात शिरण्याची जागा, नंतर पळण्याच्या वाटा याची सर्व माहिती करूनच हा प्रकार केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Bharati Sawanat murder case report from health department
Goa Crime: सांगेत चोरीच्या हेतूने महिलेचा निर्घृण खून

भारती सामंत यांच्या घराबाहेर नायलॉन दोरीचा तुकडा पडलेला आढळून आला असून कदाचित तिचा वापर खुन्याने केला असावा. पण पोलिसांनी तो अद्याप ताब्यात घेतलेला नाही.

व्यसनाधीनतेतून कृत्य केल्याचा संशय

भारती सामंत यांचा खून करणारा एकटा किंवा त्याच्या सोबतीला आणखी कोणी असू शकते. व्यसनाधीन, खास करून ड्रग्सचे व्यसन लागलेली व्यकती कोणत्याही थराला जाऊ शकते. त्याचाच हा परिणाम असू शकतो, असा तर्क व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com