गोवा सरकारच अडकले चक्रव्‍युहात !

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 28 जानेवारी 2021

सत्तरी तालुक्यात एवढे दिवस शांत असलेला भूमिपुत्र मंगळवारी जागृत होऊन हजारोंच्‍या संख्येने संघटित होऊन आक्रमक झाला. वाळपईत आयोजित केलेल्या महारॅलीला सत्तरीतील तमाम असंख्य भूमिपुत्रांनी सहभागी होऊन जमीन मालकीसाठी आग्रही भूमिका घेत सरकारवर टीकांचे ताशेरे ओढले.

वाळपई : सत्तरी तालुक्यात एवढे दिवस शांत असलेला भूमिपुत्र मंगळवारी जागृत होऊन हजारोंच्‍या संख्येने संघटित होऊन आक्रमक झाला. वाळपईत आयोजित केलेल्या महारॅलीला सत्तरीतील तमाम असंख्य भूमिपुत्रांनी सहभागी होऊन जमीन मालकीसाठी आग्रही भूमिका घेत सरकारवर टीकांचे ताशेरे ओढले. सत्तरी तालुक्यात पोर्तुगीज काळात 26 जानेवारी 1852’ रोजी क्रांती झाली होती. त्‍यामुळे या दिनाला विशेष महत्त्‍व प्राप्‍त झाले आहे.

वाळपईत काल प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून व क्रांतीवीर दीपाजी राणे यांनी 26 जानेवारी 1852 साली वाळपईच्या नाणूस किल्‍ल्यावर केलेल्या पोर्तुगीजांविरोधातील बंडाच्या पार्श्वभूमीवर जमीन मालकीसाठी महारॅलीचे आयोजन केले होते. त्‍याला उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद लाभला. वाळपई फोंडा तिस्कावर सकाळी दहा वाजल्‍यापासून भूमिपुत्र जमा होण्यास प्रारंभ झाला. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. रॅलीवेळी वाहतुकीला कोणतीही अडचण होणार नाही याची पुरेपूर काळजी पोलिसांनी यावेळी घेऊन चोख व्यवस्था केली होती. 11 वा. रॅलीला सुरवात झाली. वाळपई इस्पितळ, न्यायालय येथून रॅली प्रयाण करीत शहीद स्तंभाकडून वाळपई बाजारात माहारॅली पोहोचली. वाळपई पालिका मंचावर प्रकट कार्यक्रम झाला. यावेळी शुभम शिवोलकर, राम मेळेकर, दशरथ मांद्रेकर, रोशन देसाई, ॲड. गणपत गावकर, ॲड. शिवाजी देसाई, राजेश गावकर, विश्वेश प्रभू, रणजीत राणे, सडयो मेळेकर, गोवा रिव्होनेशनरीचे मनोज परब, राजन घाटे आदींची उपस्थिती होती. 

सरकारच अडकले चक्रव्‍युहात
करंझोळचे बातू आपा गावडे म्हणाले जमिनी आमच्या पूर्वजांच्या आहेत. म्हादई जाहीर केले विश्वासात घेतले नाही. रणजीत राणे म्हणाले सरकार वनखात्याव्दारे देवस्थानावरही डोळा ठेवत आहे. अभयारण्यातही मंदिरे घातली आहेत. सरकारकडे आम्ही भीग मागत नाही, तर तो आमचाच हक्क व अधिकार आहे, ॲड. शिवाजी देसाई म्हणाले, सरकारने लोकांची दिशाभूल केली. मेळावलीच्या लोकांविरूध्द जे चक्रव्युह आखले होते. त्यातच सरकार फसले आहे. आरोग्यमंत्र्यांनी खुशाल आपल्या सोबत चर्चेसाठी यावे असे खुले आव्हान देसाई यांनी दिले. ॲड. गणपत गावकर म्हणाले लोकशाहीने आम्हाला हक्क दिले आहेत. कायदे आमच्यासाठी आहेत. कै. जयसिंगराव राणे यांनी सुरू केलेली ही चळवळ पुढे नेण्याची गरज आहे. शुभम शिवोलकर टिप्पणी करताना म्हणाले, 1987 साली, 1992 साली सत्तरीचेच एक लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री, वनमंत्री, कायदेमंत्री, महसूलमंत्री होऊन गेले. त्यावेळी मोकाशेचा प्रश्न निकालात काढून मोकाशेचे मात्र ‘क्लियर टायटल’ केले. मात्र अन्य जमिनींच्या बाबतीत मात्र कब्जेदार म्हणून लोकांना केले. जमिनी वर्ग दोनमध्ये समाविष्ठ केल्या. तसेच म्हादई अभयारण्य जाहीर होण्याअगोदर अभयारण्य समितींवर देखील येथील लोकप्रतिनिधी होते. त्यावेळी जमीन मालकीचा विषय सोडविण्यास संधी होती. शिवदास सावंत, दशरथ मांद्रेकर, महादेव गावकर, सुहास नाईक, मनोज परब, राजन घाटे आदींनी विचार मांडून पाठिंबा दिला. शुभम शिवोलकर यांनी सूत्रनिवेदन केले. यावेळी विविध देवस्थानच्या गावकरी मंडळींच्यावतीने जमीन मालकी मिळावी म्हणून सडयो मेळेकर यांनी विविध देवतांना सांगणे केले.

आम आदमी पक्षाच्या बैठकीत अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा -

विश्‍वेश प्रभू म्हणाले, सत्तरीत करंझोळ, म्हाऊस गावाला इतिहास आहे. पोर्तुगीजांविरोधात दीपाजी राणे यांना या दोन्ही गावच्या लोकांनी साथ दिली होती. तशीच आताही मेळावलीच्या आयआयटी विरोधात या दोन्ही गावकरी मंडळींनी मोठी साथ दिली आहे. त्यामुळे सत्तरीतून स्वाभिमानी लोकांचा मोठा उठाव झालेला आहे. त्यामुळे जमीन मालकीचा उठाव यशस्वी होणारच. पोर्तुगीजांनी जमीन मालकी दिली. पण आता सरकारने ती मालकी हिरावली आहे. राजेश गावकर म्हणाले, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उपजिल्हाधिकारी कार्यालयात दाद मागावी असे म्हटले. पण, ते खोटे सांगत आहेत. मुळातच सत्तरीतील लोकांकडे हजारो वर्षाची परंपरा आहे.

संबंधित बातम्या