पवसामुळे डिचोली जलमय

bicholim flood
bicholim flood

डिचोली

कालपासून सक्रिय झालेल्या पावसाने आज दुसऱ्या दिवशी डिचोलीत जोरदारपणे हजेरी लावली. आज सकाळी तासाहून अधिक वेळ बरसल्यानंतर दुपारी डिचोलीत सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. दुपारी पडलेल्या जोरदार पावसामुळे डिचोली शहरातील काही भागात गटारे तुंबून रस्ते पाण्याखाली आले. शहरातील जुने बसस्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदानामधील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने परिसर जलमय झाला होता. टपाल कार्यालय आणि तेथील काही दुकानातही पाणी शिरले. बोर्डे भागातही अशीच परिस्थिती झाली होती.
शहरातील कदंब बसस्थानकावरील खड्ड्यांनी पाणी भरल्याने बसस्थानकाला जलमय स्वरुप प्राप्त झाले होते. आजच्या पावसात गटारे तुंबून पाणी बाहेर फुटल्याने शहरातील मॉन्सूनपूर्व कामांबाबतीत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. आजच्या पावसात डिचोली शहरासह तालुक्‍यातील अनेक भागातही रस्ते पाण्याखाली गेल्याचे वृत्त असून, जनजीवनही पूर्णपणे विस्कळीत झाले. कारापूर आदी काही भागात झाडांची पडझड झाली. मात्र, मोठी वित्तहानी झाली नसल्याची माहिती डिचोली अग्निशमन दलाकडून मिळाली आहे. दरम्यान, तालुक्‍यातील सर्वच भागात आज जोरदार पाऊस पडल्याचे वृत्त आहे. पावसामुळे बहूतेक भागात पाण्याबरोबर माती आदी कचरा आदी रस्त्यावर वाहून आल्याचे दिसून येत होते. आज पडलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील बळीराजा सुखावल्याचे जाणवत आहे.

शहर जलमय..!
आज दुपारी पडलेल्या जोरदार पावसात शिवाजी महाराज मैदानाजवळील रस्त्याच्या बाजूची गटारे तुंबून पाणी बाहेर फुटले. त्यामुळे जुने बसस्थानक परिसर जलमय झाला. जुन्या बसस्थानकावरील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याचा पायथा पाण्याखाली येवून जवळच असलेल्या टपाल कार्यालयात तसेच समोरील शितपेय आणि अन्य काही आस्थापनात पाणी शिरल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, मोठी आपत्ती ओढवली नाही. डिचोली-म्हापसा महामार्गावरील बोर्डे येथे तसेच बाजार परिसरही जलमय झाला होता. पावसाने वेळीच उसंत घेतल्याने लगेचच पाणी ओसरले. ‘टाळेबंदी’मुळे बाजारातही गर्दी कमी असल्याने पावसाचा मोठा परिणाम जाणवला नाही. आजच्या जोरदार पावसात शहरातील अनेकठिकाणी गटारे तुंबल्याने शहरात केलेल्या मॉन्सूनपूर्व साफसफाईच्या कामाबाबत प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

नाईकनगरात नाला तुंबला...!
आजच्या पावसात बोर्डे येथील हरिजनवाड्याजवळील नाईकनगर भागातील नाला तुंबून पाणी रस्त्याबाहेर फुटले. रस्त्याखालील पाईपमध्ये पालापाचोळा अडकून राहिल्याने पाणी रस्त्यावरुन वाहत होते. पाण्याचा प्रवाह पाहून तेथील नागरिकांत गोंधळ निर्माण झाला. मागील वर्षीही सुरवातीच्या पावसात हा नाला तुंबला होता. दरवर्षी नाला तुंबत आहे, त्याठिकाणी कायमची उपाययोजना मार्गी लावावी. अशी मागणी नागरिकांनी पुन्हा एकदा पुढे केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com