दुकाने बंद करण्याच्या वेळेवरुन डिचोलीत गोंधळ

bicholim
bicholim

डिचोली

दुकाने बंद करण्यावरुन डिचोलीतील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असतानाच, पुढील सुचना मिळेपर्यंत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार बाजारातील दुकाने उघडी ठेवावी. अशी सुचना पालिकेच्या काही नगरसेवकांनी केल्याने बाजारातील दुकानदारांमध्ये निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला आहे. आज (गुरुवारी) बाजारातील दुकानदारांनी आपली दुकाने नियमितपणे सायंकाळी उशिरापर्यंत उघडी ठेवली होती. नेहमीप्रमाणे दुकाने उघडी ठेवताना सामाजिक अंतराचे भान ठेवावे. असे आवाहनही दुकानदारांना करण्यात आले आहे.
नगराध्यक्षांच्या सुचनेनुसार, काल (बुधवारी) बाजारातील बहुतेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सायंकाळी लवकर बंद केले होती. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार रात्री नऊ ते पहाटे पाच या वेळेत दुकाने बंद ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, या वेळेवरुन पालिकेत काहीसा गोंधळ झाल्याचे समजते. त्यातच कोविड संसर्गाची भीती, यामुळेच दुकाने लवकर बंद करण्याची सूचना करण्यात आल्याचे समजते.
बाजारातील ग्राहक आणि वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी बाजारात जाणारे बहूतेक मार्ग अडथळे निर्माण करून बंद करण्यात आले आहेत. गर्दी टाळण्यासाठी जनतेने सहकार्य करावे. असे आवाहनही पालिकेने केले आहे.
दरम्यान, एकाबाजूने पालिकेच्या सुचनेनुसार दुकानदारांनी दुकाने बंद केली असली, तरी उद्यापासून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार निर्धारीत केलेल्या वेळेत म्हणजेच पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत दुकानदारांनी आपली दुकाने सुरू ठेवावीत, असे उपनगराध्यक्ष कुंदन फळारी आणि बाजार समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक अजित बिर्जे यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी नगरसेवक गुरुदत्त पळ उपस्थित होते.

दुकानदार संभ्रमात..!
‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी डिचोली पालिका सजग झाली असून, बाजारातील गर्दीवर नियंत्रण येण्यासाठी पालिकेने कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार काल नेहमीप्रमाणे साप्ताहीक बाजार भरला नाही. बाजारातील गर्दीवरही नियंत्रण ठेवण्यातही पालिकेला यश आले होते. मात्र, किरणा आदी अन्य दुकाने मात्र उघडण्यात आली होती. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सायंकाळी पाच वाजता बंद करावीत, अशी सुचना नगराध्यक्षांनी केल्याने बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ झाला. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार रात्री नऊ वाजेपर्यंत दुकाने ठेवता येतात, असा दुकानदारांचा दावा आहे, असे असतानाही दुकाने लवकर बंद करण्याच्या सुचनेमुळे दुकानदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com