गोवा सरकारसमोर बैलांच्या झुंजी थांबविण्याचे मोठे आव्हान

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

उत्तर गोव्यात मांद्रे येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलांच्या झुंजीवेळी एक बैल गतप्राण झाला त्यामुळे पुन्हा बैलांच्या झुंजी चर्चेत आल्या आहेत.  यापूर्वी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पोलिसांनी अशा झुंजींवर कारवाई करण्यासाठी खास पथके स्थापन करावीत असा आदेश दिला होता.

पणजी: बैलांच्या झुंजी गोव्यामध्ये सर्रासपणे आयोजित केल्या जात असल्याने त्याविरोधात सरकारने कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन प्राणिमित्र संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. यापूर्वी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पोलिसांनी अशा झुंजींवर कारवाई करण्यासाठी खास पथके स्थापन करावीत असा आदेश दिला होता.

गोव्यामध्ये बैलांच्या झुंजी आयोजित करण्याची मोठी परंपरा आहे. अशा झुंजींवर लाखो रुपयांच्या पैजा लावल्या जातात. सर्वोच्च न्यायालयाने अशा झुंजींवर बंदी घातल्यानंतर त्या कायदेशीर करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत असा विषय विधानसभेतही गाजला होता. बैलांच्या झुंजी आयोजित करणे म्हणजे बैलांचा छळ नव्हे असा युक्तिवादही त्या वेळी करण्यात आला होता. 

अलीकडे उत्तर गोव्यात मांद्रे येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलांच्या झुंजीवेळी एक बैल गतप्राण झाला त्यामुळे पुन्हा बैलांच्या झुंजी चर्चेत आल्या आहेत. पोलिसांना कोणतीही कल्पना लागू न देता या बैलांच्या झुंजी आयोजित करण्यात येतात. उत्तर व दक्षिण गोव्यात याचे आयोजन होते, यात मोठी आर्थिक उलाढाल होते. प्राणिमित्र संघटनांनी आता यावर कारवाईची मागणी केली आहे. राज्य पशु कल्याण मंडळाच्या बैठकीत हा विषय पंधरा दिवसापूर्वी गाजला होता. त्यावेळी बैलांच्या झुंजींवर  कायमची बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली होती आणि ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेली होती. बैलांच्या झुंजींना स्थानिक भाषेत धिरयो या नावाने संबोधले जाते. व्हाट्सअप सारख्या समाज माध्यमांचा वापर करून आज बैलांच्या झुंजी कुठे आहेत याची माहिती सर्वत्र पसरवली जाते. यामुळे बैलांच्या झुंजी पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. आता सरकारपुढे आशा बैलांच्या झुंजी रोखणे हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

गोव्यातील गुंडांना येत्या सहा महिन्यात तडिपार करणार; मुख्यमंत्र्यांचा निर्णय 

संबंधित बातम्या