विदेशातून कोळसा आयात करण्याची गरज काय?

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

वेळ निघून गेल्यास पुढील पिढी तुम्हाला या संबंधित जाब विचारणार हे लक्षात ठेवा, असे ‘गोंयचो एकवोट’चे व माजोर्डाचे रहिवाशी क्रेसन आंताव यांनी येथे सेंट ॲण्‍ड्र्यू चर्च परिसरात झालेल्या ‘कोळसा नको’ या सभेत सांगितले.

दाबोळी: रेल्वे दुपदरीकरण व कोळशामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची मोठी शक्यता आहे. तेव्हा ती वेळ येण्यापूर्वीच जागे व्हा आणि रेल्वेचे दुपदरीकरण व कोळसा वाहतुकीला विरोध करा. वेळ निघून गेल्यास पुढील पिढी तुम्हाला या संबंधित जाब विचारणार हे लक्षात ठेवा, असे ‘गोंयचो एकवोट’चे व माजोर्डाचे रहिवाशी क्रेसन आंताव यांनी येथे सेंट ॲण्‍ड्र्यू चर्च परिसरात झालेल्या ‘कोळसा नको’ या सभेत सांगितले. यावेळी त्यांनी शेळ-मेळावलीच्या रहिवाशांनी आयआयटी नकोसाठी चालविलेल्या आंदोलनाचे कौतुक केले.

येथील सेंट अॅण्ड्र्यू परिसरामध्ये आयोजित केलेल्‍या सभेत ‘कोळसा नको’ची घोषणाबाजी केली. कोळसाप्रकरणी सरकार तुमची दिशाभूल करीत आहेत. नोकरी वगैरे काहीच मिळणार नाही. उलट पर्यावरणावर परिणाम होणार, असे आंताव यांनी स्पष्ट केले. कोळसा काँग्रेसने गोव्यात आणला असे भाजप सरकार सांगते. कोळसा आणणाऱ्यांना आम्ही घरी बसवले होते. तुम्हाला सत्तेवर आणले तुम्ही कोळसा बंद करण्यासाठी काय केले? असा सवाल त्यांनी भाजपा सरकारला विचारला. वीजमंत्री नीलेश काब्राल हे एकीकडे गोव्याकडे अतिरिक्त वीज शिल्लक राहते असे सांगतात, तर दुसरीकडे वीजवाहिन्या घालण्यासाठी पर्यावरणावर घाला घालीत आहेत, असा दावा त्यांनी केला. 

होडी मालक संघटनेचे अध्यक्ष कुस्टोडियो डिसोझा यांनी एमपीटीमुळे कोणते त्रास सहन करावे लागतात, यासंबंधी माहिती दिली. आम्हाला कोळसा व रेल्वे दुपदरीकरण नकोच आहे. त्यासाठी आम्ही ४० आमदारांना आमंत्रण पाठवूया. एक दिवस वास्को बंद ठेवून सर्व आमदार व आम्ही रेल्वेमार्गावर आडवे झोपूया असा विचार त्याने पुढे ठेवला. जे आमदार येथील ते कोळसा व दुपदरीकरण मार्ग नकोला पाठिंबा देणारे असतील हे उघड होईल असे ते म्हणाले.

गोंयचो आवाजचे समन्वयक व्हिरियातो फर्नांडिस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अदानी यांना लक्ष केले. त्यांनी पावर पॉइंटद्वारे काही महत्त्वाची माहिती उपस्थितांना दिली. झारखंड वगैरे ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी असताना विदेशातून कोळसा आयात करण्याची गरज काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याप्रसंगी चिखली गावातील युवक-युवतींनी घोषणबाजी केली.

संबंधित बातम्या