गोव्यात आंब्याच्या उत्पादनामध्ये घट का झाली? जाणुन घ्या

दैनिक गोमंतक
बुधवार, 9 जून 2021

खराब हवामान, लांबलेला पाऊस यांचा परिणाम; चक्रीवादळाचाही फटका

पणजी: गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या मोसमात (Season) आंब्याच्या (Mango) उत्पादनामध्ये मोठी घट झालेली असल्याचे आयसीएआर-सेंट्रल कोस्टल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. हवामानात (weather) बदल, गेल्या वर्षी लांबलेला पाऊस (Monsoon) आणि चांगल्या दर्जाच्या कलमांची उणीव यामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. (Big decline in mango production this year in goa)

संस्थेच्या फार्मवरील आंब्याच्या उत्पन्नामध्ये 80 टक्के घट पाहायला मिळालेली आहे. यावेळी फक्त 20 टक्के उत्पादन आलेले असून मोसम अगदीच विचित्र राहिलेला आहे. मोहोर येण्याची प्रक्रिया खूप उशिरा झालेली आहे आणि तिही काही झाडांवरच पाहायला मिळालेली आहे, असे या तज्ज्ञांनी सांगितले. आंब्याचा मोसम आल्यानंतर गोमंतकीयांना सर्वांत जास्त प्रतीक्षा मानकुराद चाखण्याची असते. मात्र मानकुराद आणि हिलारियोसारख्या जातींच्या आंब्याच्या झाडांना मोहोर खूप उशिरा आला आणि त्यांचा दर्जाही चांगला नव्हता, असे या तज्ज्ञांनी सांगितले.

गोव्यात आज जोरदार पावसाची शक्यता

यंदाच्या मोसमात सालसेत मुसराद आणि बार्देश मुसराद यासारखे आंबे बाजारात फारसे पाहायला मिळालेले नाहीत. आम्रपाली या जातीच्या आंब्याचे देखील व्यवस्थित उत्पन्न आलेले नाही. याचे कारण मुसळधार पाऊस हे राहून त्यामुळे कच्चे आंबे गळून पडले. बागायतदार आणि तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आंब्याच्या झाडाला चांगला मोहोर येण्यासाठी पुरेसा उकाडा हवा असतो. मॉन्सून गेल्यानंतर बराच काळ हवामान कोरडे राहण्याची गरज असते. तरच डिसेंबरमध्ये मोहोर यायला सुरूवात होऊ शकते. यावेळी पाऊस लांबल्यामुळे मोहोर येण्यावर परिणाम झाला आणि काही झाडांवर तर मोहोर खूपच उशिरा आल्याचे दिसून आले.

तौक्ते चक्रीवादळाचा फटका 
आंब्याच्या उत्पादनाला तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) मोठा फटका बसला आहे. आधीच उशिरा आलेले आंब्याचे उत्पन्न मे महिन्यात तरी हातात पडेल अशी अपेक्षा होती. पण वादळी वाऱ्यामुळे त्यावरही पाणी पडले. त्यातच आंब्याची झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार काही ठिकाणी घडले. यामुळे आंब्याच्या उत्पादनामध्ये आणखी घट झालेली आहे.‌ जर हवामान अशा प्रकारे प्रतिकूल राहिले, तर येत्या वर्षीही आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होऊन आणखी एक मोसम खराब जाण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या