परिचारिका नोकर भरतीत मोठा घोटाळा

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

 राज्य सरकारच्या गोमेकॉत दंत महाविद्यालयाच्या विभागात परिचारिका पदासाठी हजारो संख्येने उमेदवारांनी मुलाखती देऊन देखील सरकारने निकाल जाहीर न करता छुप्या पध्दतीने डिचोली व सत्तरी तालुक्‍यातील एकूण ३७ परिचारिकांना थेट कायमस्वरूपी नोकरीत भरती केले असून या नोकरभरतीत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप मगो पक्षाचे फोंड्यातील नेते डॉ. केतन भाटीकर यांनी केला आहे.

फोंडा : राज्य सरकारच्या गोमेकॉत दंत महाविद्यालयाच्या विभागात परिचारिका पदासाठी हजारो संख्येने उमेदवारांनी मुलाखती देऊन देखील सरकारने निकाल जाहीर न करता छुप्या पध्दतीने डिचोली व सत्तरी तालुक्‍यातील एकूण ३७ परिचारिकांना थेट कायमस्वरूपी नोकरीत भरती केले असून या नोकरभरतीत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप मगो पक्षाचे फोंड्यातील नेते डॉ. केतन भाटीकर यांनी केला आहे. आज (बुधवारी) मगो पक्षाच्या तिस्क फोंडा कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी केतन भाटीकर यांच्यासमवेत मगो पक्षाचे केंद्रीय समितीचे सदस्य सुमीत वेरेकर, सर्वेश शिरोडकर उपस्थित होते.

डॉ. केतन भाटीकर यांनी सांगितले की, गोमेकॉच्या दंत विभागात परिचारिका पदासाठी उमेदवारी अर्ज मागवले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हजारो संख्येने ऑनलाईनद्वारे उमेदवारांनी मुलाखती दिल्या पण सरकारने परिचारिकेच्या पदासाठी मुलाखती दिलेल्या सर्व उमेदवारांवर घोर अन्याय करून डिचोली व सत्तरी तालुक्‍यातील एकूण ३७ जणांना थेट कायमस्वरूपी छुप्या पध्दतीने नोकरीत भरती करून घेण्यात आले असून त्यात डिचोली तालुक्‍यात २० तर सत्तरी तालुक्‍यात १७ परिचारिकांचा समावेश आहे. दोनच तालुक्‍यातील एवढ्या मोठ्या संख्येने परिचारिकांना नोकऱ्या देणे म्हणजे इतर ठिकाणचे उमेदवार पात्र नव्हते काय, असा सवालही यावेळी करण्यात आला. 
फोंडा तालुक्‍यातील शिक्षित परिचारिकांना नोकरीत भरती का करून घेतले नाही असा प्रश्‍न केतन भाटीकर यांनी करून यासंबंधी फोंडा भाजप मंडळाने सराकारकडे विचारणा करण्याची आवश्‍यकता आहे. गप्प बसू नका, सत्य काय ते समोर आणा, असे आव्हानही फोंड्यातील भाजपच्या नेत्यांना यावेळी मगो पक्षातर्फे करण्यात आले.

गोमॅका इस्पितळात गेल्या कित्येक वर्षांपासून व कोरोनाच्या काळात रुग्णांना चांगली सेवा बजावणाऱ्या परिचारिकांना सेवेत नियमित न करता नव्वद टक्के डिचोली व सत्तरी तालुक्‍यातील परिचारिकांना कायमस्वरूपी भरती करणे म्हणजे या लोकांवर अन्याय असून हा सर्व मोठा घोटाळा असल्याचा आरोप करण्यात आला. ही भरती अन्यायकारक असून या पदासाठी किती उमेदवारानी परीक्षा दिल्या त्यात किती उमेदवार उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण झाले याचा सविस्तर निकाल जाहीर करण्याचे आवाहन भाटीकर यांनी केले आहे.

सरकारने यासंबंधीचे स्पष्टीकरण येत्या तीन दिवसात न दिल्यास युवावर्ग गोमॅकोत धरणे धरण्यास मागे राहणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. फोंड्यातील किती मुलींना नोकऱ्या दिल्या याचे फोंडा भाजप मंडळाने तसेच सरकारने उत्तर देण्याचे आव्हानच मगोतर्फे देण्यात आले आहे.

फोंड्यात रुग्णांची होते परवड
फोंड्यातील रुग्णांची परवड चालली असून फर्मागुढीतील दिलासामध्ये रुग्णांना दिलासा अजिबात मिळत नाही. त्यातच फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळाची सरकारने दयनीय अवस्था करून सोडली असून फोंड्यातील रुग्ण ना घरका ना घाटका बनला आहे. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्यास पुढील कृतीला सरकारच जबाबदार राहील, असा इशाराही मगो पक्षातर्फे देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या