कचरा जाळणारे यंत्र नादुरुस्‍त; राज्यभरात वैद्यकीय कचरा सहा दिवसांपासून पडून

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

मडगावातील वैद्यकीय कचरा हॉस्‍पिसियो इस्पितळाने स्वीकारणे का बंद केले? याची चौकशी केली असता ही धक्कादायक माहिती हाती आली.

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात वैद्यकीय कचरा जाळणारे यंत्र सध्या नादुरुस्त झाल्याने गेल्या पाच सहा दिवसांचा वैद्यकीय कचरा राज्यभरात पडून आहे. कोविड महामारीच्या काळात वैद्यकीय कचरा जमा होण्याचे प्रमाण तिप्‍पटीने वाढले आहे. त्यामुळे हे यंत्र कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मडगावातील वैद्यकीय कचरा हॉस्‍पिसियो इस्पितळाने स्वीकारणे का बंद केले? याची चौकशी केली असता ही धक्कादायक माहिती हाती आली. मिळालेल्या माहितीनुसार गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दोन अधिकारी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात जाऊन कचरा जाळणाऱ्या सयंत्राला आग कशी लागली. या दुर्घटनेत यंत्रणेची कितपत हानी झाली आहे. यंत्र दुरूस्त होईपर्यंत वैद्यकीय कचरा विल्हेवाटीची व्‍यवस्था काय? याची माहिती घेऊन आले आहेत.

राज्यात निर्माण होणाऱ्या घातक आणि वैद्यकीय कचऱ्यावर आधी पिसुर्ले औद्यौगिक वसाहतीत प्रक्रिया करायची, अशी योजना होती. त्यानंतर कुंडई येथील औद्योगिक वसाहतीत यासाठी यंत्रणा उभारावी, असा विषय सरकारने चर्चेत घेतला. त्याविषयीही निर्णयही घेतला. मात्र, प्रकल्पाचे काम काही मार्गी लागले नाही. कोविड महामारीच्या काळात वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने राज्यात वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे इस्पितळ वगळता इतरत्र सोय नसल्याचे ठळकपणे जाणवत आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या