काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरना फेसबुकवरून धमकी

प्रतिनिधी
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

युवा काँग्रेसची तक्रार, गजानन तिळवेला अटकेची मागणी

पणजी: भाजपचे कार्यकर्ता गजानन तिळवे याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना फेसबुकवरून धमकी दिल्याप्रकरणी तसेच इतर कार्यकर्त्यांना ते दिसतील तेथे त्यांचा चेहरा रंगवा असे आवाहन केले आहे. त्यामुळे याप्रकरणी तिळवे याला त्वरित अटक करण्याची मागणी युवा काँग्रेसतर्फे पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करून करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी दिली. 

यासंदर्भात अधिक माहिती देताना म्हार्दोळकर यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविड चाचणी कोठे केली? ती चाचणी गोमेकॉ इस्पितळाऐवजी खासगी इस्पितळात केली का? याचे स्पष्टीकरण द्यावे असे ट्विट केले होते. त्यांच्या ट्विटप्रकरणी गजानन तिळवे याने ४ सप्टेंबर २०२० रोजी रात्री उशिरा ट्वीट करून ही धमकी दिली आहे.

यासंदर्भात आज काँग्रेस तसेच युवा काँग्रेसच्यावतीने पणजी पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे. जी व्यक्ती सोशल मिडियाचा वापर करून अशा प्रकारच्या धमक्या देऊ शकतो तो सुपारी देऊन गुन्हाही घडवून आणू शकतो. भाजप कार्यकर्त्यांची विचारधारणा गुन्हेगारी स्वरुपाचीच आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी केली. पोलिस निरीक्षकांनी या तक्रारीचा अभ्यास करून योग्य ती कारवाई करू असे आश्‍वासन दिल्याचे म्हार्दोळकर यांनी सांगितले. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कोविड व्यवस्थापनात सरकार कसे अपयशी ठरले आहे याचा वेळोवेळी पर्दाफाश केला आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सरकारचे अपयश लपविण्यासाठी सोशल मिडियाचा वापर करून अशा प्रकारे धमक्या देण्याचे सत्र सुरू केले आहे. पुढील निवडणुकीत राज्यातील मतदार भाजप कार्यकर्त्यांच्या चेहऱ्याला काळे फासण्यासाठी वाट पाहत आहेत. त्यामुळे सोशल मिडियावरून आवाहन करून त्यात काहीच उपयोग नाही असे उत्तर म्हार्दोळकर यांनी दिले.

संबंधित बातम्या