येत्या निवडणुकीत भाजपचे गोव्यात ३५ जागा जिंकण्याचे ध्येय

दैनिक गोमंतक
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

भाजपने गोव्यात येत्या निवडणुकीत ४० पैकी ३५ जागा जिंकण्याचे ध्येय ठेवले आहे, असे उद्‍गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

साखळी : गोव्यात गेल्या निवडणुकीत भाजपचे १३ आमदार निवडून आले होते, तरी भाजपने सत्ता प्राप्त करुन आज भाजपकडे ३१ आमदारांचे भक्कम पाठबळ आहे. या पाठबळाच्या जोरावर भाजपने गोव्यात येत्या निवडणुकीत ४० पैकी ३५ जागा जिंकण्याचे ध्येय ठेवले आहे, असे उद्‍गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

साखळी मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन साखळी येथील नगरपालिका सभागृहात केले होते. या प्रशिक्षण शिबिराच्या उद्‍घाटन प्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. व्यासपीठावर साखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर, साखळी मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, प्रशिक्षण शिबिर प्रमुख सुभाष मळीक यांचीही उपस्थिती होती. 

मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, भाजपातर्फे दर पाच वर्षात निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. कारण कुठल्याही युद्धात जाण्यापूर्वी युद्ध जिंकण्यासाठी प्रशिक्षण देणे गरजेचे असते. प्रशिक्षण वर्ग घेऊन कार्यकर्त्यांना "अपडेट" करावे लागते. सध्या सोशियल मिडिया ही निवडणुकीत प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे यासंदर्भात कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याचे भाजपचे धोरण आहे. निवडणुकीला एक वर्ष राहिले असले तरी भाजपने निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. 

म्हादई असो वा कोळसा या समस्येला केवळ कॉंग्रेसच जबाबदार आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षावर व नेत्यांवर विश्वास ठेवावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ.सावंत यांनी केले.

गोपाळ सुर्लकर म्हणाले, आत्मनिर्भर भारत ही संकल्पना राबवून सर्वांना विविध योजनांद्वारे रोजी रोटी पुरविण्याचे कार्य भाजप करीत आहे. आज भाजप सत्तेवर आहे कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यात बदल केला पाहिजे. सत्तेचा लाभ लोकांना मिळवून देण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. सूत्रसंचालन कालिदास गावस यांनी केले. सिध्दी प्रभू पोरोब यांनी राष्ट्र प्रार्थना सादर केली. या शिबिराला साखळी मतदारसंघातील सरपंच, पंच, नगरसेवक, राज्य समिती, जिल्हा समिती, मंडळ समिती सदस्य व इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या