Goa Politics: भाजप आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

Goa Politics: भाजप आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा आम आदमी पक्षात प्रवेश
bjp and congress.jpg

पणजी: आम आदमी पक्षात (AAP) आज भाजप (BJP) आणि काँग्रेसच्या (Congress) अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यात साळगाव मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते व राज्य कार्यकारिणी सदस्य संदीप पेडणेकर यांचा समावेश आहे. (BJP and Congress workers have joined the Aam Aadmi Party)

प्रदेश संयोजक राहुल म्हांबरे (Rahul mhambrey) आणि प्रदेश सहसंयोजक सुरेल तिळवे यांच्या उपस्थितीत हे कार्यकर्ते आम आदमी पक्षात सहभागी झाले. पेडणे, साळगाव आणि पर्वरी मतदारसंघात आम आदमी पक्षाच्या कार्याला यातून चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

साळगाव मतदारसंघातील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संदीप पेडणेकर यांनी दोन दशकांहून अधिक काळ भाजपासाठी काम केल्यानंतर आपल्या समर्थकांसह आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. पेडणेकर हे भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत आणि 2004 मध्ये कळंगुट मंडळाचे युवा अध्यक्ष होते. त्यांच्या पत्नी प्रगती या गोमंतक भंडारी समाजाच्या बार्देश तालुका उपाध्यक्ष आहेत आणि त्यांनी नुकतीच रेईश मागूश जिल्हा पंचायत मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती.

यावेळी पेडणेकर म्हणाले की, जवळपास भाजपाने दशकभर सत्तेची चव घेतल्यानंतर त्यांनी सामान्य माणसांची काळजी घेणे, त्यांनी थांबवले आहे. ज्यांच्या मतदानामुळे ते सत्तेत आले त्यानाच ते विसरले आहेत, म्हणून मी आपमध्ये प्रवेश केला. सर्वसामान्यांची नवीन आशा म्हणून आप बाबत लोकांमध्ये चर्चा होत असल्याने आपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या तेथील कार्याने प्रभावित होऊन पेडणे मतदारसंघातील काँग्रेसचे युवा नेते राकेश बोंद्रे यांनीही या आपमध्ये प्रवेश घेतला. बोंद्रे हे काँग्रेस सेवा दलाचे गोवा युवा ब्रिगेड संयोजक होते आणि पूर्वी उत्तर गोवा समितीचे ते सदस्य होते. बोंद्रे हे पेडणेच्या काँग्रेस गटाध्यक्ष आणि पेडणे नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष प्रीती बोंद्रे आणि काँग्रेसचे माजी प्रदेश सदस्य स्व. विठ्ठल बोंद्रे यांचे पुत्र आहेत. यावेळी प्रमोद शेटगावकर, इद्रीस खान, शुभांगी अरोळकर, जमीर खान आणि राजू तारकर या समर्थकांसमवेत राकेश यांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला. पर्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते विग्नेश आपटे जे अनेक वर्षे भाजपसाठी तळागाळात काम करत होते, आज तेसुद्धा ‘आप’मध्ये दाखल झाले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com