परीक्षेच्या राजकारणाचा भाजपकडून निषेध

Dainik Gomantak
गुरुवार, 21 मे 2020

सहकार्याऐवजी विरोधकांनी गोंधळ निर्माण केल्याची टीका

पणजी

दहावीची परीक्षा हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. टाळेबंदीमुळे ही परीक्षा तहकूब करण्यात आल्याने विद्यार्थी व पालक तणावाखाली होते. गोवा ग्रीन झोनमध्ये असल्याने व कोरोनाचा सामुदायिक प्रसार नसल्याने सरकारने दहावीची परीक्षा घोषित केली. मात्र विरोधकांकडून त्याला सहकार्य करण्याचे सोडून त्याचे राजकारण करण्याची प्रवृत्ती आहे. त्यांच्या या विरोधाचा भारतीय जनता पक्ष गोवा प्रदेशतर्फे निषेध करण्यात आला.
भाजपच्या पणजी कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळकर म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ६ मे रोजी दहावीच्या परीक्षा २१ मे पासून घेण्याची घोषणा दिलेल्या आश्‍वासनानुसार १० दिवसआधीच केली होती. विद्यार्थी मानसिक स्वास्थ्य, दडपण व कोरोनाविरोधात लढा देत असताना सरकारने हा कठोर निर्णय घेतला होता. पालक व शिक्षण तज्ज्ञांकडून ही परीक्षा घेण्याची मागणी होत होती. या परीक्षेवर विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य अवलंबून असल्याने ती महत्त्वाची असते. कोरोना विषाणू साथीच्या महामारीविरोधात लढा देण्यात सरकार अग्रेसर व समर्थ आहे. या परीक्षेसाठी आवश्‍यक त्या सुविधा पुरविण्याची तयारी ठेवली गेली आहे. परीक्षा पावसाळ्यापूर्वी न घेतल्यास व वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे ही परीक्षा घेणे आवाक्याबाहेर जाईल या उद्देशाने सरकारने निर्णय घेतला होता. मात्र यावर काँग्रेसकडून टीका करण्याची प्रवृत्ती ही काही नवी नाही. सरकारच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करण्याची त्यांना सवयच लागून गेली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत विचार करून सरकारला त्यात काही सुधारणा सूचवून ही परीक्षा चांगल्याप्रकारे कशी घेता येईल यासाठी सहकार्य करण्याची गरज होती मात्र या परीक्षेचे राजकारण करून लोकांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने परीक्षेबाबत घेतलेला लोकाभिमुख निर्णय होता हे न्यायालयाने दिलेल्या परवानगीमुळे सिद्ध झाले आहे व न्यायालयाच्या निर्णयाचे भाजप cस्वागत करत असल्याचे सिद्धार्थ कुंकळकर म्हणाले.
यावेळी उपस्थित असलेले माजी आमदार सुभाष फळदेसाई म्हणाले की, सरकारने परीक्षेचा निर्णय हा राज्य कोरोनासंदर्भात ग्रीन झोन असताना घेतला होता. या महामारीच्या प्रकरणाबाबत विरोधकांनी त्याचा दुरुपयोग करून राजकारण केले. सरकारचा निर्णय चुकीचा तसेच आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने हानिकारक असल्याचे भासविण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला, अशी टीका त्यांनी केली. विरोधी आमदारांनी परीक्षेच्या निर्णयाला विरोध करून विद्यार्थ्यांचे खच्चीकरण केले, असा आरोप प्रेमानंद म्हांबरे यांनी केला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर असलेले दडपण दूर झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी कोणत्याही तणावाशिवाय परीक्षा देतील असे मत भाजप नेते रामराव वाघ यांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या