भाजपने घेतल्या १२३ आभासी सभा

Dainik Gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

कोरोना महामारीतील केंद्र सरकारच्या कामगिरीची दिली माहिती

पणजी

गेल्या महिनाभरात तंत्रज्ञानाची मदत घेत भाजपने तब्बल १२३ आभासी सभा (व्हर्च्युअल रॅली) घेतल्या. ४० मतदारसंघात भाजप आणि भारतीय जनता युवा मोर्चाने या पद्धतीने सभा घेतल्या, तर भारतीय जनता महिला मोर्चाने ३५ मतदारसंघात सभा घेतल्या.
या सभांत प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्वांना संबोधित केले. कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने उचललेली पावले, वर्षभरात केंद्र सरकारने केलेले काम यावर या सभांत भर देण्यात आला होता. आज राज्यभरातील ८८ शेतकऱ्यांसोबत अशी सभा भाजपने घेतली. त्यात मुख्यमंत्री व तानावडे यांच्यासह उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर सहभागी झाले होते. गाव पातळीवर दूध सोसायट्यांच्या अध्यक्षांपासून सहकारी संस्थांच्या अध्यक्षांपर्यंत सर्वांची सभा याच पद्धतीने भाजपने घेतली. सुक्ष्म, लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योजकांची सभाही घेण्यात आली. इतर मागासवर्गीय, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती यांच्यासाठी स्वतंत्र सभा घेण्यात आल्या आहेत.
याबाबत तानावडे यांना विचारले असता ते म्हणाले, घरोघरी केंद्र सरकारने केलेल्या कामगिरीची माहिती पोचवली जाणार आहे. भाजपचे कार्यकर्ते कोविड टाळेबंदी व त्यानंतरच्या काळात सामाजिक कार्यात आहेत. धान्य पुरवण्यापासून घरी मुखावरणे (मास्क) शिवून त्याचे वाटप करण्यापर्यंत सारी कामे कार्यकर्त्यांनी केली आहेत. पीएम केअर्स फंडासाठी निधी संकलनही केले आहे. रोग प्रतिकार शक्ती वाढणाऱ्या गोळ्यांचे वाटप कार्यकर्त्यांनी केले आहे. राज्यभरात विविध ठिकाणी १३ पत्रकार परिषदा घेत भाजपने आपला विषय जनतेसमोर ठेवला आहे.

संबंधित बातम्या