म्हापसा सत्तास्थापनेसाठी भाजप-काँग्रेस गोटातून नगरसेवकांना आमिषे

दैनिक गोमंतक
गुरुवार, 29 एप्रिल 2021

नगराध्यपद महिलांसाठी राखीव असल्याने ते पद ज्येष्ठ नगरसेवक शुभांगी गुरुदास वायंगणकर यांना द्यावे व उपनगराध्यक्षपद सुधीर कांदोळकर यांनी भूषवावे यासाठी काही राजकारणी प्रयत्नशील आहेत.

म्हापसा: म्हापसा नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष या दोन्ही पदांवर निवड करण्यासंदर्भात सध्या मोर्चेबांधणी सुरू असून, या पालिका मंडळावर सत्तास्थापनेसाठी भाजप व काँग्रेस गोटातून प्रयत्न केले जात आहेत. तसेच, नगरसेवकांना विविध आमिषे दाखवून वाटाघाटी केल्या जात आहेत. या पालिका मंडळावर स्वत:च्याच गटाची सत्ता यावी यासाठी भाजप व काँग्रेस अशा दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी सध्या या पालिकेच्या राजकारणात लक्ष घातले असून, काही नगरसेवक त्यांच्या संपर्कात आहेत. ‘म्हापशेकरांचो एकवोट’ गटाचे नेता असलेले माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर व मंत्री मायकल लोबो यांचे असलेले मित्रत्वाचे संबंध तसे जगजाहीरच आहेत. त्या अनुषंगाने येथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. (BJP-Congress faction lures corporators to come to power)

कदंब महामंडळाच्या  40 आंतरराज्य बससेवा बंद

नगराध्यपद महिलांसाठी राखीव
नगराध्यपद महिलांसाठी राखीव असल्याने ते पद ज्येष्ठ नगरसेवक शुभांगी गुरुदास वायंगणकर यांना द्यावे व उपनगराध्यक्षपद सुधीर कांदोळकर यांनी भूषवावे यासाठी काही राजकारणी प्रयत्नशील आहेत.दुसऱ्या बाजूने शुभांगी वायंगणकर या मूळच्या भाजपच्या नेत्या असल्याने तसेच भाजप महिला मोर्चाचे अध्यक्षपदही त्यांनी या पूर्वी भूषवलेले असल्याने त्यांनी म्हापशेकरांचो एकवोट गटापासून फारकत घेऊन भाजप गोटात सामील व्हावे व त्या बदल्यात त्यांना नगराध्यक्षपद द्यावे, यासाठीही भाजपमधील काही नेतेमंडळी प्रयत्नशील आहे. या पालिका मंडळावर कोणत्याही परिस्थितीत भाजपसमर्थक गटाचीच सत्ता असावी या दृष्टीने त्यांचे प्रयत्न असून, त्यामुळे यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या तडजोडी करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रत्यक्ष लक्ष

उपलब्ध माहितीनुसार, या पालिकेच्या राजकारणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे व प्रदेश संघटनमंत्री सतीश धोंड यांनी लक्ष घातले असून, भाजपविरोधी गट सत्तास्थानी येऊ नये यासाठी त्यांनी सुधीर कांदोळकर यांच्या गटातील काही नगरसेवकांशी संपर्कही साधलेला आहे. सुधीर कांदोळकर यांच्या गटातील बहुतांश नगरसेवक सध्या तरी एकसंध असले तरी त्यापैकी दोन-तीन नगरसेवक विविध आमिषांमुळे भाजपच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. तथापि, त्यांचा भाजपला पाठिंबा देण्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. भाजपने उमेदवारी न दिल्याने भाजपविरोधी गटाच्या पाठिंब्याने निवडून आलो असलो तरी आगामी काळात स्वत:च्या प्रभागात विकासकामे करायची झाल्यास भाजपविरोधात जाणे परवडणारे नाही, अशी कांदोळकर गटातील काही नगरसेवकांची मनोधारणा आहे. त्यांच्या या विषयासंदर्भातील एकंदर वक्तव्यांवरून ही बाब प्रकर्षाने जाणवते.

अपक्ष उमेदवारांची ‘बार्गेनिंग पॉवर’

या पालिकेवर भाजपपुरस्कृत म्हापसा विकास आघाडीचे नऊ, म्हापसा एकवोटचे नऊ आणि अपक्ष दोन असे बलाबल असल्याने अपक्ष उमेदवारांची ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढलेली आहे. आनंद भाईडकर व प्रकाश भिवशेट अशा दोन्ही अपक्ष उमेदवारांनी अगोदरपासूनच तळ्यात-मळ्यात भूमिका घेतली होती. त्यामुळे ते म्हापशेकरांचो एकवोट गटात सहभागी न होता अपक्ष उमेदवार म्हणून त्‍यांनी निवडणूक लढवली होती. आता तर त्यांना भाजपपुरस्कृत गटाशी सोयरीक करण्याची चांगल्यापैकी संधी चालून आली आहे; कारण, त्यांचा भाव वधारलेला आहे. दरम्यान, माजी नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांच्या भगिनी डॉ. केल ब्रागांझा या निवडून आल्याने त्यांना नगराध्यक्षपदी निवडून देण्यासाठी काही जण प्रयत्नशील आहेत. आमदार ज्योशुआ डिसोझा यांच्याशी यासंदर्भात भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. सातत्याने संपर्क साधूनही त्यांनी फोनवर प्रतिसाद दिला नाही.

Lockdown: गोव्यातील मांसविक्रेते चिंतेत; बीफसाठी कर्नाटकावर अवलंबून

मतदारांशी चर्चा करूनच निर्णय
म्हापशेकरांचो एकवोटचे सर्व नऊही नगरसेवक एकसंध असून अन्य दोन अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा या गटाला असल्याचा दावा सुधीर कांदोळकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना केला आहे. अपक्ष म्हणून निवडून आलेले प्रकाश भिवशेट हे सध्या आजारी असून ते गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचार घेत आहेत. ते फोनवरही उपलब्ध होऊ शकले नाहीत. दुसरे अपक्ष नगरसेवक आनंद भाईडकर यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले, की कोणत्या गटाला पाठिंबा द्यावा हे मी अजून ठरवलेले नाही. मतदारांशी चर्चा करूनच त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. दरम्यान, म्हापशेकरांचो एकवोटतर्फे निवडून आलेल्या कमल डिसोझा यांना भाजप गोटात ओढण्याचा प्रयत्न झाला असता त्यांनी स्पष्ट शब्दांत त्यासंदर्भात नकार दिला आहे. आपण सुधीर कांदोळकर यांना शब्द दिलेला आहे व त्याचे परिपालन करणे करणे हे माझे नैतिक कर्तव्य आहे, असे त्यांनी या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले. भाजपला पाठिंबा देण्यासंदर्भात आपणाशी त्रयस्तांच्या माध्यमातून सातत्याने संपर्क साधला जात आहे, असे त्या यासंदर्भात म्हणाल्या.

संबंधित बातम्या