‘राजभवन’वरून भाजप-काँग्रेसमध्ये ठिणगी 

विलास महाडिक
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

काँग्रेसने कोणतीही व्यक्तव्ये करण्यापूर्वी त्याचे पुरावे आधी सादर करावे, असे तानावडे म्हणाले. पक्षाच्या जबाबदार व्यक्तीने बेजबाबदारपणे वक्तव्ये करणे योग्य नाही, असा टोला तानावडे यांनी हाणला.

पणजी

राजभवनाचे रुपांतर पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव असल्याचा आरोप जो काँग्रेसचे कंत्राटपद्धतीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला होता. हा आरोप त्यांनी पुराव्यासह सादर करावा, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिले आहे तर भाजप सरकार हे कंत्राटी पद्धतीवर घेतलेल्या आमदारांवर चालत असल्याचा आरोप काँग्रेसने भाजपच्या आव्हानाला उत्तर देताना केला आहे. 
काँग्रेसचे कंत्राटी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राजीनामा दिला असल्याने त्यांना हे पद कंत्राटपद्धतीवर सोपविण्यात आलेले आहे. त्यांना नेहमीच पुरावे नसताना लोकांची दिशाभूल वक्तव्ये करण्याची सवयच लागलेली आहे. सध्या त्याच्या पक्षात असलेले आमदारच त्याला सांभाळून ठेवता येत नाहीत. पक्षातील काही मोजकेच कार्यकर्ते या पक्षाचा कार्यभार सांभाळत आहेत. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे व तो कशाप्रकारे सांभाळायचा हे पक्षाला माहीत आहे. त्यामुळे काँग्रेसने कोणतीही व्यक्तव्ये करण्यापूर्वी त्याचे पुरावे आधी सादर करावे, असे तानावडे म्हणाले. 
पक्षाच्या जबाबदार व्यक्तीने बेजबाबदारपणे वक्तव्ये करणे योग्य नाही, असा टोला तानावडे यांनी हाणला. राजभवनचे बांधकाम जुने झाले असल्याने त्याची वारंवार डागडुजी करावी लागते. त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्यापेक्षा नव्यानेच बांधकाम करण्याचा विचार सरकारने व्यक्त केला. अजूनही त्याचा आराखडा वैगरे या गोष्टी झालेल्या नाहीत त्यापूर्वीच काँग्रेसने टीका करण्यास सुरुवात केली आहे. या नव्या बांधकामासंदर्भात जोपर्यंत काही लेखी नाही त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणेही योग्य होणार नाही, असे तानावडे म्हणाले. 
दरम्यान, कंत्राटी पद्धत ही भाजपामध्ये सुरू आहे. दुसऱ्या पक्षातील आमदारांना कंत्राटावर घेऊन सरकार चालवित आहे. काँग्रेस हा पक्ष सेवा भावनेतून कार्य करत असून काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे सेवाव्रताचे ध्येय समोर ठेवूनच कार्य करत आहेत असे उत्तर काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी केलेल्या टीकेला दिले. राजभवनाचे कॅसिनो भवन करण्याच्या आरोपावर पुरावा सादर करा असे सांगणाऱ्या भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी नवीन राजभवनाचा प्रस्ताव प्रधानमंत्री कार्यालय, गृहमंत्री अमित शहा की एखाद्या कॅसिनो सम्राटाकडून आला होता हे आधी स्पष्ट करण्याची हिम्मत दाखविण्यास पक्षाच्या मुख्यमंत्र्याना सांगावे, असे सांगून तानावडे यांच्या वक्तव्याचा निषेध त्यांनी केला. 
भाजप सरकार पर्यावरणाचा नाश करणाऱ्या तसेच दुय्यम दर्जाचे महामार्ग, पूल, स्टेडियमची कामे करून जनतेच्या पैशांची लूट करत आहे व अदानी, अंबानी, एमव्हीआर कंस्ट्रक्शन्स, दिलीप बिल्डकॉन अशा कंत्राटदारांच्या आशिर्वादानेच चालते हे सदानंद तानावडे यानी लक्षात ठेवावे. गोवा विकायला निघालेल्या भाजप सरकारला जनता योग्य धडा शिकवेल, असा इशारा पणजीकर यांनी दिला. 
 

संबंधित बातम्या