Amit Palekar : गोव्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यात भाजप अपयशी; पालेकरांचा घणाघात

एफआयआरही नोंद नाही; मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची आपची मागणी
Amit Palekar
Amit PalekarDainik Gomantak

Amit Palekar : मागील काही दिवसांत राज्यात अनेक गंभीर घटना घडल्यात. राज्यातील जनतेच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला असून, त्यास सावंत सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार आहे. त्यामुळे गृहमंत्रिपद सांभाळणाऱ्या डॉ. सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आम आदमी पक्षाने शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या परिषदेस प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर, उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक, अमोल पालेकर यांची उपस्थिती होती.

ॲड. पालेकर म्हणाले की, डॉ. प्रमोद सावंत यांना फक्त आपली खुर्ची सुरक्षित कशी ठेवता येईल, याचीच काळजी लागली आहे. डॉ. सावंत हे अनेक खाती सांभाळतात. पण कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गृहमंत्री पदाचा त्याग करून राज्याच्या हितासाठी समर्पित गृहमंत्र्यांची नियुक्ती करावी.

गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणाचा पर्यटनावर विपरित परिणाम होत आहे. खाण उद्योग बंद पडल्याने केवळ पर्यटनच उत्पन्नाचा स्रोत बनले आहे. मात्र, कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात न आल्यास पर्यटन व्यवसायावर परिणाम होईल. भाजपचे मंत्री, आमदारांच्या हस्तक्षेपामुळेच गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिस असमर्थ ठरल्याचा आरोपही पालेकर यांनी केला.

Amit Palekar
Vijai Sardesai : गृहमंत्र्यांनी आता घरीच बसणे योग्य; सरदेसाईंचा खोचक टोला

राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिस आजकाल एफआयआर नोंदवत नसल्याचा आरोप ‘आप’चे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी केला. काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी केवळ माध्यम किंवा कौटुंबिक दबावामुळे गुन्हे दाखल केलेत. सोनाली फोगट खून प्रकरण असो किंवा मांडवी पुलावरील अपघात, ज्यात पीडित व्यक्ती वा त्यांचे कुटुंबीय भाजपशी जोडले आहेत. जेव्हा सरकार आपल्याच लोकांना न्याय देऊ शकत नाही, तर सामान्य लोक न्यायाची अपेक्षा कशी करणार, असा प्रश्न नाईक यांनी उपस्थित केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com