‘त्या’ आमदारांच्या प्रवेशासाठी भाजप अनुकूल

dainik Gomantak
बुधवार, 24 जून 2020

गोवा फॉरवर्डचे शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर, साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तरी त्याचे पडसाद या दोन्ही मतदारसंघात फारसे उमटण्याची चिन्हे नाहीत. माजी मंत्री दयानंद मांद्रेकर (शिवोली) यांनी आलिया भोगासी असावे सादर असे म्हटले आहे, तर पक्षापेक्षा आम्ही मोठे नाही पक्ष हाच श्रेष्ठ असे माजी मंत्री दिलीप परुळेकर (साळगाव) यांचे म्हणणे आहे.

पणजी
गोवा फॉरवर्डच्या या दोन्ही आमदारांनी भाजप प्रवेश करणार नाही असे वरकरणी सांगितले असले, तरी त्यांचे कार्यकर्ते हे आमचे आमदार (पात्राव) भाजपमध्ये जाणार आणि आम्ही भाजपचे काम करणार असे सांगू लागल्याचा भांडाफोड परुळेकर यांनी केला आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी भाजप कोविड संसर्ग रोखण्यात सरकारला आलेले अपयश, होत असलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजप अकारण ही माहिती प्रसारीत करत असल्याचे म्हटले आहे. मात्र, मांद्रेकर व परुळेकर यांची एकंदर देहबोली पाहिली तर या चर्चेत अजिबात दम नाही असे म्हणता येणार नाही. या दोघांनीही ते दोघे (विनोद व जयेश) भाजपमध्ये येणारच नाहीत असे छातीठोकपणे सांगितले नाही, या उलट राजकारणात काहीही घडू शकते, तसे राजकारणात घडणार नाही तसे अन्य कोणत्या क्षेत्रात घडेल अशी विचारणा त्यांनी केली. यामुळे त्यांचा (विनोद व जयेश) भाजप प्रवेश ही केवळ चर्चेच्या पातळीवर राहिलेली बाब नाही असे दिसून येत आहे.
याबाबत मांद्रेकर म्हणाले, तुम्ही ऐकता आहात तेच आम्ही ऐकत आहोत. भाजपमध्ये जाणार नाही असे त्यांनी (विनोद व जयेश) यांनी म्हटले आहे. भाजप भ्रष्टाचारी पक्ष आहे, कामगारांचेही पैसे त्यांनी खाल्ले असे त्यांनी (विनोद व जयेश) आरोप केले आहेत. त्यामुळे त्याविषयी मला तरी जास्त काही माहीत नाही. काहीच घडले नाही, तर पक्षाला कशी विचारणा करणार. चर्चा काहीही असली तरी आम्ही विचारू शकत नाही. अनेकजण फोन करून आम्हाला विचारणा करत आहेत. आम्ही त्यांना काय सांगणार. आम्हालाच काही माहीत नाही, तर आम्ही काय सांगू असे उत्तरे आम्ही देत आहोत. ही घडामोड काय, याविषयी आम्ही अनभिज्ञ आहोत.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोन तर काँग्रेसचे दहा आमदार भाजपमध्ये आले. त्यामुळे आणखी गोवा फॉरवर्डचे दोन आमदार भाजपमध्ये येणार नाहीत कशावरून असे विचारल्यावर मांद्रेकर यांनी नो कमेंट असे उत्तर दिले. असे झाले तर काय होईल असे विचारल्यावर ते म्हणाले, राजकारणात आम्ही बरेच पावसाळे पाहिले आहेत. आताच सगळ्याचा विचार करून चालणार नाही. आम्ही काही काल सकाळी राजकारणात आलेलो नाही. आम्ही चांगले राजकारण अनुभवले आहे. स्व. मनोहर पर्रीकर यांच्यासारख्या श्रेष्ठ नेत्यासोबत प्रशासन चालवण्याची संधी आम्हाला मिळाली आहे, त्यासाठी आम्ही भाग्यवान समजतो. दोन वेळा मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. तो सुवर्णकाळ होता. भरपूर कामे करता आली. कुठे माशी शिंकली आणि आम्ही पराभूत झालो. आम्ही पराभूत कसे झालो हे आम्हाला अद्याप समजले नाही. एकंदरीत हे राजकारण आहे. त्याला कोण काय करू शकतो. आमदार फोडले, घेतले, मंत्रिमंडळ फेरबदल केले याला तेवढे महत्व दिले जाऊ नये. असे प्रकार राजकारणात घडणार नाहीत तर कुठे घडणार. आलीया भोगासी असावे सादर. येणाऱ्या परिस्थितीला समर्थपणे तोंड देण्याची हिंमत मात्र ठेवली पाहिजे. आम्ही कोणालाच विचारले नाही. काही झालेच नाही, तर विचारणा कोणाकडे करू. गाभा समितीचा मी सदस्य, त्यामुळे पक्ष असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कल्पना देईल असे वाटते. मतदारसंघात भाजपमध्ये आमदार येणार याची चर्चा सुरू आहे.
परुळेकर म्हणाले, हो विषय अनेक दिवसांपूर्वी चर्चेत आहे. कार्यकर्ते आम्हाला कित्येक दिवस विचारणा करत आहेत. आता वर्तमानपत्रात तो विषय छापून आल्याने आम्हालाही तसे होणार की काय असे वाटू लागले आहे. त्यांनी (विनोद व जयेश) भाजप प्रवेश करणार नाही असे सांगितले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीवेळेपासून ही गोष्ट आम्ही ऐकत आलो आहोत. पक्ष मला कल्पना देणार की नाही हे आताच सांगत नाही. मांद्रेकर हे गाभा समितीत असल्याने त्यांना कदाचित विचारणा होईल. एका वाढदिवसादिवशी अशा गोष्टी आकाराला आणण्याची चर्चा झाली असावी. अशा गोष्टी वाढदिवसाचे निमित्त साधूनच होत असतात. जयेश यांचे कार्यकर्तेच ते भाजपमध्ये जाणार असे सांगत आले आहेत. माझ्या कार्यकर्त्यांना ते आता आम्ही भाजपचे काम करणार असे सांगत आहेत. गेले कित्येक दिवस माझ्या कार्यकर्त्यांकडून त्याची माहिती मला दिली जात आहे. जेव्हा होईल तेव्हा पाहू. आम्ही विरोध करू शकत नाही. पक्ष हाच श्रेष्ठ असतो. यापुढे ४० आमदार भाजपचेच दिसले तरी आश्चर्य वाटू नये. भाजपकडे ती क्षमता आहे. आम्ही प्रामाणिकणे काम केले आहे.

पत्रकारांचे प्रश्न अनुत्तरीत
गोवा फॉरवर्डने या गोष्टींचा मोठा धसका घेतला आहे. दोघांनी (विनोद व जयेश) वैयक्तीक पातळीवर भाजप प्रवेशाचा इन्कार केला असला तरी त्याने पक्षाच्या श्रेष्ठींचे समाधान झाले नाही. या दोन्ही आमदारांना (विनोद व जयेश) गोवा फॉरवर्डच्या पणजीतील मुख्यालयात येऊन भाजप प्रवेशाच्या चर्चेचा इन्कार करण्यास भाग पडले आहे. पक्षाच्या मुख्यालयात या दोन्ही आमदारांच्या म्हणण्याची चित्रफीत तयार करून ती प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आली आहे. त्यात बोलताना जयेश यांनी खास पत्रकार परिषद असे म्हटले असले तरी या पत्रकार परिषदेसाठी पत्रकारांना निमंत्रित केले नव्हते. असे का केले गेले, या दोघांना जनतेच्यावतीने प्रश्न विचारण्याची संधी का दिली गेली नाही याची दुसरी चर्चा आता सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या