भाजप सरकार गोव्याला ‘कोळसा हब’ बनू देणार नाही

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

राष्ट्रीय प्रकल्पांचा कोळशाशी काहीही संबंध नसून भाजप सरकार गोव्याला ‘कोळसा हब’ बनू देणार नाही, अशी हमी पर्यावरण तथा वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत  दिली. 

सासष्टी : गोव्याची विकसित राज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी राष्ट्रीय प्रकल्प हाती घेण्यात आले असून या प्रकल्पांच्या माध्यमातून गोव्यात कोळसा आयात केला जाणार असल्याचा संभ्रम गोमंतकीयांच्या मनात निर्माण करण्यात आला आहे. या राष्ट्रीय प्रकल्पांचा कोळशाशी काहीही संबंध नसून भाजप सरकार गोव्याला ‘कोळसा हब’ बनू देणार नाही, अशी हमी पर्यावरण तथा वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत  दिली. 

गोव्यात गेल्या अनेक वर्षांपासून कोसळा वाहतूक करण्यात येत असून कोळसा आणण्यासाठी भाजप सरकारने परवानगी दिली नव्हती. एमपीटीमध्ये येणाऱ्या कोळशाचे प्रमाण स्थिर असून कोळशाचे प्रमाण भाजप सरकार वाढू देणार नाही. एमपीटीमध्ये अतिरिक्त कोळसा आणण्यात येणार नाही यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वतः स्पष्टीकरण देणार आहेत, असे काब्राल यांनी सांगितले. यावेळी कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस, जिल्हा पंचायत सदस्य उल्हास तुयेकर व दक्षिण गोवा भाजपचे अध्यक्ष तुळशिदास नाईक उपस्थित होते. 

सागरमाला प्रकल्प हा कोळशाची वाहतूक करण्यासाठी हाती घेण्यात आला असल्याचा तथ्यहीन दावा करून गोमंतकीयांची दिशाभूल करण्यात येत आहे. सागरमाला प्रकल्प हा कोळसा वाहतुकीसाठी नव्हे, तर प्रवासी जल वाहतुकीसाठी करण्यात येत आहे, असे काब्राल यांनी स्पष्ट केले. गोमंतकीयांच्या हिताला केंद्रस्थानी ठेऊन भाजप सरकार काम करीत असून गोव्यात हाती घेण्यात आलेले सर्व राष्ट्रीय प्रकल्प गोव्याला तसेच देशाला विकसित बनविण्यासाठी लाभदायक ठरणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

रेल्वे दुपदरीकरण हे कोळसा वाहतुक करण्यासाठी करण्यात येत असल्याचा तथ्यहीन प्रचार करण्यात आल्यामुळे चांदर परिसरात जमून लोकांनी या विरोधात आंदोलन केले. रेल्वे दुपदरीकरणासाठी २०११ साली निविदा जारी करण्यात आली होती, तर दुपदरीकरणाच्या कामास २०१७ साली सुरवात करण्यात आली होती. नागरिकांनी त्यावेळी यास विरोध केला नव्हता, पण आता काही घटकांनी अपप्रचार केल्यामुळे नागरिक विरोध करीत आहेत, असे आमदार क्लाफास डायस यांनी सांगितले.

‘राष्ट्रीय प्रकल्पांचा कोळशाशी संबंध नाही’
गोव्याला सध्या अतिरिक्त विजेची आवश्यकता भासत असून दिवसेंदिवस गोव्यात विजेची मागणी वाढत चालली आहे. गोव्याला भेडसावणारी ही समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्रातून ४०० केव्हीए वीजलाईन आणण्यात येत असून ही वीजलाईन भविष्यात गोव्यात सुरळीतपणे वीजपुरवठा करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या प्रकल्पाबरोबर लोकांच्या भल्यासाठी रेल्वे रुळाचे दुपदरीकरण व राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पांचा कोळशाशी काहीही संबंध नसून कोळशावर चालणारे कुठल्याही प्रकारचे प्रकल्प सरकार गोव्यात आणणार नाही, असे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या