गोवा: ''भाजप सरकारची सामान्यांप्रती असंवेदनशीलता उघड''

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 1 एप्रिल 2021

`प्रो-क्रोनी क्लब` भाजप सरकारने सामान्यांप्रती आपली असंवेदनशीलता दाखवली अशी टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. 

मडगाव :  राष्ट्रीय बचत योजना (एनएसएस) , भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) अशा बचतीवरील व्याज दर कमी करण्याचे जाहीर करुन `प्रो-क्रोनी क्लब` भाजप सरकारने सामान्यांप्रती आपली असंवेदनशीलता दाखवली अशी टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. 

केंद्रातील भाजप सरकारने बुधवारी रोजी परिपत्रक काढून छोट्या बचतीवरील व्याज दर कमी केल्याचे जाहीर केले. त्यानंतर संपूर्ण देशातुन तीव्र प्रतिक्रीया उमटल्यानंतर आज  अर्थमंत्र्यांनी सदर आदेश नजरचुकीने दिला, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. केरळ, तमिळनाडू, आसाम राज्यातील निवडणुकांत भाजपला याचा फटका बसेल हे कळाल्यानेच अर्थमंत्र्यांनी ही सारवासारव केल्याचे  कामत म्हणाले. (BJP governments insensitivity towards common man exposed)

गोवा: आमदार राजीनामा प्रकरणी गिरीष चोडणकरांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नजरचुकीने हा आदेश निघाल्याचे सांगणारे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे वक्तव्य म्हणजे एप्रिल फूल च्या दिवशी लोकांना मुर्ख बनविण्याचा प्रयत्न आहे. भाजप सरकारच्या गैरकृत्यांचा, असंवेदनशील कारभाराचा घडा भरला असून आता लोकच अर्थव्यवस्था व लोकशाही सावरण्यांसाठी त्यांना योग्य जागा दाखवतील, असे  कामत म्हणाले. असंवेदनशील व लोकविरोधी भाजप सरकारने पीपीएफ, एनएसएस अशा छोट्या बचत ठेवींवर ०.७० ते १.४ टक्के व्याजदर कमी करुन कष्टकरी लोकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला. यावरुन धनाड्यांची  कोटी रुपयांची कर्जे माफ करणाऱ्या भाजप सरकारचा खरा चेहरा उघड झाला असे  कामत यांनी सांगीतले. 

बेजबाबदार भाजप सरकारने कोणताही विचार न करता व कुणाचाही सल्ला न घेता देशात नोटबंदीचा निर्णय घेतला. त्या दिवसापासून देशाची अर्थव्यवस्था कोसळली आहे. दिशाहीन भाजप सरकारकडे अर्थव्यवस्था सावरण्यासाठी कसलीच उपाय योजना नाही. सामान्य उद्योजकांना दिलासा देणारी कसलेच धोरण सरकारने जाहीर केलेले नाही, असे मत कामत यांनी व्यक्त केले. 
 

संबंधित बातम्या